रुपाणींना हटवणार असल्याची भविष्यवाणी केली म्हणून पत्रकारावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला…
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी राजीनामा दिल्यावर बऱ्याच राजकीय चर्चा झडू लागल्या. यात खूप कारण सांगितली गेली. वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरून बातम्या येऊ लागल्या. हे झालं मागच्या दोन दिवसातलं.
पण रूपाणींना राजीनामा दयावा लागू शकतो याची भविष्यवाणी एका पत्रकाराने २०२० मध्येच केली होती. पण बिचाऱ्यावर ही बातमी दिल्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हा म्हंटल गेलं की, तो पत्रकार अफवा पसरवतोय. पण आज बघा काय झालं ते.
तर मे २०२० मध्ये कोविडच्या पहिल्या लाटेदरम्यान, गुजराती न्यूज वेब पोर्टल फेस ऑफ नेशनचे संपादक धवल पटेल यांनी गुजरातमध्ये नेतृत्व बदलण्याची शक्यता अधोरेखित करणारा एक लेख लिहिला. यानंतर पटेलवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तदनंतर, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये धवल पटेल यांनी झाल्या प्रकाराबद्दल गुजरात उच्च न्यायालयासमोर बिनशर्त माफी मागितली आणि तेव्हाच एफआयआर रद्द करण्यात आली. पण त्याआधी पटेल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली होती. पण शनिवारी जेव्हा रुपाणी यांनी राजीनामा दिला, तेव्हा मात्र पटेल यांनी आपल्या खास स्टिंग ऑपरेशनची माहिती दिली.
त्यामुळे धवल पटेल यांच्या बाबतीत ‘मैंने पहले बोला था,’ असंच काहीस झालंय.
रूपाणींच्या राजीनाम्यानंतर पटेल यांनी त्यांच्या स्टोरीवर लिहिलं होतं कि,
“मी विश्वासार्ह स्त्रोतांची पडताळणी केल्यानंतर आणि घटकांची स्वतः तपासणी करूनच हा लेख लिहिला, पण राजद्रोहाचा हा खटला पत्रकारांवर दबाव आणण्याचा एक मार्ग असल्याचं सिद्ध झालंय.”
त्यानंतर पटेल यांच्यावर DCB ने ११ मे २०२० रोजी IPC चे कलम १२४अ (देशद्रोह) आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५४ (चुकीच्या चेतावणीसाठी) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. १४ मे रोजी त्यांना अटक करण्यात आली आणि न्यायालयाने त्याला मे महिन्यात जामीन मंजूर केला. एफआयआर रद्द झाल्यानंतर पटेल यांनी भारताला रामराम ठोकला.
आणि रूपाणींच्या राजीनाम्यानंतर धवल पटेल पुन्हा एकदा चर्चेत आले. शेवटी बोलून चालून ते पण पटेलच म्हणा.
हे ही वाच भिडू
- रुपाणींना हटवलं जाण्याची पहिली भविष्यवाणी करणाऱ्या पत्रकारावर राजद्रोहाचा खटला भरला होता..
- जसे सोनिया गांधींसाठी अहमद पटेल त्याप्रमाणे राहुल गांधींसाठी राजीव सातव महत्वाचे होते..
- गुजरात, उत्तरप्रदेशात मेल्यानंतर प्रेतांना जळण्यासाठी पण वाट बघावी लागतं आहे …