हा माणूस नसता तर दिल्लीचं कोलंबिया झालं असतं हे नक्की..!

ड्रग्स म्हंटल की आपल्याला पहिल्यांदा नाव आठवायचं ते कोलंबियाच्या दी पाब्लो एस्कोबारचं. त्याच्या ड्रग्सचे तस्करीचे किस्से काय सांगायचे भावा. आपल्या कानाच्या, डोक्याच्या आणि अंगात असतील नसतील त्या सगळ्या फ्युजा उडतील. पण तरी सांगतो, पाब्लो दिवसाला जवळपास १५ टन कोकेन विकायचा. अरे भावा, खरचं सांगतोय तर. १५ किलो नाही रे, १५ टन. म्हणजे १००० किलोचा एक टन असतो आणि १००० ला १५ ने गुणलं की १५ हजार किलो होत. तेवढं ड्रग्स तो दिवसाला विकायचा.

आता तुम्ही म्हणाल मग हे सगळं आता का सांगायला लागलाय?

तर दिल्लीचे माजी डीजीपी अमोद कंठ यांनी त्यांच्या ‘खाकी इन डस्ट स्ट्रोम’ या  पुस्तकात १९८०-९० च्या दशकात ड्रग्सच्या बाबतीत दिल्लीच कोलंबिया कसं झालेलं आणि ते त्यांनी पुन्हा कसं माणसात आणलं याची गोष्ट सांगितली आहे.

१९८५ मध्ये आमोद कंठ यांनी ॲन्टी नार्कोटिक्स विभागाची जाबाबदारी स्विकारली. ते जवळपास ५ वर्ष या पदावर होते.

ड्रग्स ट्राफिकिंगची सुरुवात दिल्लीत १९८० च्या सुरुवातीच्या दशकात झाली होती. यात विशेषतः हेरॉइनचा समावेश होता, ज्याला स्मॅक म्हणून ओळखलं जातं. या हेरॉईनमध्ये दिल्लीची तरुण पिढी अक्षरशः वाहवत चालली होती.ही हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रणात आणणं हे केंद्र सरकार, नार्कोज आणि दिल्ली पोलीस यांच्यासमोचं मोठं आव्हान बनलं होत. पण हेच आव्हान स्विकारुन त्यांनी त्यावर काम करायला सुरुवात झाली.

पहिली सुरुवात झाली ती १९८५ साली नवीन एनपीडीएस कायद्याने. लहान मुलं आणि तरुण ड्रग्जच्या विळख्यात सापडल्याने सरकारने त्यावर्षी यासंबंधीचा एनपीडीएस अर्थात ‘नार्कोटिक्स ड्रग्ज ॲन्ड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस ॲक्ट 1985’ संमत केला होता.

याच कायद्यानंतर कंठ यांच्या टिमने अत्यंत वेगाने ड्रग्ज माफियांचा अभ्यास करून पावलं उचलायला सुरुवात केली. ड्रग्स विकणाऱ्या आणि घेणाऱ्या अश्या जवळपास ५ हजार ८३४ जणांचा तपास करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांचा अभ्यास करण्यात आला.

या सर्वांच्या अभ्यासादरम्यान कंठ यांच्या लक्षात आले की दिल्ली सोबतच देशातील इतर शहरात विशेषतः पंजाब, जम्मु-काश्मिर, राजस्थान यासारखी सीमाशेजारची राज्य, केरळ, आंध्रा, तमिळनाडू या किनारपट्टीवरील राज्यांमध्ये देखील १९८० च्या दशकात ड्रग्ज ट्राफिकिंगची आणि त्यामुळे घडणाऱ्या विविध गुन्ह्यांची परिस्थिती अत्यंत भयावह होती.

क्राईम ब्रांचने केलेला अभ्यास हा केंद्र सरकार, नार्कोटिक्स, पोलिस यांना तर चहुबाजुंनी विचार करायला उपयोगी पडलाच. त्यामुळे त्यांना हे सगळं नियंत्रणात आणण्यासाठी एक नियोजनबद्ध प्लॅन तयार करता आला. पण त्यासोबत पत्रकार, विचारवंत, विद्यार्थी यांना देखील वास्तवातील अवस्था काय आहे हे समजण्यास मदत झाली होती.

कंठ या पुस्तकात पुढे सांगतात,

काही पोलिस देखील या ड्रग्जच्या विळख्यात आले होते. पण त्यांनी हे सिद्ध केल की अमली पदार्थ विरोधी औषोधोपचार पद्धती ही एक सर्वोत्तम पद्धत होती. त्यातील २ चांगले आणि मोठ्या पदावरील पोलीस तर एकेकाळी ड्रग्सच्या अगदी अधीन गेले होते. आयुष्य उध्वस्त होण्याच्या वाटेवर होते. पण त्यांनी देखील स्वतःला यातुन बाहेर काढलं होती.  

कंठ म्हणतात, शेवटी किती झालं तरी हे आपल्याला मान्य करावं लागतं की ही एक मानवनिर्मीत आपत्ती होती. आणि ड्रग्ज घेण्याच्या इच्छेने ही आपत्ती जिवंत ठेवली होती.

ड्रग्जची मागणी आणि पुरवठा ही एक संघटित गुन्हेगारी बनली होती. ते घेणं आणि त्याच्या आहारी जाणं यातुन काहीच कालावधीत ड्रग्जच्या ट्राफिकींग सोबत वेगळे गुन्हे घडायला सुरुवात व्हायची. आणि हे सगळे गुन्हेगार एकमेकांमध्ये इंटरलिंक असायचे. एक पोलिस ऑफिसर म्हणून कंठ यांना प्रत्येक पातळीवर वेगळ्या पद्धतीने हाताळणी करावी लागायची.

भारतात हे ड्रग्स येत होते ते पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण या तीन देशांमधून. इथली तिन्ही देशांमधील संस्कृती जवळपास सारखीच. फुटीरतावाद्यांमुळे देशाचा स्वभाव देखील सारखाच. भारतात या तीन देशांना बेकायदेशीर ड्रग्ससाठीचे गोल्डन क्रेसेंट म्हंटल जायचं. २१ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत हे ड्रग्जसाठी सुशेगात असलेली सर्वात मोठं केंद्रे बनली होती.

त्याचवेळी म्यानमार, लावोस, थायलंड हा गोल्डन ट्रॅन्गल देखील शीतयुद्धापर्यंत बेकायदेशीर ड्रग्जचं हब बनलं होतं. जे पुढे शतकाच्या शेवटापर्यंत होते. भारतात देखील अफु आणि हशीम यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर होतं.

दिल्ली ही दोन्ही प्रकारच्या ड्रग्ज बेस्ड क्राईमच्या विळख्यात होती. कंठ सांगतात,

जरी या तीन देशांमधून ड्रग्स येत असले तरी माझ्या क्राईम ब्रांचच्या काळात दिल्लीमधील कोकेनच्या पुरवठ्याची साखळी ही कोलंबिया, पेरु, चिली या देशांपर्यंत जावून पोहचली होती. म्हणूनच मी म्हणालो की दिल्लीचं कोलंबिया होवू लागलं होते.

तिकडे म्यानमारमध्ये युनायटेड वा स्टेट आर्मी, किंवा म्यानमार ऑईल ॲन्ड गॅस एन्टरप्रायझेस या दोन्ही राज्यांकडून चालवल्या जाणाऱ्या संस्था. इथे खोलवर ड्रग्जची पाळमुळं रुजली होती. पण १९८५ च्या दशकात त्यांनी यातुन सावरत बाहेर पडायचं ठरवलं होतं.

म्यानमारमधील आंतराष्ट्रीय पातळीवर ड्रग्जचा गॉडफादर समजला जाणाऱ्या ‘चायनीज खुन सा’ याची देखील गती मंदावली होती. आणि नेमके त्याच वेळी गोल्डन क्रेसेंटने उचलं खाल्ली होती.

अफगाणी निर्वासितांच्या प्रभावातुन अफगानिस्तान हा अफुची निर्मीती करणारा जगातील सर्वात मोठा देश होता. दिल्लीमध्ये याची परिस्थीती खुपच भयावह आणि चिंताजनक होती. सोबतच हेरॉईनवर प्रक्रिया करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या देखील मोठी होती. हे पाकिस्तान – अफागिस्तानच्या सीमांमार्गे भारतात यायचं.

इराणमध्ये १९७९ च्या क्रांतीनंतर ड्रग्ज ट्राफिकर्सना थेट भारतात ड्रग्ज पाठवणं अवघड होवू लागलं. पण त्यांनी यावर देखील मार्ग शोधला होता. हे ट्राफिकर्स पाकिस्तानमार्गे ड्रग्ज भारतात पाठवू लागले होते. पाकिस्तानसाठी ही एक संधीच होती. ती त्यांनी पकडली. भारतात ड्रग्ज पाठवण्यासाठी प्रोत्साहन देवू लागले होते.

या सगळ्यावर ताबा मिळवता आला त्याची आपल्या पुस्तकात कंठ यांनी तीन कारण सांगितली होती. एक तर त्यांना कायद्याचा आधार होता. सोबतच ड्रग्ज स्पॉट, ट्राफिकर्स, पेडलर आणि डिमांडर या सगळ्यांची अचुक माहिती. आणि या सगळ्यांना पकडण्यासाठी कंठ यांच्या ग्रुपने छापेमारी, संशोधन आणि चौकशी यासाठी केलेलं टिम वर्क.

त्यांच्या टिमच्या मेहनतीचा निकाल दिसु लागला तो १९९० च्या दरम्यान. दिल्लीत ड्रग्जच्या ट्राफिकींगवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं होतं. पुर्ण भारत आणि त्यातही खास करुन दिल्ली दुसरी कोलंबिया होण्यापासून वाचवलं होतं.

कंठ सांगतात की, एक पोलिस म्हणून मला सतत जाणवत की, ड्रग्ज संबंधीत गुन्हे आणि त्यांची मागणी-पुरवठा हे सर्व तथाकथित शस्त्रास्त्र तस्करी, दहशतवाद, देह व्यापार आणि एड्स या बेकायदेशीर चालणाऱ्या परराष्ट्र व्यापारांशी जोडले गेलेले असते.

महासत्ता देश हे स्वतःच सर्वोच्च स्थान अबाधित राखण्यासाठी, अर्थव्यवस्था चालती ठेवण्यासाठी, आपल्या सार्वभौमत्वाला धक्का न लागण्यासाठी आणि त्याच बरोबर इतरांच्या अर्थव्यवस्थांचे शोषण करण्यासाठी किंबहूना क्रयशक्ती कमी करण्यासाठी ड्रग्ज सारख्या गोष्टींना करण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. लॅटिन अमेरिका, दक्षिण आशिया, मध्य-पुर्व देश, आफ्रिकन देश आणि भारत अशा देशांमध्ये या गोष्टी करण्यासाठी चालना देत असतात.

चीनने ब्रिटीशांच्या अमली पदार्थांच्या साम्राज्यावादाचा प्रतिकार केल्यामुळे त्यांना १८३९ ते १९६० या काळात दोन अफु युद्ध लढायला लागली होती. जी भारतामधील साम्राज्यवादाची पुर्वसुचना ठरली होती.

भारतात देखील आयएसआयचे शस्त्रास्त्र तस्करी, दहशतवाद यासोबतच बेकायदेशी ड्रग्जच्या व्यापारात सहभाग असल्याचे पुरावे मिळाले होते. मुजाहीद्दीन, आयएसआय यांनी व्यापार सुरु ठेवून यातुन मिळणाऱ्या पैशांचा उपयोग काश्मिरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी वापरले होते.

राजीव गांधी यांच्या हत्येच्या चौकशी दरम्यान कंठ यांना दिसलेली गोष्ट म्हणजे तमिळनाडू पासून केवळ ४० किलोमीटर लांब असलेल्या वेंद्यारण्यम किनाऱ्यावर एलटीटीई पुरस्कृत नर्को दहशतवाद संपुर्ण देशात पसरवण्याचा कार्यक्रम चालू होता.

भारतात बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये अफुमुळे झालेल्या नुकसानींचे आकडे इतिहासकार आणि अर्थशास्त्रज्ञ यांच्याकडे आजही उपलब्ध आहेत. आजही अफुमुळे झालेल्या आर्थिक, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, संपत्ती, नुकसानीचे परिणाम इथल्या संपुर्ण भागावर दिसून येत असतात

वर सांगितल्याप्रमाणे दिल्लीत कंठ यांनी जवळपास ५ हजार ८३४ जणांना अटक केली होती. विभागनिहाय मध्ये १५०७ उत्तर दिल्ली, २ हजार २५२ मध्य दिल्ली, ५५४ पुर्व, २५७ नवी दिल्ली, ६२३ पश्चिम ४०१ मध्य आणि २४० दिल्ली पोलिस आणि पालम विमानतळ पोलिस अशांचा समावेश होता.

या अटक केलेल्या ५ हजार ८३४ जणांपैकी ४ हजार ३६५ जणं हे ड्रग्जच्या अगदी आहारी गेले होते. तर १ हजार ४६९ जण विक्रेता होते. दिल्लीसारख्या दाटीवाटीच्या शहरात जिथं डोक्याला डोक लावून माणसं राहतात अशा ठिकाणी यांना शोधण, पकडणं हे कंठ यांच्या समोरच मोठ आव्हान होतं. सीमापुरी, टिळकनगर अशा भागात हे आव्हान त्यांना जास्त जाणवलं. पण तरी देखील हे स्विकारत त्यांनी दिल्लीला कोलंबिया होण्यापासून वाचवलं होतं.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.