प्रत्येक गोळी मारताना हल्लेखोर “गोल” म्हणून ओरडत राहिलां-
पाब्लो आणि आंद्रेस एस्कोबार
कोलंबियाच्या मेडेलिन शहराने जगाला दिलेले दोन एस्कोबार. नावातील साधर्म्य सोडलं तर संपूर्ण आयूष्य एकदम विरुद्ध जगलेलं, एकाने ड्रग्सच्या व्यवसायामुळे संपूर्ण देशाला वेठीस धरल होतं तर दुसरा फुटबॉलच्या माध्यमातून कोलंबियन जनतेला थोडाफार का होईना जल्लोष करायची संधी देत होता.
संपूर्ण कोलंबिया ‘मेडेलिन कार्टेल, काली कार्टेल‘ अशा वेगवेगळ्या ड्रग्स माफियांच्यात विभागाला गेला असताना आंद्रे एस्कोबारचा कोलंबियन फुटबॉल संघच त्यांना एक देश म्हणून एकत्र बांधून ठेवत होता. दुर्दैवाने या दोघांचाही खून ड्रग्स माफियांनी केला फरक एवढाच कि, पाब्लो एस्कोबारने जवळपास ६००० पेक्षा जास्त लोकांची हत्या करुन देशात अराजकता माजवली होती तर आंद्रेस एस्कोबारने कोणताही खेळाडू करतो अशी एकच चूक केली होती.
कोलंबियाचा गोल्डन एरा –
१९९० चे दशक कोलंबियन फुटबॉल संघासाठी ‘गोल्डन एरा‘ होता. पेले पासून जगभरातील फुटबॉल पंडितांचा दावा होता कि १९९४ चा वर्ल्ड कप जिंकणे ही कोलंबियासाठी फक्त औपचारिकता आहे. त्यामागे कारण देखील तसच होत. १९९४ च्या वर्ल्डकपसाठी पात्रता फेरी खेळताना फक्त २ गोल स्वीकारले होते तर अर्जेन्टिना सारख्या बलाढ्य संघाला ५–० अस हरवल होत. कोलंबियाच्या या प्रदर्शनात महत्वाचा वाटा होता तो आंद्रेस एस्कोबारचा. कोलंबियाचा सर्वात मजबूत डिफेन्डर, संपूर्ण पात्रता फेरीत संघ फक्त दोनच गोल स्वीकारतो यावरून एस्कोबार च्या खेळाचा अंदाज आपल्याला येऊ शकतो.
एस्कोबार आपल्या मैदानावरील तसेच मैदानाबाहेरील वागण्यामुळे “द जेंटलमेन ऑफ फुटबॉल“ या नावाने ओळखला जात होता.
कोलंबियन संघाच्या या प्रदर्शनामुळे जेवढा उत्साह कोलंबियन जनतेत होता त्यापेक्षाही जास्त उत्साह कोलंबियातील ड्रग्स माफियांच्यात होता. या माफियांनी कोलंबियन टीमवर शेकडो कोटी रुपयांचा सट्टा लावायला सुरुवात केली. परंतू याचा उलटा परिणाम कोलंबियाच्या संघावर झाला. कोणते खेळाडू खेळवावे कोणते खेळवू नये यासाठी संघ प्रशिक्षकांवर या माफियांचा दबाव वाढू लागला. सामना जिंकलाच पाहिजे यासाठी खेळाडूंना धमक्या येऊ लागल्या, खेळाडू प्रचंड मानसिक दडपणखाली गेले आणि याचा व्हायचा तो परिणाम झालाच, वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात दुबळ्या रोमानियाविरुद्ध कोलंबियाला पराभव पत्करावा लागला. माफिया जगातून खेळाडूंना येणाऱ्या धमक्या अजूनच वाढल्या, अमेरीकेविरुद्धच्या सामन्याआधी तीन तास एका खेळाडूला या माफियांनी जबरदस्तीने निवृत्ती घ्यायला लावली.
२२ जून १९९४ रोजी अमेरिकेविरुद्ध होणारा हा सामना जिंकण कोलंबिया संघासाठी अत्यंत महत्वाच होत कारण आता सामना फक्त वर्ल्ड कप पुरता मर्यादित न राहता त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या जीवन मरणाचा प्रश्न बनला होता.
याच दबावाखाली सामन्याला सुरुवात झाली, अमेरिकेचा अटॅक वाढत होता. ३४ व्या मिनिटाला अमेरिकन स्ट्रायकर ने मारलेला एक फटका डिफेन्डर आंद्रेस एस्कोबारच्या पायाला लागून बॉलची दिशा बदलली, गोलकिपरचा गोंधळ उडाला आणि कोलंबियाचा Own Goal झाला.
कोणत्याही फुटबॉलर होऊ शकणारी ही अत्यंत प्रामाणिक चूक होती परंतु या शुल्लक चुकीची एवढी मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल याचा अंदाज एस्कोबारला नव्हता. कोलंबिया सामना २–१ ने हारला. वर्ल्ड कपचा सर्वात प्रबळ दावेदार मानला जाणारा संघ पहिल्याच फेरीत बाहेर पडला. संपूर्ण देशाचा अपेक्षाभंग झाला परंतू सर्वात जास्त दुखावला गेला तो कोलंबियातील माफिया आणि त्याला कारणही ही तसच होत, एस्कोबारच्या त्या एका शुल्लक चुकीमुळे माफियांचे शेकडो कोटी बुडाले होते.
या घटनेनंतर एस्कोबारच्या कुटुंबियांचा त्याच्या देशात परत येण्याला विरोध होता, परंतु एस्कोबारला आपल्या देशवासीयांवर विश्वास होता, त्याला माहित होत कि आपल्या या चुकीला आपले लोक माफ करतील. तस आवाहन देखील त्यान देशवासियांना केल होत. कोलंबियात परतल्यानंतर स्थानिक वर्तमानपत्रात एक लिहला होता,
“जीवन इथेच संपत नाही, झालेल्या गोष्टी विसरून आपल्याला पुढे चालावं लागेल….”
अशा ओळीनी सुरुवात करून या लेखाद्वारे आपल्याला माफ करण्याच आवाहन त्यान देशाला केल होत.
कदाचित कोलंबियन जनतेने त्याला माफ देखील केल असत , पण एस्कोबारच्या एका चुकीमुळे कोट्यवधी रुपये बुडालेल्या ड्रग्स माफियांनी त्याला माफ केल नाही. वर्ल्डकपहून परतल्यानंतर आठच दिवसात २ जुलै १९९४ ला मेडिलीन मधल्या एका नाईटक्लबच्या कार पार्किंग मध्ये एस्कोबारला दोन मारेकर्यानी सहा गोळ्या घालून ठार केले. प्रत्येक गोळी मारताना हल्लेखोर “गोल“ असे ओरडत होते, एस्कोबारच्या एका गोलचा बदला त्यांनी त्याला सहा गोळ्या घालून घेतला होता.
पुढे चौकशी झाली, वर्ल्डकपच्या सट्ट्यात पैसै हरलेले गलोन ब्रदर्स या माफियांच नाव त्याच्या हत्येत समोर आलं.