पत्रकार परिषदांच काय घेवून बसलात, या पंतप्रधानांना तर “लोकसभेला देखील सामोर जाता आलं नव्हतं.”

कोणते पंतप्रधान कोणत्या गोष्टीला सामोरे गेले, कोणत्या पंतप्रधानांची किती इंचाची छाती आहे. हा सध्या देशाच्या राजकारणातला सर्वात हॉट टॉपीक आहे. प्रधानसेवक नरेंद्र मोदी हे पत्रकारपरिषदांना सामोरे जात नाहीत हे मात्र सत्य. पण याहून हॉट टॉपीक असणारी गोष्ट म्हणजे,

या देशाला असेही एक पंतप्रधान लाभले, ज्यांना लोकसभेला सामोरं जाता आलं नाही.

झालं अस की, आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पुरता धुव्वा उडाला होता. देशात जनता पक्षाचं सरकार स्थापन झालेलं होतं. निवडणुकीपूर्वी गैरकाँग्रेस वादाच्या नावाखाली एकत्र आलेल्या पक्षांमध्ये सत्ता स्थापनेनंतर पंतप्रधानपदासाठी रस्सीखेच सुरु झालेली होती. पण कसंबसं जयप्रकाश नारायणांच्या मध्यस्थीने मोरारजी देसाई पंतप्रधान झाले होते. चरणसिंग देशाचे गृहमंत्री होते.

गृहमंत्री असलेले चरणसिंग नाराज होते, त्यांची नजर पंतप्रधान पदावर होती. अंतर्गत राजकारणात जनता पार्टीत लवकरच फुटीचं वातावरण तयार होऊ लागलं. त्यामुळे सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात अविश्वासाची स्थिती होती. वर्षभरातच देशातील वातावरण बदलू लागलं होतं. सरकारविरोधी वातावरण तयार होऊन त्याचा फायदा विरोधी  पक्षातील काँग्रेसला मिळण्याची स्थिती निर्माण झाली होती.

पंतप्रधान मोरारजी देसाई आणि गृहमंत्री चरणसिंग यांच्यातील वाद चव्हाट्यावर येऊ लागले होते.

मोरारजी देसाई तर एक वेळी,

“आपण  चरणसिंगांना ‘चुरण सिंग’ बनवू”

असं म्हणाल्याची आठवण ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांनी सांगितली आहे. त्याच काळात मोरारजींचे चिरंजीव कांतीभाई देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. प्रधानमंत्री कार्यालयात बसून कांतिभाई देसाईचं सरकार चालवतात, त्यांचे अनेक उद्योगपतींशी संबंध असून त्यांना फायदा मिळवून देण्यासाठी ते काम करतात अशा प्रकारचे आरोप कांतिभाई देसाई यांच्यावर झाले. या आरोपांची सखोल चौकशी व्हावी असे पत्र चरणसिंगांनी मोरारजी देसाईंना लिहलं.

साहजिकच त्यामुळे मोरारजी चिडले आणि दोघांमधील वितुष्ट अजून वाढलं. परिणामी मोरारजी देसाईंनी चरणसिंग आणि त्यांच्यासोबत आपले अजून एक विरोधक राजनारायण (राजनारायन म्हणजे तेच ज्यांनी निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव केला होता) यांना पत्र लिहून राजीनामा देण्यास सांगितलं. दोघांनीही मंत्रिमंडळातून राजीनामा दिला.

सरकारमध्ये चाललेल्या या अंतर्गत फुटीचा फायदा विरोधी काँग्रेसने घेतला नसता तर नवलंच.

विरोधी फुटीला हवा देऊन सरकार पाडण्याचा इरादा घेऊन संजय गांधी राजनारायण यांना भेटले. या भेटीत संजय गांधी यांनी राजनारायण यांना सरकारमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. त्याबदल्यात सरकार बनविण्यासाठी काँग्रेस चरणसिंग यांना पंतप्रधान पदासाठी पाठींबा देईल असं त्यांनी सांगितलं. संजय गांधी यांनी सरकार पाडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले पण हे प्रयत्न फसले.

कारण चरणसिंग आपले निर्णय आपल्या ज्योतिषाच्या सल्ल्याने घेत असत आणि त्यांच्या ज्योतिषाने यावेळी त्यांना जनता पक्षातून बाहेर न पडण्याचा सल्ला दिला होता.

संजय गांधी काही शांत बसणाऱ्यांपैकी नव्हते, ते परत राजनारायण यांना भेटले आणि सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करू लागले. जनता पार्टीमधून जनसंघ बाहेर पडला तर, चरणसिंगांना पंतप्रधान बनवण्यासाठी काँग्रेस मदत करेल, असा शब्द त्यांनी राजनारायण यांना दिला. लोकसभेचं अधिवेशन सुरु झालं आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते यशवंतराव चव्हाण यांनी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला. त्याच वेळी चरणसिंग आणि राजनारायण यांच्या समर्थकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली, मंत्र्यांनी देखील राजीनामे दिले.

राजीनामा देण्यासाठी मोरारजींवर दबाव वाढला आणि शेवटी अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वी त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर,

काँग्रेसच्या पाठींब्याने चरणसिंग देशाचे पंतप्रधान झाले, परंतु फक्त २३ दिवसांसाठी. पंतप्रधान म्हणून त्यांनी संसदेत जाण्यापूर्वीच इंदिरा गांधींनी सरकारचा पाठींबा काढून घेतला, त्यामुळे चरणसिंग यांचं सरकारदेखील पडलं. चरणसिंग हे संसदेला सामोरे न जाऊ शकलेले देशाच्या आजतागायतच्या इतिहासातील पहिले आणि एकमेव पंतप्रधान ठरले.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.