दूधाचे दर का वाढलेत तर गुजरातच्या गायींमध्ये रोग आलाय, याचा फायदा महाराष्ट्राला..?

भारतात घरची चांगली परिस्थिती सांगायची असेल तर ‘आमचं घर दूध-दुपत्याने भरलेलं आहे’ असं म्हटलं जातं. इथेच दुधाचं महत्व अधोरेखित होतं. याच दुधासाठी श्वेत क्रांती करण्यात आली तर याच दुधाचे २ रुपयाने जरी भाव पडले तर अक्खं राजकारण ढवळून निघतं.

शेतकऱ्यांबद्दल सांगायचं तर शेतीला जोडधंदा म्हणून दुधानेच शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ पुरवलं आहे. याच दुधाच्या जोरावर कित्येकांनी बिजनेस उभा करत कोट्याधीश झाले आहेत. उदाहरण घ्यायचं तर अमूल, मदर डेअरी असे ब्रॅण्ड्स.

मात्र हे दूध ज्यांच्याकडून मिळतं त्याच गायींवर आज संकट कोसळलं आहे. तेही असं की त्यामुळे दुधाच्या उत्पादनावर परिणाम होत असून अमूल कंपनी देखील टेन्शनमध्ये आली आहे. या संकटांचं नाव आहे…

लंपी स्किन डिसीज

लंपी स्किन हा गुरांना होणारा त्वचेचा रोग आहे, जो सध्या झपाट्याने पसरताना दिसत आहे. गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, अशा जवळपास ८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या रोगामुळे त्रस्त झाले आहेत. जवळपास ७,३०० गुरं यामुळे दगावले आहेत. 

इंडिया टुडेच्या अहवालानुसार, या दगावलेल्या ७,३०० गुरांपैकी पंजाबमध्ये ३ हजार ३५९, राजस्थानमध्ये २, हजार १११, गुजरातमध्ये १ हजार ६७९, जम्मू-काश्मीरमध्ये ६२, हिमाचल प्रदेशात ३८, उत्तराखंडमध्ये ३६ आणि अंदमान निकोबारमध्ये २९ गुरांचा समावेश आहे.

तरी, ही केवळ शेतकऱ्यांनी, व्यावसायिकांनी पाळलेल्या गुरांची अधिकृत आकडेवारी आहे. भटक्या गुरांची दखल घेतली जात नसल्यामुळे अनधिकृत संख्या खूप जास्त असू शकते. शिवाय पावसाळा संपण्यापूर्वी जनावरांना लस दिली नाही तर दूध उत्पादन आणि वितरणाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असं अभ्यासक सांगत आहेत. 

कारण या रोगाचा दुधाच्या उत्पादनावर परिणाम होतोय. मोठे दूध व्यावसायिक तर यामुळे चिंताग्रस्त झाले आहेच मात्र लहान शेतकऱ्यांना याचा सर्वात जास्त फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

म्हणूनच काय आहे हा लंपी स्किन रोज? त्याची लक्षणं, उपाय काय? आणि महाराष्ट्रात त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो का? हे सगळं बघणं गरजेचं आहे. 

लंपी स्कीन एक हा विषाणूजन्य रोग आहे. ‘लंपी स्किन डिसीज व्हायरस’मुळे तो होतो. कॅप्रीपॉक्स या प्रवर्गात मोडणाऱ्या या विषाणूचा प्रादुर्भाव प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना म्हणजेच गाई, बैल, वासरे यांना होतो. तर सर्व साधारणपणे देशी गोवंशापेक्षा संकरीत जनावरं या विषाणूला लवकर बळी पडतात. 

हा संसर्गजन्य रोग असून याचा प्रसार डास, माश्या, गोचीड यांच्या मार्फत होतो. उष्ण आणि आद्र हवामानात या रोगाचा जास्त प्रसार होतो. गायी, म्हशींच्या कोणत्याही वयोगटातील गुरांना या आजाराची लागण होत असून लहान वासरांमध्ये देखील रोगाची तीव्रता अधिक दिसून येते. 

या रोगाचा प्रसार साधारण १०-२०% टक्के जनावरांमध्ये होतो. तर गुरांच्या मृत्यूचं प्रमाण १-५% टक्के इतकं आहे.

आपल्या जनावरांना हा आजार झालाय का, हे कसं ओळखायचं?

या आजाराच्या लक्षणांत ताप येणं, वजन कमी होणं, लाळ वाहणं, डोळे आणि नाकातून पाणी येणं, कमी दूध येणं, शरीरावर आणि शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी येणं याचा समावेश होतो. या रोगात त्वचा खराब होत असल्याने जनावरं खूप विकृत दिसतात. 

सोबतच यामुळे मादी गुरांना वंध्यत्व, गर्भपात, न्यूमोनिया, अपंगपणा याचा त्रास सहन करावा लागत असल्याचंही दिसून आलं आहे.

लंपी व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर हा व्हायरस १- २ आठवड्यापर्यंत रक्तामध्ये राहतो. हळूहळू शरीराच्या इतर भागात पसरत जातो. नाकातील स्त्राव, डोळयांतील पाणी आणि तोंडातील लाळेतुन हा विषाणू बाहेर पडल्याने चारा आणि पाणी दुषित होतो आणि अशाप्रकारे इतर जनावरांना या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. 

त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू जास्तीत जास्त ३५ दिवस जिवंत राहू शकतो. तर गाभण जनावरांत या आजाराची लागण झाली तर गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो.

मात्र याचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे जनावरांची दूध देण्याची क्षमता घटते आणि काही वेळा तर  गर्भपात होऊन प्रजनन क्षमता देखील घटते. याच गोष्टीने शेतकऱ्यांना आणि दूध व्यावसायिकांना टेन्शनमध्ये आणलं आहे.

गुजरातमध्ये दुधाच्या उत्पादनात दिवसाला सुमारे ५०,००० लिटरने घट झाली आहे. गेल्या चार महिन्यांत सुमारे  ३३ पैकी २२ जिल्ह्यांमधील सुमारे ७०,००० गायींवर त्याचा परिणाम झाला आहे. 

जीसीएमएमएफचे उपाध्यक्ष आणि सरहद डेअरीचे अध्यक्ष यांच्या मते, गायींच्या दुधाच्या उत्पादनात ५०-७०% घट झाली आहे. 

जर या रोगावर आळा घातला गेला नाही तर भविष्यात गुजरातमध्ये गायीच्या दुधाचं संकट येण्याची भीती आहे. इतकंच नाही तर सर्वात जास्त प्रभावित जिल्हा कच्छ आहे कारण तिथे पशुधनाची संख्या सर्वात जास्त आहे. 

या आजारामुळे कच्छमध्ये गायीच्या दूध संकलनाचं उत्पादन दररोज १५ ते २० हजार लिटरनं घटलं आहे.

गुजरातमध्ये पसरणाऱ्या या रोगामुळे अमूल कंपनीला मोठा फटका बसत आहे, कारण अमूलने प्रामुख्याने कच्छ आणि सौराष्ट्रात दूध संकलन करतो. त्यांना दूध खरेदीत दररोज ५०,००० लिटरचा तोटा सहन करावा लागत आहे. 

तेव्हा अखेर अमूलनेच या रोगाच्या प्रतिबंधासाठी पाऊलं उचलली आहे.

सरकारने यासाठी देशभरातील राज्यांमध्ये लसीकरण मोहीम सुरु केली आहे. गुजरातमध्ये सुरू असलेल्या व्यापक लसीकरण कार्यक्रमाबद्दल बोलताना अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोढी म्हणाले आहेत की, सुदैवाने एक अतिशय परवडणारी लस उपलब्ध आहे.

लंपी स्किन डिसीजवर वापरण्यात येत असलेल्या गोटपॉक्स लसीची किंमत ६.५ रुपये असून, सहकारी संस्थांच्या डॉक्टरांच्या मदतीने जिल्हा प्रशासन ती मोफत देत आहे. गुजरात सरकार आणि अमूल गुरांच्या लसीकरणासाठी एकत्र काम करत आहेत. 

अमूलमध्ये १ हजार १०० हून अधिक पशुवैद्यक आहेत जे प्रसार नियंत्रित करण्यासाठी या लसीकरण मोहिमेवर काम करत आहेत.

‘मिल्कमॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. वर्गीस कुरियन यांनी घडवून आणलेल्या दूध क्रांतीसाठी ‘आनंद’ प्रसिद्ध आहे. आनंदमध्ये सुमारे २७ ते २८ लाख जनावरांना यापूर्वीच लस देण्यात आली आहे, असंही सोढी यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात याचा प्रभाव होण्याची शक्यता किती आहे?

महाराष्ट्रासाठी हा रोग काही नवीन नाहीये. महाराष्ट्रात हा रोग २०२०-२१ मध्येच येऊन गेला आहे. या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण केलं गेलंय. म्हणून जनावरांमध्ये आवश्यक तेवढी प्रतिकारशक्ती तयार झाली आहे, असं तज्ज्ञ सांगतात.

असं असलं तरीही गुजरातमधील स्थिती पाहता सावध राहणं कधीही चांगलं असा सल्ला अभ्यासक देतात. त्यासाठी गोठ्यामध्ये स्वच्छता राखणं, जनावरांवर ताण येणार नाही अशा प्रकारे जनावरांचं व्यवस्थापन करणं आणि तरी रोगाचा जनावरांना प्रादुर्भाव झाला तर ताबडतोब जनावरांची रोग प्रतिकारशक्ती वाढेल, यासाठी उपचार करणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.