ज्या काळात भारतातून गोष्टी निर्यात होत नव्हत्या तेव्हा ‘किर्लोस्कर’ कंपनी मैदानात उतरली

किर्लोस्कर ब्रदर्स…!! 

हे नाव महाराष्ट्रात कुणी ऐकलं नसेल असं होऊच शकत नाही. शेतात लावायचं डिझेल इंजिन असो की बोरवेलला लावायचा इलेक्ट्रीक इंजिन असो. टिकाऊ आणि दमदार इंजिन म्हणून पहिलं नाव येतं ते म्हणजे किर्लोस्कर इंजिनचं..!!

किर्लोस्कर इंजिन निव्वळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात नावाजलेलं आहे. किर्लोस्कर या नावामागे असलेल्या या विश्वासाचा जन्म हा किर्लोस्कर कंपनीच्या स्थापनेच्या वेळेसच झाला आणि याच विश्वासाला आजपर्यंत किर्लोस्करांनी कायम ठेवलं आहे. 

सायकल दुरुस्तीच्या दुकानापासून सुरु झालेला प्रवास कडबा कापायच्या यंत्रापासून थेट इंजिनापर्यंत पोहोचला. या प्रवासात जितके कठोर प्रसंग आहेत तितकेच रंजक प्रसंग सुद्धा आहेत. 

या दमदार किर्लोस्कर इंजिनांना जन्म देणाऱ्या किर्लोस्कर वाडीचा जन्म असा झाला.

किर्लोस्करांच्या नांगराचा बेळगावचा कारखाना  लालफितीत अडकला. त्यानंतर बाळासाहेबांनी पंतप्रतिनिधींच्या इच्छेखातर औंध संस्थानमध्ये आपला नांगराचा कारखाना हलवला. कुंडल रोड नावाच्या रेल्वेस्टेशन जवळील माळावर एक अख्खं इंडस्ट्रीयल गाव उभारलं.

पंतप्रतिनिधींनी दिलेले दहा हजार रुपये व पन्नास कर्मचाऱ्यांच्या जीवावर हा कारखाना सुरु झाला. पहिला भारतीय लोखंडाच्या नांगराचा कारखाना तर तिथे बनलाच पण पाठोपाठ भारतातला पहिला सबमर्सिबल पंप, पहिल डिझेल इंजिन, पहिले इलेक्ट्रिक इंजिन असे अनेक प्रयोग केले जाऊ लागले.  

लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या उत्तम स्वभाव आणि व्यवहाराने प्रभावित होणारे सातारचे कलेक्टर हे लक्ष्मणरावांचे चाहते होते. लक्ष्मणरावांनी कलेक्टरच्या घरगड्याच्या परिवाराला सांभाळलं. याबदल्यात कलेक्टरने कुंडलचे नाव बदलून किर्लोस्करवाडी केलं होतं.

शंतनुरावांनी अतिशय सूक्ष्म अभ्यास करूनच आपल्या इंजिनांची निर्मिती केली होती.

१९२० साली प्रायव्हेट लिमीटेड कंपनीने अवघ्या सहा महिन्यात भारतातला पहिला सबमर्सिबल पंप बाजारात आणला. त्यानंतरच्या एका वर्षातच कंपनीनं भारतातलं पहिलं डिझेल इंजिन बाजारात आणलं. ब्रिटिश ऑईल इंजिन एक्स्पोर्ट कंपनीकडून इंजिनाचे नमुने मिळाले. मात्र आपली इंजिनं मजबूत आणि भरवशाची असली पाहिजेत असं शंतनुरावांचं मत होतं. 

यासोबतच ही इंजिनं अगदी दोन चार एकर जमीन असलेल्या शेतकऱ्याला सुद्धा परवडायला हवीत  नुसतीच परवडणारी नसावी तर सहज वाहून नेता येणारी हवीत. जलद गतीची हवीत आणि आकाराने छोटी हवीत जेणेकरून हाताळण्यासाठी कमी माणसं लागतील, अशी शंतनुरावांची इच्छा होती.

शंतनुरावांच्या दूरदृष्टीतून किर्लोस्कर कंपनीने १९४० ला भारतातलं पहिलं इलेक्ट्रिक इंजिन आणलं होतं तर १९४१ ला भारताल पहिलं लेथ मशीन आणलं होतं. 

यापाठोपाठ १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि नव्या अस्मितेचा उदय झाला.

१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळल्यानंतर भारतातील उद्योगांना पूरक असं धोरण सरकारकडून राबवण्यात येत होतं. ऑइल इंजिन्सच्या बाबतीत सुद्धा असंच धोरण राबवण्यात येत होतं.

भारतात उत्पादित होणाऱ्या इंजिन्सची आकडेवारी लक्षात घेऊन उर्वरित इंजिन्स परदेशातून आयात केली जायची. भारतात इंजिन्सचं उत्पादन होत असलं तरी ते कमी होतं आणि दुसऱ्या महायुद्धांनंतर अनेक उद्योगधंदे ठप्प झाल्यामुळे परदेशातून सुद्धा इंजिन्स येत नव्हते.

त्याच वेळेस सरकारकडून देशातील अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणावर इंजिन्स आयात करण्याचे धोरण राबण्यात येत होते. त्यामुळे भारतातील सगळी लायसन्स परदेशी इंजिन्सने भरून गेली होती. 

परंतु शंतनूराव मात्र वेगळ्याच ध्येयाने झपाटलेले होते.

देशातील ऑइल इंजिनांचा धंदा बाल्यावस्थेत असतांनाच आपल्या इंजिनांची लायकी किती आहे हे शंतनुरावांनी तपासायचे ठरवले. युरोपातील जर्मनी नुकताच दुसऱ्या महायुद्धातुन सावरून प्रगत राष्ट्र म्हणून उदयाला आला होता. तेव्हा आपण आपले इंजिन्स जर्मनीमध्ये विकायचे असं शंतनुरावांनी ठरवलं.

भारताच्या तुलनेत जर्मनीमध्ये प्रचंड थंडी पडते. त्यामुळे आपली इंजिनं त्या कडाक्याच्या थंडीत टिकुन राहतील यासाठी प्रयत्न सुरु झाले. सगळं झाल्यानंतर त्या इंजिनांना बोटॅनिकल गार्डनच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आलं.

ठराविक कालावधी संपल्यानांतर कोल्ड स्टोरेजमधून ही इंजिन्स बाहेर काढण्यात आली व चालू करायला सुरुवात झाली. एवढे दिवस कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेली इंजिनं  अगदी फटाफट सुरु झाली आणि सगळ्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. 

त्या चाचणीनंतर जर्मनीत इंजिन्स आयात करण्यासाठी शंतनुरावांनी एका जर्मन व्यापाऱ्याला प्रवृत्त केलं. त्या व्यापाऱ्यानं पाच इंजिन्स खरेदी करण्यास तयारी दर्शवली.

व्यवहार ठरला मात्र निर्यात करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार होती.

शंतनुरावांची पुतणी ही तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांची सून होती. तसेच या आंतरराज्यीय विवाहात शंतनुरावांनीच मदत केली होती त्यामुळे मोरारजी देसाईंनी केंद्र सरकारकडे निर्यात करण्यासाठी परवानगी द्यावी असं पत्र पाठवलं.

१९५४ सालात मुळात देशातच इंजिन्स आयात करावे लागत होते. त्यामुळे पाच इंजिनांच्या आयातीला परवानगी द्या अशा पत्रात चुकून निर्यात शब्द लिहिला गेला असेल असं केंद्रीय मंत्र्यांना वाटलं.

त्यामुळे केंद्रीय मंत्रालयाने परत मोरारजी देसाईंना पत्र लिहिलं. आपण पाठवलेल्या पत्रात आयात ऐवजी चुकीने निर्यात शब्द  लिहिण्यात आलंय. त्यात दुरुस्ती करा आम्ही लगेच आयातीला परवानगी देतो असं म्हटलं होतं.

केंद्रीय मंत्रालयाकडून आलेल्या पत्रामुळे मोरारजी देसाईंबरोबर सगळ्यांनाच हसू आलं. सगळा गोंधळ दूर केल्यानंतर इंजिनाच्या निर्यातीला परवानगी मिळाली.

केंद्र सरकारने निर्यातीची परवानगी दिल्यानंतर पाच ऑइल इंजिन ब्रिटिश विमानाने जर्मनीला निर्यात करण्यात आली. त्यानंतर किर्लोस्कर कंपनीचा असा प्रत्यय आला की आज जगातील ७० देशांमध्ये किर्लोस्कर कंपनीचे इंजिन्स विकले जातात.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.