स्वातंत्र्यानंतर भारतात एनसीसीची स्थापना करण्यामागेही मोठं कारण होतं

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या म्हणजेच एनसीसीच्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. दिल्लीच्या करिअप्पा परेड ग्राउंडवर हा कार्यक्रम पार पडला होता. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना संबोधित करताना मोदींनी सांगितलं की, तेही लहानपणी एनसीसीचे कॅडेट राहिलेले आहे. मला एनसीसीच्या वेळी जी ट्रेनिंग मिळाली, जे शिकायला मिळालं त्याचा आज देशाची जबाबदारी उचलताना मला खूप मोठा फायदा होतोय, असंही मोदी म्हणाले.

सांगायचा मुद्दा हा की, मोदींच्या या वक्तव्याने आता एनसीसी हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. अनेक जण असतील ज्यांनी लहानपणी शाळेमध्ये असताना एनसीसीमध्ये भाग घेतला होता. आणि त्यातही नुकतंच २६ जानेवारीचा कार्यक्रम झाला. तेव्हा अनेकांच्या आपल्या शाळेतील, महाविद्यालयातील एनसीसीच्या आठवणी ताज्या झाल्या असतील.

त्याचमुळे नेमका एनसीसीचा इतिहास काय? त्याची सुरुवात कशी झाली? हे जाणून घेऊया.

एनसीसी म्हणजे काय?

एनसीसीचा फुलफॉर्म म्हणजे नॅशनल कॅडेट कॉर्प्स. याला मराठीत ‘राष्ट्रीय छात्र सेना’ असं म्हणतात. हा भारतीय सैन्य दलातील एक प्रकार आहे. ही एक स्वयंसेवी संस्था असून ती संपूर्ण देशातील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांतून कॅडेट्सची भरती करते. एनसीसी भारतीय तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रवृत्त करते, त्यासाठी अनुकूल असं वातावरण पुरवते. एनसीसीच्या कॅडेट्समध्ये चारित्र्य, सहकार्य, शिस्त, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन, साहस आणि निःस्वार्थ सेवेचा आदर्श निर्माण करण्याकडे ही संस्था भर देते.

भारतात सर्वप्रथम एनसीसीची सुरुवात १९४८ साली झाली.

स्वातंत्र्यानंतर काही चांगल्या योजना तयार केल्या गेल्या पाहिजेत, ज्या शांततेच्या काळातही तरुणांना जास्त चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देऊ शकतील, अशी कल्पना निर्माण झाली. त्यानुसार पंडित एच. एन. कुंझरू यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राष्ट्रीय पातळीवर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कॅडेट संघटना स्थापन करण्याची शिफारस केली. नॅशनल कॅडेट कॉर्प्स हा कायदा गव्हर्नर जनरलने स्वीकारला आणि अशाप्रकारे १५ जुलै १९४८ ला एनसीसी अस्तित्वात आले.

१९६५ ते १९७१ च्या दरम्यान झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात एनसीसी हा दुसऱ्या नंबरचा भारतीय सैन्यातील संरक्षण विभाग होता. या विभागाने मोर्चाला शस्त्रे आणि दारुगोळा पुरवठा करण्याचं काम केलं होतं. शिवाय शत्रूच्या पॅराट्रुपर्सना पकडण्यासाठी गस्त दल म्हणूनही काम केलं होतं. इतकंच नाही तर एनसीसी कॅडेट्सने नागरी संरक्षण अधिकारी यांना देखील हातभार लावला होता. बचावकार्य, रहदारी नियंत्रण यासारख्या कामांमध्ये सक्रिय सहभाग या विभागाने नोंदवला.

या युद्धानंतर मात्र एनसीसीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला. फक्त संरक्षणाच्या कामात नाही तर नेतृत्व गुण आणि अधिकारी गुण विकसित करण्यावर भर दिला गेला. एनसीसी कॅडेट्सना मिळणारं सैन्य प्रशिक्षण कमी करण्यात आलं आणि समाजसेवा, युवा व्यवस्थापन अशा क्षेत्रांचंही ज्ञान देण्यावर भर देण्यात येऊ लागला. म्हणूनच आज एनसीसीच्या कॅम्पला गेलं की, सामाजिक सेवा करण्यावर भर दिला जातो. यातून टीम वर्क, नेतृत्व, आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा अभ्यास करून तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता विकसित करण्यावर भर दिला जातो.

आता जाणून घेऊया एनसीसी ऑर्गनायझेशन बाबतीत…

मुख्यालय स्तरावर, एनसीसीचे नेतृत्व लेफ्टनंट-जनरल पदासह महासंचालक करतात. त्यांना दोन-स्टार रँकचे दोन अतिरिक्त महासंचालक मदत करतात. पाच ब्रिगेडियर दर्जाचे अधिकारी आणि इतर नागरी अधिकारीही यांचाही यात समावेश असतो. याचे मुख्यालय दिल्ली इथे आहे. तीन सेवांमधील ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरावर १७ संचालनालये आहेत. राज्याच्या आकारमानावर आणि राज्यांमधील एनसीसीची वाढ यावर अवलंबून, संचालनालयांकडे त्यांच्या अंतर्गत १४ गट मुख्यालये असतात. ज्याद्वारे ते राज्यातील संघटनेवर नियंत्रण ठेवतात.

एनसीसी हे ‘एकता आणि शिस्त’ या ब्रीदवाक्यावर काम करते.

दरवर्षी देशभरातून कित्येक विद्यार्थी एनसीसीमध्ये सहभाग घेतात. या माध्यमातून भारतीय सैन्यात सहभागी होण्याची इच्छा त्यांच्यामध्ये जागृत होते. सैन्यात सहभागी होण्यासाठी पुढची वाटचाल कशी करावी याचं प्रशिक्षण एनसीसी त्यांना करतेच मात्र एक चांगला नागरिक घडवण्यातही एनसीसी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असते. असा या एनसीसीचा भारताचे भावी नागरिक घडवण्यात मुख्य वाटा आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.