मोबाईल रिपेअर करणारा मुख्यमंत्र्यांना हरवून आमदार झाला..

“पंजाब वालीयों तुस्सी कमाल कर दित्ता…ये बोहोत बडा इन्कलाब हैं”

पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी तिथल्या जनतेला मारलेली ही पंजाबी लाईन. यावरूनचं त्यांच्या पंजाबमधल्या विजयाचा अंदाज हमखास लावला जाऊ शकतो. बालेकिल्ला असलेल्या दिल्लीनंतर पंजाब हे पहिलं राज्य आहे जिथं केजरीवालांच्या आम आदमी पक्षाचा जलवा पाहायला मिळालाय.

आपल्याच हक्काचा मानला जाणाऱ्या पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाला यंदा मात्र मोठ्या पराभवाला समोर जावं लागलं आणि पहिल्यांदाच केजरीवालांच्या आम आदमी पक्षानं विजय मिळवलाय आणि नुसता विजय नाही तर एकहाती सत्ता मिळवलीये. 

चरणजित चन्नी यांच्या भरवश्यावर काँग्रेसने निवडणूक लढली होती, पण त्यांना आपल्या दोन्ही जागांपैकी एकही जागा जिंकता आली नाही आणि हा कारनामा केलाय आम आदमीच्या पक्षाच्या उमेदवारांनी. थेट मुख्यमंत्र्यांना फाईट देत त्यांना भरघोस मतांनी मात दिली म्हणून या दोन्ही उमेदवाराचं मोठं कौतुक होतंय. 

पण या सगळ्यात आपच्या भदौड मतदार संघात मुख्यमंत्र्यांना हरवणाऱ्या लाभ सिंग उगोके या उमेवारची मात्र मोठी चर्चा सुरुये.

तसं पाहिलं तर भदौड मतदार संघ याआधी सुद्धा आपच्या गोटात होता. पण पक्षानं एकताही सत्ता मिळवल्यानंतर जेव्हा अरविंद केजरीवाल पंजाबच्या जनतेसोबत बोलत होते, तेव्हा त्यांनी आवर्जून लाभ सिंग यांच्या नावाचा उल्लेख केला. 

अरविंद केजरीवाल म्हणाले, 

“बड्या पक्षाचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांना हरवलं कोणी, लाभ सिंग उगोके… जो साधं मोबाईल रिपेअर करण्याचं काम करतो.”

केजरीवालांची ही लाईन ऐकून भिडूनं लगेच लाभ सिंग यांचा सातबारा काढायला घेतला. जो आता  तुमच्यासमोर मांडलाय.

तर लाभ सिंग उगोकेबद्दल सांगायचं झालं तर, ३५ वर्षाचा हा तरुण जेमतेम १२ वी शिकलाय. आता अपुऱ्या शिक्षणामुळं चांगली नोकरी नाही म्हणून साधं मोबाईल रिपेअर करण्याचं दुकान सुरु केलंय आणि त्याच्यावर पोटपाणी चालवतो. फॅमिली बॅकग्राउंड म्हणाल तर, वडील ड्रायव्हर आणि आई सरकारी शाळेत सफाई कामगार आहे. 

लाभ सिंगनं २०१३ मध्ये स्वयंसेवक म्हणून आम आदमी पक्ष जॉईन केला होता. पक्षात जॉईन झाल्यानंतर आधी छोटा प्रभारी, नंतर ब्लॉक प्रमुख आणि नंतर सर्कल प्रमुख असा पक्षातला प्रवास केला.

याआधीच्या म्हणजे २०१७ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस सुद्धा लाभ सिंगनं निवडणूक लढवण्याचा विचार केला होता. पण आपनं पिरमल सिंग धौला यांना संधी दिली, कारण त्यांची त्या भागात मजबूत पकड होती. आपचा हा डाव सक्सेसफुल सुद्धा ठरलेला आणि ४५ टक्के मतानं पिरमल सिंग धौला निवडून आले होते. 

पण यंदा मात्र आम आदमी पार्टीन लाभ सिंहला चन्नी यांच्यासमोर उभं केलं. म्हणजे काँग्रेसने दलित कार्ड वापरलं आणि आप’नं आम आदमीचं. म्हणजे तुम्ही जर निवडणूक प्रतिज्ञापत्र बघितलं तर, लाभ सिंगनं आपली मालमत्ता फक्त एक हिरो होंडा असल्याचं सांगितलं होत, जी त्यानं २०१४ मध्ये खरेदी केलेली. 

आता एवढे जब्बर उमेदवार म्हंटल्यावर कोण कोणावर भारी पडतंय याकडं लक्ष लागणं साहजिक होत. आणि आज जेव्हा निकाल लागला तेव्हा क्लियर झालं कि, भदौडमध्ये आम आदमी पक्षाचंच पारडं भारी पडलं. चरणजित सिंग चन्नी यांना २६ हजाराच्या आसपास मतं मिळाली तर आपचे उमेदवार लाभ सिंग उगोके यांना ६३ हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली.  

एवढंच नाही तर मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा मतदार संघ म्हंटल्या जाणाऱ्या चमकौर साहिब या मतदार संघात सुद्धा चन्नी यांना मोठ्या पराभवाला समोर जावं लागलंय. चन्नी यांना या जागेवर ५३,३९५ मतं मिळाली तर, त्यांचे नावकरी असलेले आपचे चरणजित सिंग ५८,९९९ मत मिळवून विजयी झाले.

आता या सगळ्या निकालावरून एवढं तर क्लियर झालंय कि, काँग्रेसला आपल्याच पक्षातली भांडण नडली आणि केजरीवाल यांची दिल्ली स्ट्रॅटेजी सक्सेफुल ठरली. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.