ठरलं सामना तिरंगी होतोय, पण मतदान कोण करतं ते समजून घ्या भावांनो..

इंदिरा गांधी 78-83, राजीव गांधी 85-91, नरसिंह राव 92-94, सिताराम केसरी 96-98, सोनिया गांधी 98-17, राहूल गांधी 2017-19 आणि पुन्हा सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदावर..

1978 ते 2022 गेल्या 44 वर्षात नरसिंह राव दोन वर्ष आणि सिताराम केसरी दोन वर्ष कॉंग्रेसचे अध्यक्ष राहिले. 44 वर्षांपैकी फक्त 4 वर्षच गांधी घराण्याच्या बाहेर कॉंग्रेसचं अध्यक्षपद जावू शकलं. सांगण्यासारखी दूसरी गोष्ट म्हणजे या 44 वर्षांच्या काळात फक्त दोन वेळाच कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूका झाल्या.

पहिली निवडणूक झाली होती ती 1996 साली. या निवडणूकीत शरद पवार, राजेश पायलट यांचा पराभव करत सिताराम केसरी अध्यक्ष झाले होते. दूसरी निवडणूक झाली होती ती 2000 साली. जे फक्त सोपस्कार होते. या निवडणूकीत सोनिया गांधींना 7,448 मतं मिळाली होती तर जितेंद्र प्रसाद यांना 94 मते मिळाली होती…

आत्ता गेल्या 40 वर्षात तिसऱ्यांदा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूका होत आहेत. मल्लिकार्जून खर्गे विरुद्ध शशी थरूर विरुद्ध केएन त्रिपाठी असा तिरंगी सामना होत आहे.

पण तुम्हाला माहित आहे का? या निवडणूकीत मतदान कोण करत? मतदान कसं पार पडतं? कॉंग्रेसच्या अध्यक्षनिवडीची प्रक्रिया काय असते?

त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपणाला समजून घ्यावं लागेल ते म्हणजे कॉंग्रेस पक्षाची अंतर्गत रचना..

कॉंग्रेस पक्षाचे पक्षांतर्गत चार स्तर आहेत…

या स्तरात सर्वात पहिल्या व खालच्या स्तरावर आहे ती म्हणजे,

  • ब्लॉक कमिटी, जिल्हा-शहर कॉंग्रेस समिती..

जिल्हा-शहर पातळीवर असणाऱ्या या समितीत देखील निवडणूक होते. पक्षाचे सदस्य अशा ठिकाणी आपले प्रतिनिधी निवडून देतात. पण सध्याचा मुद्दा असा आहे की बऱ्याच काळापासून या निवडणूका झाल्या नाहीत तर इथे प्रतिनिधी नियुक्तच करण्यात आलेले आहेत.

दूसरा स्तर येतो तो म्हणजे

  • प्रदेश कॉंग्रेस कमिटी अर्थात PCC

ब्लॉक कमिटी, जिल्हा-शहर कॉंग्रेस समितीचे प्रतिनिधी प्रदेश कॉंग्रेस कमिटीवर आपले प्रतिनिधी निवडून देत असतात. भारतातल्या प्रत्येक राज्यात एक प्रदेश कॉंग्रेस कमिटी असते. सध्या देशात एकूण 30 प्रदेश कॉंग्रेस कमिटी आहेत तर 5 केंद्रशासित प्रदेशात देखील प्रदेश कॉंग्रेस कमिटी आहेत. या एकूण 35 प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अंदाजे 9000 हून अधिक सदस्य आहेत जे कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी मतदान करतात..

आत्ता या सदस्यांबाबत पारदर्शकता आहे का? तर नाही. कारण बऱ्याच काळापासून प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या देखील निवडणूका न होता इथे प्रतिनिधी नियुक्त करण्यात आलेले आहेत. हे प्रतिनिधी नियुक्त करण्यात गांधी घराण्याचा शब्द अंतीम राहिलेला आहे.

बऱ्याचदा सत्तेचा बॅलन्स साध्य करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाकडून प्रदेश कॉंग्रेस कमिटीचा वापर करण्यात आला. म्हणजे कस तर आंध्रप्रदेशातील माजी मुख्यमंत्री YSR रेड्डी हे ताकदवान नेते होते, अशा वेळी प्रदेश कॉंग्रेस समितीत निवडणूका झाल्या तर त्यांच वर्चस्व निर्माण होवू शकलं असतं. सत्ता बॅलन्स करण्यासाठी अशा वेळी गांधी घराण्याने पर्यायी नेत्यांना प्रदेश कॉंग्रेस कमिटीमार्फत बळ दिलं. हे प्रतिनिधी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मतदान करतात…

आत्ता तिसऱ्या स्तरावर येते ती म्हणजे,

  • अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी अर्थात AICC..

दूसऱ्या स्तरावर असणाऱ्या प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सदस्य आपल्यातले 1/8 सदस्य अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीवर पाठवतात. जे संपूर्ण राज्यभरातून आलेले प्रतिनिधी असतात. देशपातळीवर कॉंग्रेसची जी बैठक होते, अधिवेशन होते त्यामध्ये हेच सदस्य सहभागी होतात. AICC चे एकूण 1500 सदस्य आहेत. जे प्रदेश कमिटीचे देखील सदस्य असतात. अर्थात ते देखील कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत मतदान करत असतात..

आत्ता सर्वात वरचा स्तर आणि महत्वाचा स्तर येतो तो

  • कॉंग्रेस वर्किंग कमिटी अर्थात CWC..

प्रदेश कॉंग्रेस कमिटी PCC आणि अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी AICC यामध्ये समन्वय साधण्यासाठी 1920 साठी CWC ची रचना करण्यात आली. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेणं, महत्वाचे निर्णय घेणं याच समितीकडून पाहिलं जातं. CWC मध्ये एकूण 23 अधिक दोन असे 25 सदस्य असतात.

हे अधिकचे दोन म्हणजे कॉंग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष व कॉंग्रेसच्या संसदिय समितीचा नेता. या दोन सदस्यांना सोडल्यानंतर राहतात ते 23 सदस्य. या 23 सदस्यांपैकी 11 सदस्य हे कॉंग्रेसचे अध्यक्ष नामनिर्देशित करतात तर 12 सदस्य निवडणूकांद्वारे निवडले जातात. या 12 सदस्यांना निवडणून देण्यासाठी AICC चे सुमारे 1500 प्रतिनिधी मतदान करतात…

G23 गटाने, गुलाम नक्बी आझाद, कपिल सिब्बल अशा अनेक जेष्ठ नेत्यांनी याच 12 जागांसाठी निवडणूक व्हावी यासाठी जोर धरला होता. त्यानंतर कॉंग्रेसकडून आत्ता या 12 जागांसाठी देखील निवडणूक होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. गेल्या 75 वर्षात फक्त दोन वेळाच या 12 जागांसाठी निवडणूका झाल्या आहेत. विशेष म्हणजे या दोन्हीवेळा गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती पक्षाचे अध्यक्ष होते..

CWC च्या पहिली निवडणूक झाली होती ती 1992 साली. AICC च्या तिरूपती येथे झालेल्या अधिवेशनात कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या निवडणूका होतील अस त्यांनी जाहिर केलं. निवडणूका झाल्या मात्र शरद पवार, राजेश पायलट, अर्जूनसिंह असे नेते निवडून आल्यानंतर या 12 जणांना अध्यक्ष या नात्याने बरखास्त केलं. 1997 साली CWC च्या दूसऱ्या निवडणूका झाल्या. सिताराम केसरी अध्यक्ष असताना कोलकत्ता येथे झालेल्या या अधिवेशनात CWC च्या निवडणूका झाल्या.

या निवडणूकांमध्ये अहमद पटेल, जितेंद्र प्रसाद, माधव राव सिंधिया, तारिक अन्वर, प्रणव मुखर्जी, आरके धवन, अर्जुन सिंग, गुलाम नबी आझाद, शरद पवार असे नेते विजयी झाले… त्यानंतर मात्र CWC च्या या 12 सदस्यांची नियुक्ती देखील कॉंग्रेसचे अध्यक्षच करत होते… आत्ता CWC चे अधिकार काय आहेत तर 1939 साली सुभाषचंद्र बोस कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकूनही CWC च्या सदस्यांनी विरोध केल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

आजही CWC चे अधिकार अमर्यादित आहेत. सिताराम केसरींना पक्षाध्यक्ष पदावरून दूर करण्यासाठी याच CWC ने मुख्य भूमिका निभावली होती..

हे चार स्तर पाहिल्यानंतर समजून घ्यावं लागतं ते म्हणजे कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक कशी होते.

त्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका बजावते ते CWC. कॉंग्रेस वर्किंग कमिटी सर्वात पहिल्यांदा केंद्रिय निवडणूक समितीची स्थापना करते. या समितीत 3 ते 5 सदस्य असतात. यातीलच एकाला सदस्याला चेअरमन केलं जातं. हे चेअरमन निवडणूकीची सर्व प्रोसेस हाताळतात. सध्या या पदावर मधुसूधन मिस्त्री आहेत…

मधुसूधन मिस्त्री यांच्यामार्फत कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूकांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

यानुसार

  • 22 सप्टेंबरला अधिसूचना
  • 24 ते 30 सप्टेंबर दरम्यान अर्ज दाखल करणं
  • 1 ऑक्टोंबरला अंतीम उमेदवारांची यादी
  • 8 ऑक्टोंबरपर्यन्त उमेदवारी मागे घेण्याची अंतीम तारिख
  • 17 ऑक्टोंबरला निवडणूका
  • 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहेत

समजा 8 ऑक्टोंबर रोजी बाकीचे अर्ज मागे घेण्यात आले तर 8 ऑक्टोंबर रोजी अध्यक्ष घोषीत होवू शकतो आणि निवडणूका झाल्याचं तर 19 ऑक्टोंबरला विजयी उमेदवाराची घोषणा होणार..

आत्ता महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मतदान कस पार पडतं..

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी 30 अधिक 5 प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे एकूण 9000 हजारहून अधिक सदस्य मतदान करतात. कोणीही कॉंग्रेसचा सदस्य ज्याच्याकडे किमान 10 प्रदेश कमिटीतल्या सदस्याची शिफारस असेल असा व्यक्ती अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतो..
अन् इथेच आक्षेप घेतला जातो.

एकतर खूप काळ कॉंग्रेसच्या बुथ कमिटी, जिल्हा समिती, प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या निवडणूका झालेल्या नाहीत. प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात गांधी घराण्याचाच हस्तक्षेप राहिलेला आहे. त्यामुळे गांधी घराणे ज्याला पाठींबा देईल तोच अध्यक्ष होईल हे स्पष्ट आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.