मोदी सरकारच्या मंत्र्याने पाकिस्तानातल्या मंदिर तोडफोडीचं कनेक्शन CAA शी जोडलं.

पाकिस्तानातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये काही लोक एका मंदिराची अगदी वाईट रीतीने तोडफोड करताना दिसतायत. पाकिस्तानमध्ये यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत.

पण यावेळी मोदी सरकारच्या एका मंत्र्यानेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी याला नागरिकत्व कायदा (सीएए) कायद्याशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ नक्की आहे कुठला आहे आणि संपूर्ण प्रकरण काय आहे ते बघायला पाहिजे.

तर ४ ऑगस्ट, २०२१ रोजी पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक समुदायाच्या मंदिरांना लक्ष्य करण्यात आले. रहिमयार खान जिल्ह्यातील भोंग नावाच्या ठिकाणी असलेल्या हिंदू मंदिरावर लोकांच्या जमावाने हल्ला केला. मंदिर उद्ध्वस्त झाले. मूर्तीही तोडल्या गेल्या. हे मंदिर नुकतेच बांधून पूर्ण करण्यात आले होते.

या घटनेचा निषेध करत पाकिस्तानचे संसद सदस्य आणि हिंदू समाजाचे नेते डॉ रमेश कुमार वंकवानी यांनी ४ ट्वीट केले. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले-

भोंग शहरातील हिंदू मंदिरावर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. मी उच्च अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. मात्र, सध्या तेथील परिस्थिती संवेदनशील आहे. पोलिसांचा  निष्काळजीपणा लज्जास्पद आहे. मी सरन्यायाधीशांना कारवाई करण्याची विनंती करेन.

या ट्विट्सच्या सुमारे २ तासांनंतर, डॉ.रमेश वंकवानी यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती देत ​​आणखी एक ट्विट केले. यामध्ये त्याने तणाव का होता हे सांगितले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ज्या भागात हा तणाव निर्माण झाला आहे, तिथे २४ जुलैच्या आसपास मदरशातील एका लहान मुलाबद्दल काही वाद झाला होता. तो वाद १ ते २ दिवसात सोडवला गेला. पण  ४ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर टाकलेल्या भडकाऊ पोस्टने हे प्रकरण भडकले.

अधिकाऱ्यांनी सोशल मीडिया पोस्ट हटवली. परंतु संध्याकाळी जवळपास ५० लोक परिसरात जमले. परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेली आणि त्यांनी मंदिरावर हल्ला केला. मंदिराला आग लावण्यात आली. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

पण मोदी सरकारच्या मंत्र्यान या व्हिडिओच डायरेक्ट CAA शीच कनेक्शन जोडलं.

गजेंद्र सिंह शेखावत हे मोदींच्या मंत्रिमंडळात जलशक्ती मंत्री आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला. आणि लागलीच त्यांनी या घटनेचा संबंध सीएए कायद्याशी जोडला.  ते ट्विट मध्ये म्हणतात.

मोदीजी आणि अमित शाह जी यांनी #CAA विधेयक का आणले? आणि हिंदूंसह इतर अल्पसंख्यांक धर्मांना पाकिस्तानमध्ये संरक्षणाची गरज का आहे? पाकिस्तानच्या रहिमयार खान जिल्ह्यातल्या श्री गणेश मंदिराचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतील.

मंदिराची कशी तोडफोड केली जाते ते पहा. पाकिस्तानातील सर्व अल्पसंख्याकांना दररोज अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते. अशी दृश्ये पाहिल्यानंतरही ज्यांचे हृदय तुटत नाही आणि जे CAA मागे घेण्याची बाजू मांडतात, ते मानवतेपेक्षा तुष्टीकरणाला जास्त महत्त्व देतात.

ज्या CAA ची हे मंत्री महाशय बाजू घेतायत तो कायदा आहे तरी काय ?

CAA म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांक ज्यांचा त्यांच्या देशात धार्मिक कारणावरून छळ झाला आहे आणि ते भारतात राहत आहेत, त्यांना या कायद्याद्वारे भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.

पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमधील अल्पसंख्यांकांमध्ये हिंदू, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि झोरास्ट्रियन धर्माचे लोक आहेत.

त्यांना भारतात अवैध स्थलांतरित मानले गेले आहे. २०१९ च्या या सुधारणेनंतर, पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्माच्या लोकांसाठी असणारे कठोर नागरिकत्व नियमात शिथिलता करण्यात आली. पूर्वी जिथे भारतात ११ वर्षे राहण्याची अट होती, ती कमी करून ६ वर्षे करण्यात आली. मात्र, या विधेयकाला तीव्र विरोध झाला. 

त्यामुळेच बहुतेक मंत्री महाशयांनी पाकिस्तानात मंदिर तोडल्याचा आणि CAA चा संबंध लावला असणार. त्यांची तरी काय चूक म्हणा. पण राव ट्रोल झाले ना मंत्री महोदय, हे नुकसान कसं भरून काढायचं. 

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.