करण जोहरनं जाहिरात केली आणि मार्कशीट बघून लग्न जुळवणारी वेबसाइट चर्चेत आलीये

“मोहल्लों के लौंडो का प्यार … अक्सर डॉक्टर और इंजीनियर उठा ले जाते हैं।”

रांझनातला मुरारी दिलफेक आशिक असणाऱ्या कुंदनला त्याचा जिगरी मुरारी समजावत असतोय. पण आपल्या शाळा, कॉलेजात असं काय नसायचं. कॉलेजमध्ये मागच्या बाकावर बसणाऱ्या पोराचीच कॉलेजात हवा असायची. मागच्या बाकावर बसणाऱ्या पोराची आणि वर्गातल्या सगळ्यात सुंदर पोरीची लव्ह स्टोरी तुमच्या शाळा कॉलेजात एखादी तरी असेलच. बिचारं पहिल्या बेंचवरचं अभ्यासात हुशार असायचं पण असल्या खऱ्या दुनियादारीत त्याला कधी टॉप मारता आलं नाही.पुढे जाऊन त्याला आयुष्यात काय कमी पडलं नाही ही गोष्ट वेगळी.

मात्र आता हा बचपन का दर्द अजूनपण न विसरलेल्या काही पोरांनी  चिटिंग केली आहे. त्यांनी आता स्वतःसाठीच मॅट्रोमेनियल साईट काढली आहे.

तर ही साईट आहे  IITIIMShaadi.com

ही वेबसाइट केवळ IIT, IIM आणि देशातील इतर प्रतिष्ठित संस्थांच्या माजी विद्यार्थ्यांसाठी बनवली आहे. याचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे करण जोहर आणि या वेबसाइटची टॅगलाइन आहे ‘अल्मा मेटर मॅटर्स’  म्हणजेच तुम्ही कोणत्या कॉलेजमधून येता हे महत्वाचं आहे.

जरी लग्नाची स्थळं दाखवणारी वेबसाइट इंटरनेटवर आता चर्चेत आली असली तरी ती नवीन नाहीये. वेबसाइटच्या ‘about us’ सेक्शनमध्ये  वेबसाइट एप्रिल २०१४ मध्ये लाँच करण्यात आली होती असं म्हटलं आहे. अल्मा मेटर मॅटर प्रायव्हेट लिमिटेड हे ‘प्रीमियर शैक्षणिक संस्थांच्या माजी विद्यार्थ्यांमधील लग्नाचे ऑप्शन  एक्सप्लोर करण्यासाठी एक खास लाउंज आहे” असं त्यांची वेबसाइट त्यांच्या या युनिक आयडियाबद्दल सांगते.

आता प्रश्न वेबसाइट पोरगं कॉलेजमधलं टॉप १० मधलं होतं हे कसं ओळखते?

भारत आणि इतर ५० देशांमधील सदस्यांसह, वेबसाइट प्रत्येक प्रोफाइलला शिक्षण संस्थेची पदवी, आयडी-कार्ड/मार्क शीट इत्यादी तपासून शिक्षणाच्या आधारावर प्रमाणीकृत करून त्यांना हुशार असल्याचा टॅग लावते हे त्यांच्या वेबसाइट वरून कळतं .

ही वेबसाइट अभियांत्रिकी, व्यवस्थापन, आर्किटेक्चर, वैद्यक, वित्त, कायदा, फॅशन डिझाईन, थिएटर, मीडिया कम्युनिकेशन, मानसशास्त्र, समाजशास्त्र, संगीत, नृत्य, पाककला कला या सर्व क्षेत्रांमधील टॉपच्या कॉलेजच्या पोरांची नोंदणी करून घेते.

आता इतक्या दिवस जात, संपत्ती, दिसणं यानुसार वेगवेगळ्या मॅट्रोमोनियल साईट भेदभाव करत होत्या आता यामुळे शिक्षणाची भर पडली आहे.

 त्यामुळे हे वेबसाइट टीकेचा विषय झाली नसती तर नवलंच.

सुरवात होते ब्रँड अॅम्बेसेडर करण जोहरच्या एका व्हिडिओमधील संदेशापासून तो म्हणतो या वेबसाइटच्या  सेवेचा उद्देश “मानसिकदृष्ट्या” सुसंगत (mentally compatible) असलेल्या लोकांना एकत्र आणणे.

आणि आता हे वेबसाइट लोकं एकमेकांची मेंटल कंपॅटिबिलिटी मॅच करतात की नाही हे त्याची मार्कशीट बघून चेक करणार आहे. त्याचबरोबर शिक्षण का घ्यायचं तर लग्नात जोडीदार चांगला मिळावा हे जुनाट आयडिया पण अशा वेबसाइटमुळे वाढीस लागते अशी टीका होत आहे. त्याचबरोबर मोठ्या कॉलेजेसमधल्या पोरांनाच फक्त चान्स देऊन एलिटीझम वाढवण्याचा हा एक प्रकार असल्याचंही बोललं जातंय.

आणि आयरणीच्या देवाला साष्टांग नमस्कार घालावा वाटतो जेव्हा कळतं की IITIIMShaadi.com ही वेबसाइट काढणारा स्वतः या कॉलेजात शिकलेला नाहीये.

तक्ष गुप्ता स्वतः IIT किंवा IIM मधून पदवीधर नाहीये. वेबसाइटनुसार, गुप्ताने एसपी जैन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून डिग्री घेतली आहे.

आधीच मॅट्रोमोनियल वेबसाइट जात, धर्म, रंग, भाषा, श्रीमंती या वेगवेगळ्या गोष्टींवरून लग्न ठरवत होत्या. आता त्यात त्यात मेरिटची भर पडली आहे. बाकी स्वर्गात बांधल्या गेलेल्या लग्नाच्या गाठी आता मार्कशीट बघून शोधल्या जाणार एवढं नक्की.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.