महाराष्ट्रातल्या खडकीच्या ‘बॉम्बे सॅपर्सचे’ ऑफिसर लष्करप्रमुख होणार आहेत..!!!

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची भारतीय लष्कराचे नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १ मे पासून ते या पदाचा कार्यभार स्वीकारतील. लेफ्टनंट जनरल पांडे हे कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स (द बॉम्बे सॅपर्स) मधील पहिले अधिकारी असतील ज्यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्याच्या खडकवासल्याच्या NDA चे माजी विद्यार्थ असलेल्या लेफ्टनंट जनरल पांडे यांची डिसेंबर १९८२ मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स (द बॉम्बे सॅपर्स) मध्ये नियुक्ती झाली होती.
सध्या लेफ्टनंट जनरल पांडे लष्कराचे उपप्रमुख म्हणून काम पाहत आहेत.
कॉर्प्स ऑफ इंजिनियर्सला सोप्या भाषेत आर्मीची इंजिनिअरींग विंग म्हटली तरी चालेल. आर्मीला अभियांत्रिकी सपोर्ट पुरवण्याचं काम ही विंग करते. त्यांचं काम सांगायचं तर देशावर दुसऱ्या देशाच्या आर्मीने हल्ला हल्ला केला असेल तर सुरुंग आणि इतर अडथळे लावून त्या आर्मीची वाटचाल थांबवणे. आणि जर आपल्याला हल्ला करायचा असेल तर बॉर्डरवर तात्काळ ब्रिज, रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधा निर्माण करून आर्मीची मुव्हमेंट सुलभ करणे असं असतं.
अनेकवेळा नैसर्गिक आणीबाणीच्या परिस्थितीत लष्कराची मदत घेतली जाते तेव्हादेखील कॉर्प्स ऑफ इंजिनियर्सच्या जवानांचा समावेश असतो.
भारतीय लष्कराच्या कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्समध्ये मद्रास सॅपर्स, बेंगाल सॅपर्स आणि बॉम्बे सॅपर्स असे तीन गट आहेत. आणि यातील २०० वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असलेल्या बॉम्बे सॅपर्सचे लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे सदस्य होते.
जाणून घेऊन त्याच बॉम्बे सॅपर्सचा हा गौरवशाली इतिहास.
१७७४ च्या आसपास, ईस्ट इंडिया कंपनीची बॉम्बे आर्मी सध्याच्या मुंबई आणि ठाण्यात असलेल्या सालसेट बेटांच्या ताब्यावरून मराठ्यांशी युद्धात गुंतलेली होती. मात्र त्याचवेळी ब्रिटिशांना त्यांच्या इंजिनियर सपोर्टमध्ये आर्मी कमजोर असल्याचं लक्षात आलं होतं.
मराठयांचे तडाखे सहन करायचे असतील, पार दिल्लीचं तख्त हादरवून सोडणाऱ्या मराठ्यांच्या सैन्याचा सामना करायचा असेल तर इंजिनियर सपोर्ट त्याच ताकदीचा पाहिजे हे इंग्रजांना कळून चुकलं होतं.
आणि मग सैन्याकडे उपलब्ध असलेल्या अभियांत्रिकी संसाधनांच्या खराब स्थितीमुळे नाराज होऊन, चार्ल्स विटमन, जो बॉम्बे आर्मीमध्ये सर्वात कनिष्ठ अधिकारी होता, त्याने लंडनमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या कौन्सिलला पत्र लिहिले.
विटमन यानं त्या काळातील युरोपीय सैन्याच्या प्रथेप्रमाणे जर्मन कारागीरांची फौज भरती त्यांना बॉम्बे आर्मीमध्ये पाठवण्याचा उपाय सुचवला.
आता एवढं ठीक होतं पण इथून पुढं त्यानं जे लॉजिक सांगितलं ते मात्र हास्यास्पद होतं. त्याच्या पुढच्या प्लॅननुसार या कारागिरांची त्यांच्या बायकांबरोबर भारतात राहण्याची परवानगी देण्यात यावी. आणि त्यांना होणाऱ्या पोरांमधून इंजिनियर पोरांची रेस तयार होईल आणि पुढील काळात भारतातल्या ब्रिटिश सैन्यात त्यांचा उपयोग होईल.
आता भाऊंची एवढी विचित्र आयडिया होती पण कॉउंसिलने त्याची आयडिया स्वीकारली आणि लंडनला त्याला प्रेझेंटेशन देण्यासाठी बोलवण्यात आलं. पुढं जाऊन विटमनला पैसा देउन जर्मनीला पाठवण्यात आलं.
तिथं त्यानं २५ जर्मन कारागिरांना तयार देखील केलं पण भारतात काम करायचं आहे हे ऐकून तेही पळून गेले.
शेवटी मग निराश होऊन, कौन्सिलने बॉम्बेचे चीफ इंजिनिअर मेजर लॉरेन्स निल्सन यांना बॉम्बे आर्मीसाठी अभियंता सैनिक ठेवण्यासाठी काही स्थानिक व्यवस्था करण्याचे आदेश दिले आणि अशा प्रकारे त्यांनी ‘पायोनियर लस्कर्स’ ची सुरुवात केली. पुढे अशा अनेक ‘पायनियर लस्कर्सची सुरवात झाली.
१८२० मध्ये या सर्व पायोनियर लस्कर्सना एकत्र आणत एका चीफ इंजिनिअर्सच्या नेतृत्वाखाली बॉम्बे सॅपर्सची स्थापना झाली.
तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धानंतर (१८१७-१८१८) ब्रिटिशांनी खडकीचा लष्करी तळ म्हणून विकास करण्यास सुरुवात केली होती. मोठ्या संख्येने युरोपियन सैन्याने स्थलांतर केले आणि पुढील काही दशकांमध्ये खडकी ( जे तेव्हा किरकी म्हणून ओळखले जाते) तोफखाना तळ आणि शस्त्रागार म्हणून वेगाने विकसित झाले.
त्यातच १८५७ च्या उठावानंतर मुंबई सरकारने १८६० मध्ये, मुळा-मुठा नद्यांच्या संगम पॉइंटवर एक तटबंदी उभारण्याचा प्रस्ताव ठेवला. जर पुन्हा कधी उठाव झालाच तर पूना (आताचे पुणे) कॅन्टोन्मेंटमधील रहिवाशांसाठी हि जागा आश्रयस्थान म्हणून काम करेल असा प्लॅन बनवण्यात आला होता. मात्र हा संगम शहरापासून जवळ असल्याने ही योजना रखडली आणि त्यामुळे खडकीला प्राधान्य देण्यात आलं.
मग याच खडकी कॅम्पमध्ये होळकर ब्रिज आणि डेक्कन कॉलेज दरम्यान असलेल्या उंच मैदानावर १८६७ ला बॉम्बे सॅपर्सचे हेडक्वार्टर बनवण्यात आलं. आज ४००० एकरमध्ये बॉम्बे सॅपर्सचा कॅम्पस पसरला आहे.
तेव्हापासून आपल्या जवळपास २०० वर्षांच्या इतिहासात बॉम्बे सॅपर्सने नेहमीच पराक्रमाची शर्त केली आहे.
बॉम्बे सॅपर्सने त्यांच्या कामगिरीसाठी ३१ थिएटर ऑनर्स आणि ३७ बॅटल ऑनर्स मिळवले आहेत शिवाय स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर शौर्यसाठी तीन सर्वोच्च पुरस्कार म्हणजे व्हिक्टोरिया क्रॉस, परमवीर चक्र आणि अशोक चक्र हे बॉम्बे सॅपर्सच्या नावे आहेत. आणि आता याच रेजिमेंटचे अधिकारी लष्करप्रमुख झाले आहेत.
हे ही वाच भिडू :
- भारतीय लष्करात आमच्या जातीला स्वतंत्र रेजिमेंट द्या म्हणून हे लोकं आंदोलन करतायत..
- भारताला तीन लष्करप्रमुख देणाऱ्या कुमाऊं रेजिमेंटचा इतिहास २३३ वर्षे जुना आहे..
- नेहरू नाराज होते तरी यशवंतरावांनी या लष्करी अधिकाऱ्याच्या हातात MPSC ची सूत्रे दिली..