पिसाचा मनोरा सरळ उभा राहावा हीच अपेक्षा होती, पण तो झुकला आणि काम थांबलं.

जगात एक से बढकर एक आणि उंच टॉवर, मनोरे आहे. त्यात आपला सगळ्यात जास्त भारी आणि आणखी उंच असावा यासाठी अख्ख्या जगात नुसती रेस लागलेली असते. पण पिसाच्या त्या वाकड्या मनोऱ्याचा नादचं काही वेगळा आहे. ज्या काळात स्थापत्यशास्त्र विकसित झालं नव्हतं, त्यावेळी तो बांधला गेला. तो बांधताना ताठ मानेने उभा राहावा हीच अपेक्षा होती, पण तो झुकला आणि काम थांबलं.

त्या मनोऱ्याच्या काम ज्या कोणी इंजिनिअर्सनी केलं, ते जर आजच्या काळात केलं असत, तर कायमचे सस्पेंड झाले असते, त्यांच्या आरोप असते, चौकशी समिती नेमली असती. पण असलं काही झालं हे अजून तरी काय कानावर पडलेलं  नाही. पण त्याच्या उलट हे चुकून झालं काम बघायला जगभरातले लोक तुटून पडलेले असतात.

पिसाचा टॉवरही बेल टॉवर म्हणून उभारला गेला. त्या टॉवरच्या जन्मानंतर पहिले चार मजले ११७३ ते ११७८ पर्यंत उभारण्यात आले. मग जवळपास शंभर वर्षं हा मनोरा वाढलाच नाही. पुन्हा १२७२ मध्ये काम सुरू झालं. पुढच्या सहा वर्षांत ते काम सातव्या मजल्यापर्यंत गेलं. मग पुन्हा जवळपास ऐंशी वर्ष काम थांबलं. मग १३६० ते १३७० मध्ये वरचा बेल टॉवर उभारून मनोरा पूर्ण केला गेला.

तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, या मनोन्याचं बांधकाम असं मधेच थांबवलं का गेलं? त्याला दोन कारणं आहेत. एक अर्थात पैशाचं, दुसरं त्याचं ते दक्षिणेकडे झुकण्याचं. गंमत म्हणजे पहिल्या चार मजल्यांच्या वेळी तो मनोरा उत्तरेकडे झुकत होता. त्यात सुधारणा केल्यावर तो दक्षिणेकडे झुकायला लागला.

त्या मनोऱ्याच्या बांधकामाला सुरुवात झाली तेव्हा पिसा राज्यात समृद्धी होती. त्या वेळी इटली हा एक देश नव्हता. मग युद्धं सुरू झाली. त्यामुळे पैशांचा ओघ थांबला, बांधकाम थांबलं. तो झुकायला लागला. कारण ज्या जमिनीवर पाया उभा होता ती कमी-जास्त प्रमाणात खचत होती, पण जवळ जवळ १८० ते १९० वर्ष काम वेगवेगळ्या टप्प्यात थांबल्यामुळे खचणाऱ्या जमिनीला एकदा मनासारखं सेटल व्हायला मिळालं. नाहीतर हा टॉवर कधीच कोलमडला असता.

या मनोऱ्याचा खालचा भाग अधिक प्रेक्षणीय कॉलम्स आणि नेत्रदीपक कमानींनी सजलाय. कॉरिनिथियन्स कॅपिटल्सवर त्या भरजरी कमानी विसावल्या आहेत. हे सर्व जमलं. कारण त्या वेळी सरकार दरबारी पैसे होते.

१२७२ मध्ये जिझोवानी द सिमन या आर्किटेक्टने काम सुरू केलं. त्या वेळी झुकणाऱ्या एका बाजूमुळे उत्तरेकडच्या बाजूचं वजन आणि उंची वाढवली आणि गुरुत्वमध्य भरकटणार नाही हे पाहिलं गेलं. पुन्हा १२८४ मध्ये काम थांबलं. कारण पिसाचा राजा युद्ध हरला. सातवा मजला १३१९ मध्ये बांधला आणि बेल चेंबर १३७२ मध्ये.

हा बेल चेंबर बांधताना पिसानो नावाच्या आर्किटेक्टने गॉथिक आणि रोमन स्थापत्यकलेचं मिश्रण केलं. त्याने सात घंटा बसवल्या. सात सुरांच्या सात घंटा! विज्ञान बाल्यावस्थेत असतानाही प्रत्येक गोष्टीचा केवढा विचार केला गेला. या मनोऱ्यात इटालियन संगमरवर आणि तिथे मुबलक प्रमाणात सापडणाऱ्या सँड स्टोनचा वापर केला गेलाय.

हा मनोरा कधीतरी कोसळेल ही भीती इटालियन मंडळींच्या मनात काही शतकं घर करून आहे. त्यामुळे आधुनिक विज्ञानाचा फायदा घेऊन ती भीती कायमची दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. १९६४ साली जगातले महान स्थापत्यशास्त्रज्ञ, गणितज्ञ, इतिहासकार एकत्र आले.

त्यांच्या लक्षात आलं की ज्या बाजूला टॉवर झुकलाय, त्या बाजूची जमीन थोडी भुसभुशीत झालेय. मग दुसऱ्या बाजूला आठशे टनांचं शिसं ठेवलं गेलं. पुन्हा ७ जानेवारी १९९० रोजी पिसा लोकांसाठी बंद केला गेला. वरच्या काही घंटा काढल्या गेल्या. तिसऱ्या मजल्यावरून केबल्स टाकून त्या जमिनीत खोलवर दगडात रुतवल्या गेल्या.

शेजारपाजारच्या, घरच्या लोकांना हलवण्यात आलं. हे सर्व केलं गेलं. कारण पॅव्हियामधला सिव्हिक टॉवर पडला. मग पुन्हा जगभरातल्या इंजिनिअरनी डोकं लढवलं. तोपर्यंत टॉवर झुकण्याचा कोन कमी केला गेला नव्हता. तो ५.५ डिग्री होता. उंच बाजूखालची माती काढून तो कोन ३.३ डिग्री करण्यात आला. खालची जमीन अढळ करण्याचा (Stabilisation) प्रयत्न झाला. १५ डिसेंबर २००१ रोजी तो पुन्हा जनतेसाठी खुला केला. त्या वेळी तज्ज्ञांनी छातीठोकपणे सांगितलं, “त्याला पुढची तीनशे वर्ष काही होत नाही.” २००८ साली तज्ज्ञांनी जाहीर केलं, “त्याचं ‘झुकणं’ थांबलंय आणि हे इतिहासात प्रथमच घडलं.”

पिसा हा झुकलेला एकमेव मनोरा आहे का? मुळीच नाही. जर्मनीत तसे दोन वेल टॉवर्स आहेत. अबुधाबीमध्ये कॅपिटल गेट बिल्डिंग १८ अंश कोनात वाकलेय. न्यूझीलंडमध्ये वानाकात एक इमारत ५३ अंशात वाकली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या जोरावर त्या तशा उभारल्या गेल्या आहेत. पण पिसा टॉवरचं वैभव, प्रसिद्धी, वलय त्यांना नाही.  तिथून निघताना तो मनोरा डोळ्यांत काठोकाठ भरून घेतला.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.