मरणाचीही तमा नं बाळगणारे, अशी ख्याती असणारे नेपाळी गोरखे भारतीय सैन्यात असे सामील होतात

“जर कोणी म्हणतो की त्याला मरणाची भीती वाटत नाही, तर तो एकतर खोटं बोलतोय किंवा तो गुरखा आहे.”

फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांनी इंडियन आर्मीमधल्या गुरखा बटालियनबद्दल काढलेले हे गौरवउद्गार आहेत. भारतीय सैन्यातील लढाऊ आणि पराक्रमी बटालियन म्ह्णून  गुरखा बटालियन जवळपास शेकडो वर्षांपासून आपला नावलौकिक टिकवून आहे. 

आता हि बटालियन चर्चेत येण्याचं कारण म्हणजे या गुरखांना पण अग्नीवर योजना लागू होणार आहे. भारतीय सैनिकांप्रमाणेच नेपाळी सैनिकांचीही चार वर्षांच्या कालावधीसाठी भरती केली जाईल, त्यानंतर त्यांच्यातील 25 टक्के सैनिक सेवेत कायमी ठेवले जातील.

आता तुम्ही म्हणत होता आता तर तुम्ही गुरखा सैनिक आणि बटालियनबद्दल बोलत होता मग मध्येच नेपाळी सैनिकांचा विषय कसा आला?

तर याच उत्तर आहे भारतीय सैन्यात असलेल्या गुरखा बटालियनमध्ये नेपाळचे नागरिक असलेल्या सैनिकांचीही भरती केली जाते. नेपाळी नागरिक भारतीय सैन्यात जवान आणि अधिकारी म्हणून सामील होऊ शकतात. कारगिल युद्धादरम्यान 1/11 गुरखा रायफल्स या बटालियनच्या शौर्याबद्दल वीरचक्र मिळालेले कर्नल ललित राय हे नेपाळी वंशाचे असेच एक अधिकारी आहेत.

नेपाळी लष्करही आपल्या अधिकाऱ्यांना भारताच्या लष्करी अकादमी आणि लढाऊ महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवते.

भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटच्या ४३ बटालियनमध्ये नेपाळ आणि भारत असे दोन्ही देशातील सैनिक आहेत.द प्रिंटच्या बातमीनुसार या रेजिमेंटमध्ये नेपाळी लोकांचे प्रमाण निश्चित 60 टक्के आहे तर उर्वरित टक्का भारतीयांचा आहे. भारतामधून  उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दार्जिलिंग, आसाम आणि मेघालयमधून गुरखांची भरती केली जाते.

तर नेपाळमधून गुरख्यांची भरती करण्यासाठी थोडी वेगळी प्रोसेस असते.

यामध्ये भारत आणि नेपाळ बरोबर ब्रिटन हे तीन देश एकत्र येतात. ब्रिटनच्या सैन्यातही नेपाळमधून गुरखांची भरती केली जाते.नेपाळी, ब्रिटिश आणि इंडियन आर्मी मिळून नेपाळमध्ये गुरखांच्या भरतीसाठी एक दिवस फायनल करतात. त्या दिवशी तिन्ही सैन्याचे प्रतिनिधी नेपाळमधील एका विशिष्ट ठिकाणी लेखी आणि शारीरिक चाचणी घेतात.

यामध्येही समजा १०० उमेदवार सिलेक्ट करण्यात आले आहेत. तर यातील टॉपच्या २० उमेदवारांना तिन्हीपैकी एक आर्मी सिलेक्ट करण्याचा ऑप्शन दिला जातो. हे सैनिक बऱ्यापैकी ब्रिटिश आर्मीचा पर्याय निवडतात कारण ब्रिटिश आर्मीचा पगार आणि भत्ता सर्वाधिक असतो. त्यापाठोपाठ ते भारतीय आर्मीचा पर्याय निवडतात. भारतीय लष्कर नेपाळी आर्मीपेक्षा 2.5 पट वेतन आणि भत्ता देते. त्यामुळं दुसरा लॉट भारत उचलतं तर बाकीचे मग नेपाळी आर्मी घेते. 

या नेपाळी सैनिकांन सेवेदरम्यान आणि सेवानिवृत्तीनंतर भारतीय सैनिकांसारखेच फायदे मिळतात. त्यांना भारतीय सैनिकांप्रमाणेच वैद्यकीय सुविधा मिळतात आणि अनेकदा भारतीय लष्कराची वैद्यकीय पथके नेपाळला भेट देतात. नेपाळी सैनिकांना निवृत्तीनंतरही सेम पेन्शन मिळते. त्यामुळे भारतीय लष्कराने नेपाळी सैनिकांशी कधीही भेदभाव केला नाही. भारतीय लष्कर नेपाळच्या गावांमध्ये लहान पाणी आणि वीज प्रकल्पांसह कल्याणकारी प्रकल्पही चालवते.

त्यामुळे नेपाळमध्ये भारतीय सैन्यमध्ये भरती होण्याकडे नेहमीच कल राहिलेला दिसतो.  नेपाळी सैनिक भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांना थायलंड आणि सिंगापूर सारख्या देशांमध्ये पोलीस दलात काम करण्यासाठी मागणी असते.

याला लागून अजून एक प्रश्न राहतो तो म्हणजे गुरखा सैनिक केव्हापासून भारतीय सैन्याचा भाग आहेत.

माजी लष्करप्रमुख जनरल व्हीपी मलिक (निवृत्त), ज्यांनी त्यांच्या ‘इंडियाज मिलिटरी कॉन्फ्लिक्ट्स अँड डिप्लोमसी’ या पुस्तकातसांगतात की हिमालयीन देशाशी भारताचा लष्करी संबंध महाराजा रणजीत सिंग यांच्या कारकिर्दीपासून आहे त्यावेळी नेपाळी सैनिकांची भरती करण्यात येत होती. नेपाळी सैनिकांना सैन्यात भरती करणं त्यावेळी चांगलं लक्षण मानलं जायचं.

त्यानंतर ब्रिटिश भारतात आल्यानंतर त्यांनी 24 एप्रिल 1815 रोजी नासिरी रेजिमेंट म्हणून गुरखा रेजिमेंटची पहिली बटालियन उभारली. पहिले महायुद्ध सुरू झाले तोपर्यंत ब्रिटिश भारतीय सैन्यात 10 गुरखा रेजिमेंट होत्या.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, नोव्हेंबर 1947 मध्ये  ब्रिटन-भारत-नेपाळ त्रिपक्षीय करारानुसार या रेजिमेंट ब्रिटीश आणि भारतीय सैन्यांमध्ये विभागल्या गेल्या. एक लाख सैनिकांसह सहा गुरखा रेजिमेंट भारतात आल्या, ज्यामध्ये  11 गुरखा रायफल्स आणखी एक रेजिमेंट वाढवण्यात आली. 

गुरखा रेजिमेंटच्या मुळे भारत आणि नेपाळच्या आर्मीमध्ये एक इंटरेस्टिंग बॉंड तयार झाला आहे तो म्हणजे भारताचे आर्मी चीफ नेपाळी आर्मीचे मानद चीफ असतात तर नेपाळ आर्मीचे चीफ भारताच्या आर्मीचे. आणि याची सुरवात झाली होती सॅम मानेकशॉ यांच्यापासून. 

१९७२ मध्ये जेव्हा फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ गुरखा रेजिमेंटचे ऑफिसर होते तेव्हा सैनिक त्यांना  प्रेमाने सॅम बहादूर म्हणायचे.

यामुळेच त्यांना नेपाळी सैन्याचे मानद प्रमुख बनवले गेले. जी परंपरा अजूनपर्यंत चालू आहे. भारतात सध्या अंदाजे 35,000 नेपाळी सैनिक सात रेजिमेंटमध्ये सेवा देत आहेत. त्यापैकी काही भारताच्या पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर देखील तैनात आहेत.

मात्र भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षात ताणले गेल्यानंतर नेपाळी सैनिकांना भारताच्या आर्मीत सामील होण्यापासून रोखण्यात यावे अशी मागणी केली जात होती. नेपाळचे तत्कालीन नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप कुमार ग्यावाली म्हणाले होते की भारत आणि ब्रिटनला गोरखा सैनिकांची भरती करण्याची परवानगी देणारा 1947 चा करार आता संपला आहे.

मात्र तरीही नेपाळी तरुण मोठ्या प्रमाणात सैन्य भरतीत सामील होत असतात. मात्र अग्नीवर स्कीम ज्यामुळे सैनिकांना पूर्ण वेळ रोजगार, पेन्शन या गोष्टी भेटणार नाहीत त्यामुळे नेपाळी गुरखा सैनिक पाहिल्यासारखे इंडियन आर्मीमध्ये सामील होण्यासाठी उत्सुक राहतील का याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.