प्लॅस्टिकच्या बांगड्यांपासून सुरु झालेला सेलो आज १५०० कोटींची उलाढाल करतोय

आजकालच्या महागाईच्या जमान्यात बाकीच्या गोष्टी तर सोडाच खाण्यापिण्याच्या किमती सुद्धा गगनाला भिडल्यात. अश्यात बिनभरवश्याच्या उत्पादनांना तर रानचं मोकळं झालंय. ब्रँडेड गोष्टी घ्याव्यात तर त्या खिशाला परवडत नाही, आणि खिशाला परवडलं अश्या घ्यायच्या तर विश्वास आड येतो.

दरम्यान अश्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत सेलो सारखी एखादी कंपनी आहे, जी इतक्या वर्षांनंतरही किंमत आणि विश्वास दोन्ही गोष्टींचा बॅलन्स ठेवतेय.

शाळेतली आठवण म्हंटल कि, सेलो पेन डोळ्यासामोर येतोच. सेलो ग्रिफरनं माफ अक्षर चांगलं येत, असं शाळकरी विद्यार्थी आजही बोलताना दिसतील.  भारताची निम्म्याहून अधिक लोकसंख्या अशी असेल की आजही ते खिशात सेलो पेन घेऊन जातात.

ही सेलो कंपनी फक्त पेनपुरती मर्यादित राहिली नाही, तर त्यांच्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर आज घरा- घरांमध्ये होतोय. कित्येक वर्षांपासून लोकांनी सेलो ब्रँडवर डोळे झाकून विश्वास ठेवलाय. पण फार कमी लोकांना माहित असेल कि, या सेलो कंपनीची सुरुवात बांगड्या विकून झाली होती.

सेलो ग्रुप ऑफ कंपनीजची सुरुवात १९६७ मध्ये मुंबईच्या गोरेगाव इथून झाली. सेलो कंपनीने पॉलिव्हिनिल कार्बोनेट पीव्हीसी शूज आणि बांगड्या तयार करून आपला व्यवसाय सुरू केला. या काळात त्यांच्याजवळ फक्त ७ मशीन आणि ६० कर्मचारी होते.

या काळात, लोकांमध्ये प्लॅस्टिकची लोकप्रियता वाढत होती, कारण पितळ आणि स्टीलची भांडी खूपजड आणि महाग होती, त्यामानाने प्लास्टिक सामान हलकं आणि सामान्य लोकांच्या खिशाला परवडणार होत. हे लक्षात घेऊन कंपनीचे मालक घिसूलाल राठोड यांनी प्लास्टिकच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी प्लास्टिकची भांडी बनवून ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ठरवलं.

आता सेलो बूट- चपला बनवण्याबरोबर इतर कंपन्यांसाठी प्लास्टिकच्या वस्तू बनवत होता.

हे १९८० चं दशक होत, जेव्हा सेलो उत्पादनांचा व्यवसाय बाजारात वेगाने वाढू लागला होता. राठोड वेगवगेळ्या  भागीदारांसोबत काम करत होते.  बाजाराची प्रचंड मागणी पाहता त्यांनी उत्पादनकाचा विस्तार करायचं ठरवलं.  त्यांना वाटले की,  इतर कंपन्यांसाठी उत्पादने तयार करण्याऐवजी वैयक्तिक ब्रँड का तयार करू नये. त्यांनी शहरात एक छोटी प्लास्टिक कंपनी विकत घेतली आणि तिला नाव दिल ‘सेलो’.

असे म्हटले जाते की, घिसुलाल राठोड यांना यूएसए दौऱ्यादरम्यान कॅसरोलबद्दल माहिती मिळाली. परदेशी लोक लहान – लहान भांड्यात जेवण ठेवायची. ज्यामुळे ते बऱ्याच काळ गरम राहायचं. घीसुलाल राठोड यांना वाटले की, भारतीयांसाठी हा बेस्ट आयटम असू शकतो आणि तेच घडलं.

१९८० मध्ये त्यांनी सेलो कॅसरोल लाँच केले आणि बाजारात त्याला भरभरून प्रेम मिळाले.

९० च्या दशकात कंपनीने प्लास्टिकच्या फर्निचरसह बाजारात एन्ट्री मारली आणि नंतर स्टील वेअर, ग्लास वेअर, किचन अप्लायन्सेस, मेलामाइन आणि क्लिनिंग प्रॉडक्ट लॉन्च केली. 

फॅमिली बिजनेसशी जडले गेलेले गौरव राठोड यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं कि,

कंपनी ग्राहकांच्या पसंतीच्या आधारावर सुरू करण्यात आली होती आणि आजही ती अशीच पुढे जात आहे.

यांनतर कंपनीला प्लास्टिकपासून बनवलेल्या पेनसाठी बाजारात चांगल्या संधी दिसल्या. हा एक किफायतशीर व्यवसाय मानून त्यांनी प्रॉडक्ट बाजारात आणलं आणि विद्यार्थ्यांच्या स्टेशनरी किटमध्ये कंपनीची एन्ट्री झाली.

कंपनीचा ब्रँड प्रॉडक्ट म्हणजेच सेलो पेन लॉन्च करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन बाजारात हे प्रॉडक्ट सुरू करण्यात आले आणि ते यशस्वीही झाले. हि एन्ट्री इतकी जबरदस्त होती कि, जो तो सेलो पेन वापरण्यावर भर द्यायला लागला.  सेलो ग्रिपर, सेलो फाइन ग्रिप, सेल्लो मॅक्सरायटर आणि सेलो बटरफ्लाय यासारख्या उत्पादनांची नावे विद्यार्थ्यांसाठी  प्रसिद्ध झाली.

पुढे २००० च्या दशकाच्या सुरुवातीला कंपनीला समजले की,  ग्राहक आता प्लास्टिकवरून स्टील वेअरकडे वाटचाल करत आहेत. यानंतर कंपनीने स्टील आणि प्लॅस्टिकच्या मिश्रणाने बनवलेल्या स्टीलच्या फ्लास्क आणि  बाटल्या बाजारात आणल्या.

त्यांनतर अचानक स्टील पुन्हा ट्रेंडमध्ये आली. हे पाहून कंपनीने नवीन डिझायनर लुकसह ‘क्रॉस प्रॉडक्ट’ तयार केले. ग्राहकांना कंपनीच्या बाटल्या, जार, कॅसरोल आणि लंच पॅक आवडतात. या उत्पादनांमध्ये आत स्टील असते आणि बाहेरचा थर प्लास्टिकचा बनलेला असतो.

कंपनीने नॉनस्टिक कुकवेअर, पॅन, ग्रिल्स, टोस्टर, कॉफी मेकर्स, ग्राइंडर, ब्लेंडर केटल्स या वस्तूंमध्येही आपलं नशीब आजमावलं, आज कंपनी देशातील फेमस ब्रँडपैकी एक आहे.

सेलो ग्रुप ऑफ कंपनीने २०१४ मध्ये ग्लासवेअर उत्पादने आणि २०१७ मध्ये ओपलवेअर उत्पादनांसह नवीन क्षेत्रात स्वतःसाठी जागा निर्माण केली. सेलो आपली १५ टक्के उत्पादने मध्य पूर्व, युरोप आणि दक्षिण आफ्रिकेतील देशांमध्ये निर्यात करते.

ब्रँडचा सतत विकास कठीण काळातही ब्रँडचे अस्तित्व टिकवून ठेवतो.

आजच्या काळाच्या आणि लोकांच्या गरजा लक्षात घेऊन कंपनी नव- नवीन उत्पादनं आणतोय. सेलोने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करून जवळपास ६० वर्षे झालीतमी, पण आजही प्रत्येक घरा- घरात सेलो कंपनीची कोणती ना कोणती वस्तू भेटणारच.

दरम्यान २००९ मध्ये फ्रेंच पेन आणि स्टेशनरी उत्पादक BIC ने मुंबईतील स्टेशनरी उत्पादने बनवणाऱ्या सेलोचा ४० टक्के  हिस्सा विकत घेतला. असं असलं तरी कंपनीचा वर्षाचा टर्नओव्हर १,५०० कोटीच्या घरात आहे. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.