‘कामराज प्लॅन’ राबवला असता तर शिवसेना फुटली नसती..

काँग्रेसचं भविष्य काय असेल? २०१४ मध्ये काँग्रेस सत्तेतून बाहेर पडली आणि लागलीच या चर्चांना सुरवात झाली. ८ वर्षांनंतरही काँग्रेसचं भविष्य उज्ज्वल असेल असं म्हणण्याजोगं एकही कारण सापडत नाही.

काही दिवसांपासून शिवसेनाही याचा पंगतीत जाऊन बसली आहे. राज्यात दोन नंबरचा पक्ष ठरलेली शिवसेना, स्वतःचा मुख्यमंत्री बसवत अगदी सत्तेच्या शिखरावर असताना अशा काही घडामोडी घडल्या की सेनेच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

काँग्रेसच्या अस्तित्वावर जेव्हा जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा कामराज प्लॅनचं नाव काढलं जातं.

मात्र सेनेच्या बाबतीतही हा प्लॅन लागू झाला असता तर सेनेपुढं इतकी संकटं येणाची शक्यता कमी होती. त्यामुळं कामराज प्लॅन नक्की काय होता आणि त्याचा सेनेला कसा फायदा झाला हे बघू.

कामराज योजना ही १९६३ मध्ये मद्रासचे तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी कामराज यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडे काँग्रेसपक्ष आणि केंद्रातील काँग्रेस सरकारला पुन्हा सक्रिय करण्यासाठी एक ब्लू प्रिंट म्हणून आणली होती.

सरकारमधील नेते आपली मंत्रीपदे सोडतील आणि संघटनात्मक काम करतील तर संघटनेतील नेते सरकारमध्ये सामील होतील असा कामराज यांचा प्लॅन होता.

या प्लॅनला आणण्याचा टायमिंग पण खूप इंटरेस्टिंग होतं. १९६२ च्या चीनशी झाल्यानंतर जवाहरलाल नेहरू यांची इमेज आणि शरीर दोन्ही झपाट्याने खालावत होतं. नेहरूंनंतर कोण ? हा प्रश्न काँग्रेसपुढे आ वासून उभा होता. नेहरूंच्या तोडीचा कोणताच नेता काँग्रेसमध्ये नव्हता.

पण त्याचवेळी आपापल्या राज्यात पॉवरफुल असणाऱ्या दुसऱ्या फळींच्या नेत्याची मात्र चिक्कार भरणा होता. त्यामुळं जर नेहरूंनंतर कोण याचं उत्तर ठरवलं गेलं नसतं तर पंतप्रधान पदी कोण? यावरून पक्षात दुफळी माजली असती.

त्याचवेळी पक्षसंघटनेतही सलग ३ टर्म सत्तेत राहिल्यानंतर एक मरगळ आली होती विशेषतः सत्तेत असल्याने पक्ष बांधणीत दुर्लक्ष झालं होतं. पक्षातील सगळे धुरंधर सत्तेत मग्न होते. अगदी त्याचवेळी कामराज प्लॅन आला आणि काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली. 

२०१२ नंतर शिवसेनेतही अशीच पोकळी निर्माण झाली होती. बाळासाहेबांनंतर कोण असा ? प्रश्न सेनेपुढे होता. 

कारण बाळासाहेबांच्या हयातीतच उद्धव ठाकरे हेच त्यांचे उत्तराधिकारी असतील असं ठरवण्यात आलं असलं तरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. बाळासाहेबांच्या करिष्मा उद्धव ठाकरेंमध्ये नाही असं उघडपणे बोललं जात होतं.

विशेषतः २०१४ मध्ये सत्तेत येऊनसुद्धा उद्धव ठाकरेंना त्यांच्या नेतृत्वाबद्दल सेनेच्या कॅडरमध्ये विश्वासार्ह्यता निर्माण करण्यात आली नव्हती. सेनेच्या दुसऱ्या फळीतील नेते पाहिल्यातापासूनच सेनेला डोईजड होत गेले होते  मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या करिश्मापुढं त्यांचा निभाव लागला नव्हता.

मात्र जमिनीवरील राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेल्या उद्धव ठाकरेंना मात्र हे नेते कधीही धक्का देतील असं सांगण्यात येत होतं. पण उद्धव ठाकरे आधी ठाकरे नावाचा आदर आणि त्यानंतर सत्ता या दोन आयुधांच्या जीवावर शिवसेना प्रमुख म्हणून कायम राहिले. मात्र पक्षातील जेष्ठ नेत्यांची खद खद बाहेर येतंच राहिली.

अशावेळी उद्धव ठाकरेंनी अनेकदा टोकाची भूमिका घेत त्यांना सरळ बाजूला सारण्याचा मार्ग अवलंबल्याचा दिसतं. 

मनोहर जोशींपासून अनंत गीते, आढळराव पाटील ते एकनाथ शिंदे यांना वेळी वेळी असेच अनुभव आले आल्याचं दिसून आलं आहे. ज्याची अल्टिमेट किंमत एकनाथ शिंदे यांच बंद आणि पक्षात पडलेल्या उभ्या फुटाणे चुकवावी लागली.

कामराज प्लॅनमध्ये मात्र काँग्रेसने यावर वेगळा उपाय योजला होता. 

२ ऑक्टोबर १९६३ ला कामराज प्लॅन लागू झाल्यानंतर सर्व केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राजीनामे नेहरूंना दिले त्यातील नेहरूंनी  मोरारजी देसाई, स.का. पाटील, लाल बहादूर शास्त्री, जगजीवन राम, के एल श्रीमाली आणि बी गोपाला रेड्डी या सहा केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले. त्याचबरोबर मद्रास, ओरिसा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि काश्मीर या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी देखील राजीनामे दिले. या नेत्यांना मग संघटनात्मक पदे स्वीकारून काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचं काम देण्यात आलं.

महत्वाचं म्हणजे पक्षनेतृत्वाचा आदेश मान्य करून हे सर्व नेते पक्षबांधणीच्या कामाला देखील लागले.

बरोबरच नव्या चेहऱ्यानं सत्तेत सहभागी होण्याची संधी देखील मिळाली. रजनी कोठारी यांनी त्यांच्या  पॉलिटिक्स इन इंडियामध्ये लिहिले आहे की, “ कामराज योजनेने एकीकडे पंतप्रधान नेहरूंना पदाधिकार्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्याची अभूतपूर्व संधी दिली, परंतु दुसरीकडे सरकारबरोबरच पक्ष संघटना देखील तितकीच महत्वाची आहे हे तत्व अधोरेखित झाले.

शिवसेनेलासुद्धा जवळपास अशाच सुधारणा करणं शक्य होतं. 

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे, आनंद अडसूळ, गुलाबराव पाटील, रामदास पाटील यांना सेनेच्या संघटनेच्या कामाची जबाबदारी देता आली असती. विशेषतः २०१४ मध्ये भाजपबरोबर सरकार बनवाल्यापासूनच सेना भाजपवर नाराज होती. त्याचवेळी सेनेला या जेष्ठ नेत्यांना पक्षबांधणीसाठी वापरता आलं असतं. 

महत्वाचं म्हणजे सेना कॅडरबेस पक्ष असल्याने सेनेत पक्षपदाधिकाऱ्यांना देखील तितकाच मान आहे. त्यात असे जेष्ठ नेते संघटनेत काम करू लागले असते तर शिवसैनिकांत नवीन उत्साह संचारला असता. बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्या एका भाषणाने सेना त्या भागात उभारली जात होती. मात्र त्यांच्यानंतर निर्माण झालेली पक्षसंघटनेतील पोकळी सेनेला जेष्ठ नेत्यांना संघटनकार्यात पाठवून भरता आली असती.

अजून एक महत्वाचा बदल झाला असता तो म्हणजे जुने नेते ते नवीन नेते हा बदलही सहजपणे हाताळता आला असता. 

यासाठी पुन्हा काँग्रेसमध्ये कामराज प्लॅन मुले झालेल्या बदलाचा धाकला देता येइल. नेहरूंनंतर काँग्रेसला सत्ता आणि त्याचे महत्त्वाकांक्षी नेते या दोन्ही गोष्टी मॅनेज करण्यासाठी पक्षाला नवीन नेतृत्व मॉडेलची आवश्यकता होती. 

त्यात कामराज यांनी एक इंटरेस्टींग गोष्ट केली. पंडित नेहरू यांच्यानंतर कामराज यांनी लो प्रोफाइल असलेले स्वछ चारित्र्याचे लाल बहादूर शास्त्री यांना पंतप्रधानपदी बसवलं आणि विशेष म्हणजे तुल्य घोष, संजीव रेड्डी, निजलिंगप्पा आणि स. का. पाटील यांनी हे नेतृत्व स्वीकारलं देखील.

उद्धव ठाकरे यांनाही काही लो प्रोफाइल नेत्यांना महत्वाची मंत्रिपदं देऊन जेष्ठ नेत्यांना पक्षसंघटनेत काम देता आलं असतं. तसेच यामुळं पक्षसंघटनेत सामूहिक नेतृत्व देता आलं असतं. त्यामुळं इतर नेत्यांनाही आपल्या कामाची आणि जेष्ठतेची दखल घेऊन पक्षात आपली किंमत केली जात आहे असं सांगता आलं असतं. 

त्याचबरोबर आता जो उद्धव ठाकरे यांच्या भोवतालचे बडवे आणि निष्ठावंत असा जो वाद निर्माण केला जात आहे तो ही झाला नसता. शिवसेनेत दोन गट पडले नसते. नेते जरी बाहेर पडले असते तर त्यांना एक एक करून बाहेर पडावं लागलं असतं. 

कामराज प्लॅनमुळे अजून एक महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे काँग्रेसचं नेतृत्व नेहरू गांधी घराण्यातच राहिलं असतं. पंडित नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधी काँग्रेसची धुरा सांभाळण्यात सक्षम नव्हत्या तेव्हा काँग्रेसने इतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली एक सामूहिक नेतृत्व स्वीकारलं आणि जेव्हा लाल बहादूर शास्त्री यांच्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तेव्हा त्यांनी कामराज प्लॅनला केराची टोपली दाखवली. 

इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कामराज यांच्या सामूहिक नेतृत्व आणि सहमती बनवण्याच्या मॉडेल पासून दूर जाऊन नेता-केंद्रित हायकमांडकडे वळली. त्यामुळे इंदिराजींचे समर्थक आणि ओल्ड गार्ड किंवा सिंडिकेट यांच्यात संघर्ष निर्माण झाला आणि 1969 मध्ये पक्षात फूट पडली.

 मात्र तेव्हा इंदिरा गांधी यांचं नेतृत्व मजबूत झालं होतं. 

सामान्य कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी त्यांना आपल्या नेत्या म्हणून मान्य केलं होतं तेव्हा पक्षात फूट पडून जुना काँग्रेस पक्ष हातातून जाऊनही. नवीन काँग्रेस, नवीन चिन्ह घेऊन इंदिरा गांधी पुन्हा उभा राहिला.

हेच पण सेनेत झालं असतं. सुरवातीला सामूहिक नेतृत्वान उद्धव ठाकरेंना जुन्या नेत्यांच्या महत्वाकांक्षा रोखता आल्या असत्या. तोपर्यंत त्यांना बाळासाहबे ठाकरेंनंतर मीच हे बिंबवता आलं असतं. त्याचवेळी जेष्ठ नेत्यांना आपला एक वेगळं गट तयार करण्यापासून रोखता आलं असतं आणि बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे असा राजकीय वारसा सहजपणे सोपवता आला असता.

पण या आता नाही म्हटलं तरी या जर तरच्या गोष्टी आहेत मात्र कामराज प्लॅन सेनेसाठी महत्वाचा ठरला असता एवढं नक्की.

 हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.