रेल्वे मंत्र्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून चाचणी घेतलेली ‘कवच’ यंत्रणा काय आहे?

दोन्ही रेल्वे फुल्ल स्पीडमध्ये होत्या. एका रेल्वेत स्वतः रेल्वे मंत्री आणि दुसऱ्या रेल्वेत होते रेल्वे बोर्डाचे चेअरमन आणि इतर अधिकारी होते. आणि या दोन्ही रेल्वे एकाच पटरीवर एकमेकांच्या दिशेने येत होत्या. तुम्हाला वाटत असेल की, रेल्वे मंत्री,  मोठे अधिकारी प्रवास करत असताना या दोन्ही रेल्वे एकाच पटरीवर आल्याच कशा? इतका हलगर्जीपणा! अशाप्रकारे दोन रेल्वे एकाच पटरीवर आल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई तर झालीच असेल. 

पण २ मिनिट थांबा लय विचार करून नका. नेमका काय प्रकार आहे हे उलगडून सांगतो.

या दोन्ही ट्रेन एकाच पटरीवर आल्या खऱ्या पण त्या चुकीने नाही तर जाणूनबूजून तसं करण्यात आलं होतं. तो काही घातपात किंवा चुकीने घडलेला प्रकार नव्हता तर तो एका प्लॅनचा भाग होता. तिथे ‘कवच’ नावाच्या एका तंत्रज्ञानाची चाचणी सुरु होती आणि याच कवचमुळे दोन्ही ट्रेन एकमेकांना धडकल्या नाहीत.

काय आहे कवच?

समजा कधी दोन रेल्वे एकाच पटरीवर आल्या आणि त्यांची स्पीड देखील इतकी असेल की, त्यांना वेळेत थांबवणं शक्य नसेल तर मोठा अपघात होऊ शकतो. अशाने शेकडो प्रवाशांच्या जीवाचा प्रश्न असतो.

रेल्वे बाबतीत होणारे अपघात नाहीसे करण्यासाठी म्हणजे त्यांची संख्या शून्य करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यात यावं, असा विचार गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु होता. यासाठी भारताचं स्वतःचं तंत्रज्ञान असावं, असा अट्टहास होता. म्हणूनच स्वदेशी विकसित ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्यालाच ‘कवच’ असं नाव देण्यात आलंय.

कवच तंत्रज्ञान अशाप्रसंगी वेळीच दोन्ही रेल्वेंना एका विशिष्ट अंतरावर थांबवते. फक्त हेच नाही तर अशा इतर धोकादायक प्रसंगाच्या वेळी देखील कवच आपोआप धोक्याचा इशारा जाणवला की ट्रेन्स थांबवेल. जर रेल्वेच्या सिस्टीममध्ये कवचला काही प्रॉब्लेम जाणवला तेव्हा देखील आपोआप रेल्वे थांबेल.

जेव्हा एखादी ट्रेन स्टॉप-सिग्नल पास करते तेव्हा धोक्याचं सिग्नल दिलं जातं. अशावेळी जर ट्रेन चालवणारा वेगावर कंट्रोल करण्यात किंवा रेल्वे थांबण्यात अपयशी होत असेल तर कवच ऍक्टिव्हेट होऊन आपोआप स्वयंचलित ऍप्लिकेशनद्वारे ट्रेनचा वेग नियंत्रित करते.

कवच हे हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ कम्युनिकेशनच्या आधारे सतत अद्ययावत होणाऱ्या हालचालींच्या तत्वावर आधारित तंत्रज्ञान आहे. सुरक्षा सर्टिफिकेशनची सर्वोच्च पातळी म्हणजे SIL-4 (सेफ्टी इंटिग्रिटी लेव्हल – 4). त्यात देखील कवच यशस्वी झाले आहे, असं रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 

यात प्रत्येक ट्रॅकसाठी ट्रॅकवर आणि स्टेशन यार्डवर RFID टॅग दिले जातात. याद्वारे ट्रॅक ओळखण्यासाठी, ट्रेनचं लोकेशन जाणून घेण्यासाठी, ट्रेनची दिशा ओळखण्यासाठी सिग्नल दिले जातात. तर ‘ऑन बोर्ड डिस्प्ले ऑफ सिग्नल अॅस्पेक्ट’ हे ट्रेन चालवणाऱ्या अधिकाऱ्यांना कमी दृश्यमानतेतही बोर्ड कन्सोलवरील सिग्नल तपासण्यात मदत करते. 

तसंच, एकदा कवच प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर, ५ किलोमीटरच्या आतील सर्व रेल्वे शेजारील ट्रॅकवरील रेल्वेना संरक्षण देण्यासाठी थांबतील. यात सिग्नलिंग इनपुट आणि चालकाला दिले जाणारे इनपुट्स गोळा करण्यासाठी आणि ट्रेन क्रू आणि स्टेशन यांच्याशी अखंड संवाद राखण्यासाठी एक उपकरणं देखील समाविष्ट करण्यात आलं आहे. 

कवचची पहिली चाचणी २०१६ मध्ये घेण्यात अली होती. त्यातील सुधारणा ठरवून त्यानुसार पुढे सिस्टीम अपडेट करण्यात आली.

आता २०२२ चं अर्थसंकल्प सादर केल्यानंतर रेल्वेच्या सुविधांमध्ये वाढ करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्याचाच भाग म्हणून कवच प्रणाली आत्मसाद केली जाणार आहे. कवचच्या आतापर्यंतच्या चांचण्यानुसार १६० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने कवचच्या वापरला मान्यता देण्यात अली आहे. 

दिल्ली-मुंबई आणि दिल्ली हावडा कॉरिडॉरवर कवच कार्यान्वित करण्याचे नियोजित असून एकूण सुमारे ३००० किमी असा रस्ता असणार आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

कवचची आज ४ मार्चला चाचणी करण्यात आली. चाचणी दरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ज्या ट्रेनमध्ये चढले होते ती समोरून येणाऱ्या ट्रेनच्या ३८० मीटर आधी थांबली. कवच तंत्रज्ञानामुळे ट्रेनमध्ये आपोआप ब्रेक लागले. अशाप्रकारे चाचणी यशस्वी झाली.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.