सेनेची घटना पहा ; मग कळेल एकनाथ शिंदेंना वाट्टेल तसा खेळ करता येणार नाहीए..

शिवसेनेच्या कार्यकारणीची बैठक सुरू आहे. या बैठकीत वेगवेगळे निर्णय घेण्यात येत असल्याच्या बातम्या येत आहेत. कार्यकारणीच्या बैठकीत एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरेंच नाव वापरता येणार नाही असा ठराव संमत झाल्याचं सांगण्यात येत आहे.

सोबतच “हिंम्मत असेल तर आपल्या बापाचं नाव वापरा” अस उद्धव ठाकरेंनी म्हणल्याचं सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांच्या बंडखोरीत आपल्याकडे २ तृतीअंश पेक्षा जास्त आमदार आहेत असा क्लेम करत एकनाथ शिंदे यांनी थेट सेनेवर दावा ठोकला आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकारणीची ही बैठक होत आहे.

या बैठकीत एकूण पाच ठरवा संमत झाल्याचं सांगण्यात येतय,

  • शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची होती, आहे आणि कायम राहील.
  • उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर कार्यकारणीचा विश्वास आहे, उद्धव ठाकरेंकडे सर्वाधिकार.
  • बाळासाहेबांच नाव कोणाला वापरता येणार नाही.
  • शिवसेनेची मराठी अस्मितेशी आणि हिंदूत्वाशी नात कायम आहे.

दूसरीकडे गेल्या चार ते पाच दिवसात झालेल्या घडामोडी म्हणजे,

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत पक्षातल्या आमदारांना घेऊन बंड केलय आणि ते गुवाहाटीला जाऊन बसलेत. त्यांनी आता प्रत्यक्ष शिवसेना पक्षावरच आपला दावा केलाय. आपल्याकडे एकूण ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा शिंदे करतात.

त्यामुळे शिवसेना पक्ष आणि पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह ताब्यात घेण्यासाठी शिंदे सध्या रणनीती आखत असल्याचं सांगण्यात येतं. 

पक्षाचे दोन तृतीयांश आमदार आपल्यासोबत आहेत. त्यामुळे आपल्या सोबत असलेल्या आमदारांचा गट हाच ‘शिवसेना पक्ष’ आहे असा दावा शिंदे करू शकतात. त्यासाठी ते विधानसभेच्या उपाध्यक्षांना पत्र पाठवणार आहेत असं समजतं.

दरम्यान शिवसेनेच्या आमदार निलम गोर्‍हे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं की,

बंडखोर आमदारांना शिवसेना पक्षावर किंवा पक्ष चिन्हावर दावा करता येणार नाही. हे बोलताना त्यांनी शिवसेनेच्या घटनेचा उल्लेख केला आहे.

शिवसेना पक्षाची घटना म्हणजे काय?

त्यात कोणत्या गोष्टी समाविष्ट असतात आणि आताच्या परिस्थिति मध्ये एकनाथ शिंदे शिवसेना पक्षावर दावा करू शकतात की  नाही.

प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष काही नियमांनुसार चालवण्यासाठी एक स्वतंत्र घटना असते. त्या त्या घटनेनुसार आणि घटनेतल्या नियमांनुसार हे पक्ष चालत असतात.

त्यात पक्षाची कार्यकारिणी निवडण्यापासूनच्या अनेक गोष्टींचा समावेश असतो. शिवसेनेची स्थापना १९६६ साली झाली. शिवसेना हा तसा प्रादेशिक असला तरी देशातील इतर प्रादेशिक पक्षा पेक्षा त्याची ओळख वेगळी आहे. 

शिवसेनेचं वेगळेपण त्यांच्या घटनेत नमूद आहे.

१९७६ मध्ये शिवसेनेची घटना तयार करण्यात आली. या घटनेत सर्वोच्च पद हे ‘शिवसेनाप्रमुख’ यांच्याकडे राहील असे जाहीर करण्यात आले. १३ सभासदांची कार्यकारिणी ठरवण्यात आली.

१९८९ साली निवडणूक आयोगाने शिवसेनेला राज्यस्तरीय पक्षाची मान्यता दिली आणि त्याच वेळी ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह देखील दिलं. शिवसेना पक्षातील सर्व पदे ही या घटनेत नमूद केल्या प्रमाणेच भरली जातात.

शिवसेनेच्या घटनेत ‘शिवसेनाप्रमुखांपासून ते शाखाप्रमुखांपर्यंत’ अशी एकूण १३ पदे नमूद केलेली आहेत. शिवसेनाप्रमुख यांच्याकडे संघटनेचे सर्वोच्च नेतृत्व राहील असं त्यात नमूद करण्यात आलय.

आता बघूया की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर क्लेम करण्याचा मुद्दा शिवसेनेच्या घटने नुसार कसा अवैध ठरू शकतो ते.. 

शिवसेनेच्या घटनेच्या कलम ११ मध्ये शिवसेना प्रमुख हे पद सर्वोच्च आहे आणि फक्त शिवसेना प्रमुख यांनाच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मतांना सोबत घेऊन कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार आहे. असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पक्षातून काढून टाकणे, पक्षात घेणे हे सर्व निर्णय शिवसेनाप्रमुखच घेतात.

शिवसेना प्रमुख हे प्रतिनिधी सभेचे सदस्य निवडून देतात. ज्यात आमदार, खासदारांपासून ते जिल्हा प्रमुख ते जिल्हा संपर्क प्रमुख आणि मुंबई विभाग यांचा समावेश असतो.

एकूण २८२ जणांनी २०१८ साली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेना प्रमूख पदी निवडून दिलं होतं. 

ज्या राष्ट्रीय कार्यकारणीला सोबत घेऊन शिवसेना प्रमुख काम करतात, त्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील १४ सदस्य हे पण प्रतिनिधी सभा निवडून देतात आणि जास्तीत जास्त ५ जणांची नियुक्ती ही शिवसेना प्रमुख करतात. 

या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांना पक्ष नेते असं म्हटलं जातं. २०१८ साली प्रतिनिधी सभेने खालील यादीतील ९ जणांना पक्ष नेते म्हणून निवडून दिले.या निवडीचा कालावधी हा ५ वर्षांचा असतो.

सध्याच्या घडीला या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवडून दिलेले सदस्य कोण आहेत ते बघूया..

  1. आदित्य ठाकरे
  2. मनोहर जोशी
  3. सुधीर जोशी
  4. लीलाधार डाके
  5. सुभाष देसाई
  6. दिवाकर रावते
  7. रामदास कदम
  8. संजय राऊत
  9. गजानन कीर्तिकर

लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे या यादीत एकनाथ शिंदे यांचं नावच नाहीये.  हे पक्षनेते 23 जानेवारी 2023 पर्यंत या पदावर राहणार आहेत.

आता आपण शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना ज्या 4 जणांना निवडण्याचा अधिकार असतो त्या अधिकारानुसार त्यांनी कुणाची निवड केलीये ते पाहूया..

  1. अनंत गीते
  2. चंद्रकांत खैरे
  3. आनंदराव अडसूळ
  4. एकनाथ शिंदे

या 4 निवडी रद्द करण्याचा पूर्ण अधिकार शिवसेना प्रमुख या अधिकाराने उद्धव ठाकरे यांना आहे. या अधिकाराचा वापर करून ते ह्या 4 निवडी कधीही रद्द करू शकतात.

फक्त आमदारांचं तुल्यबळ असल्यामुळे संपूर्ण शिवसेना पक्षच जर शिंदेंना आपल्या ताब्यात घ्यायचा असेल तर त्यांना 250  सदस्यांना सोबत घेऊन प्रतीनिधी सभेतून निवडून यावं लागेल, तरच त्यांना निवडणूक आयोग मान्यता देईल आणि मग ते शिवसेनेवर दावा करू शकतील.  त्यातही शिवसेना प्रमुखांचा निर्णयच अंतिम असल्यामुळे इच्छा असूनही शिंदे शिवसेना आपल्या ताब्यात घेऊ शकणार नाहीत.

या स्टोरीमध्ये प्रवीणकुमार बिरादार यांच्या ट्विटचा संदर्भ घेण्यात आला आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.