कारगिल युद्ध , सर्जिकल स्ट्राईक ते आजचा एयर स्ट्राईक या मागे आहे हा शूर योद्धा.

आज पहाटे साडेतीनच्या सुमारास भारतीय हवाईदलाच्या १२ विमानांनी पाकव्याप्त काश्मीर मधील बालाकोट येथे असलेल्या जैश ए मोहम्मदच्या लष्करी तळावर हल्ला केला. काही दिवसापूर्वी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे हे प्रत्युत्तर होते. ही मोहिम पार पडली सध्याचे वायुदलप्रमुख एअरचीफ मार्शल बिरेंद्रसिंह धनोआ यांच्या नेतृत्वाखाली.

एअरचीफ मार्शल धनोआ यांच्या घरात लष्करी शिस्तीची परंपराच आहे. त्यांचे आजोबा कप्टन संतसिंह यांनी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश रॉयल आर्मीकडून सहभाग घेतला होता. जपान विरुद्धच्या युद्धात त्यांनी केलेल्या पराक्रमाच्या कथा आजही त्यांच्या पंजाबमधल्या घरुआन गावात सांगितल्या जातात. बिरेंद्रसिंह धनोआ यांचे वडील एसएस धनोआ हे एक आयएएस अधिकारी होते. पंजाब व बिहार राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.

असा हा देशसेवेचा वारसा बिरेंद्रसिंह धनोआ यांच्यापर्यंत चालत आला होता. मसुरी येथील सेंट जॉर्ज महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, राष्ट्रीय भारतीय सैनिकी महाविद्यालय येथे प्रशिक्षण घेऊन जून १९७८ मध्ये ते हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून दाखल झाले. मिग २१, सुखोई ३०, मिग २९, जग्वार अशा वेगवेगळ्या क्षमतेच्या लढाऊ विमानांच्या सारथ्यामुळे हवाई प्रशिक्षक म्हणून त्यांची खास ओळख झाली. 

१९९९ सालच्या भारत पाकिस्तान युद्धात एअरमार्शल धनोआ यांच्या अनुभवाचा वापर करण्यात आला. मर्यादित युद्धात हवाई दलाचा वापर सहसा केला जात नाही. त्यामुळे कारगिल युद्धातही तो प्रारंभी टाळण्यात आला. कारण, हे दल रणांगणात उतरल्यानंतर युद्धाचे स्वरूप बदलण्याचा धोका असतो.

कारगिल वेळी अखेरच्या टप्प्यात हा धोका पत्करून हवाई दलाने ‘सफेद सागर’ मोहिमेद्वारे भेदक माऱ्याने घुसखोरांना धडा शिकविला. या मोहिमेची जबाबदारी ज्या लढाऊ विमानांच्या तुकडीवर होती, तिचे नेतृत्व केले एअर मार्शल बीरेंद्र सिंग धनोआ यांनी.

रात्रीच्या वेळी ताबा रेषेचे उल्लंघन न करता पर्वतीय क्षेत्रात दडून बसलेल्या घुसखोरांना हवाई हल्ल्यांद्वारे जेरीस आणण्यासाठी एक प्रकारची सर्जिकल स्ट्राईक त्यांनी केली होती. सिमला कराराचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊन कारगिल युद्धात अवघड भौगोलिक परिस्थितीत भारतीय हवाई दलाने ही कामगिरी फत्ते केली आणि त्याचे श्रेय या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या  एअर मार्शल बीरेंद्र सिंग धनोआ. या पराक्रमासाठी त्यांना युद्ध सेवा मेडल आणि वायू सेना मेडल प्रदान करण्यात आले.

३१डिसेंबर २०१६ रोजी तब्बल ३८ वर्षाच्या त्यांच्या वायूदलाच्या अनुभवानंतर त्यांची नियुक्ती वायुदलाचे प्रमुख एयरचीफ मार्शल म्हणून करण्यात आली. सर्जिकल स्ट्राईकवेळी  बीरेंद्र सिंग धनोआ यांचा भूमिका मोठी मानली जात होती. त्यांच्या सर्जिकल स्ट्राईकबद्दलच्या गाढ्या अनुभवामुळे त्यांना सर्जिकल स्ट्राईकचे  स्पेशालीस्ट म्हणून ओळखले जाते.

त्यांनी आज बालाकोट येथे केलेल्या नव्या एयर स्ट्राईकवरून सिद्ध केले की देशावर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या आर्मी नेव्ही प्रमाणेच आपले एयरफोर्स सुद्धा सुसज आहे. या वायुदलाचे सारथ्य एअर चीफ मार्शल बीरेंद्र सिंग धनोआ यांच्यासारख्या शूर योद्ध्यांकडे आहे ही देशवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.