या भिडूने एकट्याच्या हिंम्मतीवर तिसरं महायुद्ध टाळलं होतं.

स्तेनिस्लाव पेट्रोव या भिडू माणसाचं नाव माहिती असण्याचा प्रश्नच येत नाही.  मुसोलिनी, हिटलर, बिस्मार्क, चर्चिल असल्या बलाढ्य नावांपुढे या स्तेनिस्लाव पेट्रोवची अगरबत्ती कुठे लावतो असा प्रश्न तुम्ही विचारू शकता. पण यापुढे जे वाचाल ते वाचून झाल्यानंतर मनापासून या माणसाचे उपकार मानाल.

आपण आर्मीतल्या लोकांचे किस्से वाचतो. कशाप्रकारे त्याने समोरच्या शे पाचशे लोकांना ठार केलं हा इतिहास आपणाला आवडतो. पण काही अशी माणसं देखील असतात ज्यांच्या एका निर्णयातून लोकांच भलं होतं.

असाच एक स्तेनिस्लाव पेट्रोव. त्याच्या एका निर्णयामुळे जग वाचलं.

ही त्याची गोष्ट…

पेट्रोव हा सोव्हियत रशियाच्या हवाई सुरक्षा दलामध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत होता. त्याच्याकडे सोव्हियत रशियातील ओको शहरात असणाऱ्या आण्विक पूर्व चेतावणी केंद्राची जबाबदारी होती. न्युक्लिअऱ मिसाईन वार्निंग सिस्टिम अस त्या केंद्राच सोप्प नाव.

इथे एका मोठ्या पडद्यावर रडार यंत्रणा सज्ज असायची. उपग्रहामार्फत रशियाच्या संपुर्ण सीमांवर बारीक लक्ष ठेवलं जातं असे. दूसऱ्या कोणत्याही देशाने रशियाच्या दिशेने आण्विक क्षेपणास्त्र डागले असते तर त्याची सूचना या केंद्रावर मिळत असे. इथला इनचार्ज ४४ वर्षाच्या पेट्रोवकडे होता. इनचार्ज असणाऱ्या माणसाचा प्रोटोकॉल काय होता तर आण्विक हल्ला झाल्यानंतर त्याने ती सूचना वरती सांगायची व तिथून थेट ज्या देशाकडून आण्विक हल्ला होतोय त्या देशावर प्रतिहल्ला म्हणून आण्विक हल्ला करायचा. आपण मरणार आहोत तर समोरच्याला घेवून मरू असा साधा नियम होता.

ती तारिख होती २६ सप्टेंबर १९८३.

या तारखेच्या तीन आठवड्यांपूर्वी सोव्हियत रशियाने कोरियाचे एक प्रवासी विमान पाडले होते. या हल्ल्यात २६९ नागरिकांचा बळी गेला होता. रोनाल्ड रीगन यांनी रशियाचा वाईट लोकांच साम्राज्य असा उल्लेख केला होता. यूरी येंद्रोपोव हे कम्युनिस्ट पार्टीचे जनरल सेक्रेटरी होते आणि त्यांच ठाम मत झालेलं की अमेरिका आपणावर कोणत्याही क्षणी आण्विक हल्ला करेल.

शीतयुद्ध आपल्या अंतीम टोकाला येवून पोहचले होते. कोणत्याही क्षणी अमेरिका आणि सोव्हियत रशिया एकमेकांसमोर उभा राहण्याची चिन्ह होती. अशात ती तारिख आली.

२६ सप्टेंबर १९८३.

या दिवशी न्युक्लिअर हल्ल्याची कल्पना देणाऱ्या केंद्राचा इनचार्ज होता, स्तेनिस्लाव पेट्रोव. त्याने नाईट शिफ्ट पुर्ण केली होती. नेहमीप्रमाणे तो समोरच्या स्क्रिनवर लक्ष ठेवून होता. अशातच एक सिग्नल वाजू लागला. हा सिग्नल अमेरिकेकडून झाले आण्विक हल्ल्याचा होता. एक मिसाईल रशियाच्या दिशेने येत असल्याचं स्क्रिनवर दिसत होतं. पेट्रोव जागेवर स्तब्ध झाला. तो उठून उभा राहतो तोच एकामागून एक चार सिग्नल वाजू लागले. स्क्रिनवर एकूण पाच मिसाईल रशियाच्या दिशेने येताना दिसू लागल्या.

पेट्रोव्हच्या समोर प्रोटोकॉल होता. आत्ता याची कल्पना वरची देणं आणि रशिया देखील अमेरिकेवर आण्विक मिसाईल डागणार हे सोपस्कार पुर्ण होणार होते. समोरुन हल्ला झाल्यामुळे अधिक शहानिशा न करता फक्त केंद्रावर असणाऱ्या इनचार्जचा शब्द मान्य करण्याचा प्रोटोकॉल होता. त्याने सांगतातच मिसाईल अमेरिकेच्या दिशेने सुटल्या असत्या.

स्तेनिस्लोव पेट्रोवच्या हातात फक्त ३० मिनीटे होती. इतक्या वेळात त्याला फोन करुन दोन्हीपैकी एक सूचना द्यावी लागणार होती.

पहिली.

अमेरिकेने रशियाच्या दिशेने एकूण पाच मिसाईल डागल्या आहेत. प्रत्युउत्तर म्हणून आपण अमेरिकेच्या दिशेने आण्विक मिसाईल डागाव्यात.

दूसरी.

रडार यंत्रणेत दोष आहे.

दूसरी सुचना देणारा माणूस मुर्ख असावा. कारण मिसाईल येत असल्याचे थेट दिसत असताना त्यावर विश्वास न ठेवून त्याने यंत्रणेतील दोष काढली असती आणि मिसाईल रशियावर पडली असती तर याच माणसाला इतिहासाने कधी माफ केले नसते.

पण स्तेनिस्लाव पेट्रोव्ह या वेगळा माणूस होता. त्याच्या बरोबरचे अधिकारी सैनिक शाळांमधून आलेले होते. हा मात्र सामान्य नागरिकांसाठी असणाऱ्या शाळेत शिकला होता. सैनिक शाळांमध्ये लहानपणापासून अनुशासन शिकवले जात असे. पेट्रोव्ह मात्र दूनियादारीत जगलेला माणूस होता.

तो काही मिनीट स्तब्ध झाला आणि विचार करू लागला.

पहिली शक्यता होती की अमेरिकेने खरच आण्विक हल्ला केला असेल का. त्याला स्वत:ला अमेरिका असा निर्णय घेईल असे वाटत नव्हते. दूसरी गोष्ट म्हणजे अमेरिका एकाच वेळी पाच मिसाईल डागणार नाही. त्याच्या मते रशियासारखा भौगोलिकदृष्ट्या मोठ्ठा देश संपवायचा असता तर अमेरिकेने शेकडो मिसाईल एकाच वेळी डागल्या असत्या. फक्त पाच मिसाईल डागून स्वत:लाच संपवून घेण्याचा मुर्खपणा अमेरिका करणार नाही.

त्याने अजून एक निर्णय घेतला तो म्हणजे सॅटेलाईट रडार ऑपरेटर्सना फोन करून त्यांना मिसाईलबद्दल काही माहिती आहे का ते घेण्याचा. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याला सांगण्यात आलं की असा कोणताही सिग्नल नाही. आत्ता 50-50 टक्के सिच्युएशन होती. त्यांना समोरचा प्रोटोकॉल पाळायला लागणार होताच.

वेळ जात होती. अखेर स्तेनिस्लाव यांनी सोव्हिएतच्या सेना मुख्यालयात फोन लावला आणि म्हणाले,

अर्ली वार्मिंग रेडार सिस्टिमध्ये दोष आलेला आहे.

बस्स !! आत्ता खरोखरच मिसाईल असतील तर स्तेनिस्लाव हा रशियाचा सर्वात मोठ्ठा व्हिलन ठरला असता. वेळ गेला आणि ठरलेल्या वेळात कोणताही हल्ला न झाल्याने स्तेनिस्लाव समाधानाने आपल्या जागेवर बसून राहिला.

चौकशी झाल्यानंतर उपग्रहातील बिघाडामुळे सिग्नल चुकीचे मिळाल्याची माहिती मिळाली. स्तेनिस्लावने प्रोटोकॉल पाळला असता तर त्याक्षणी सोव्हिएतने अमेरिकेवर आण्विक हल्ला केला असता आणि संपुर्ण जगात तिसऱ्या महायुद्धाला सुरवात झाली असती.

त्यांच्यावर २०१४ मध्ये एक शॉर्ट फिल्म काढण्यात आली. द मॅन हू सेव्ह द वर्ल्ड नावाच्या या फिल्ममध्ये स्तेनिस्लाव पेट्रोव्ह म्हणतो.

मी हिरो नाही, मी कोणतही अद्भूत काम केलं नाही. मी फक्त माझी ड्यूटी केली.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.