महाराष्ट्रातील भारतमातेचं एकमेव मंदिर !
कोल्हापूरच्या अंबाबाई पासून ते तुळजापूरच्या भवानीपर्यंत , माहूरच्या रेणूकेपासून ते मुंबईच्या महालक्ष्मी पर्यंत अनेक देवी महाराष्ट्रावर मायेचं छत्र धरून उभ्या आहेत. याच महाराष्ट्रात भारत मातेचं मदिर आहे हे तुम्हाला ठाऊक आहे काय? देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचं भारत मातेच पहिलं मंदिर औरंगाबादजवळ दौलताबाद किल्ल्यामध्ये आहे.
या मंदिराची कहाणी सुद्धा खूप मनोरंजक आहे.
आज ज्याला दौलताबाद असं ओळखल जात त्या किल्ल्याचं मूळ नाव देवगिरी. तो बांधला यादव वंशाचा मुलपुरुष “भिल्लम पंचम” याने. त्याच राज्य उत्तरेत नर्मदेपासून ते दक्षिणेत मलप्रभा नदीपर्यंत पसरले होते. महाराष्ट्र राज्याची पायाभरणी त्याच्या काळात झाली अस म्हणता येईल. यादव घराण्याची राज्यकारभाराची अधिकृत भाषा मराठी होती.
यादव आणि त्यांच्या पूर्वीच्या राजांचा काळ हा स्थापत्यशैलीसाठीचा सुवर्णकाळ मानला जातो. वेरूळच्या लेण्यांचे काम देखील याच काळात पूर्णत्वास आले. प्रसिद्ध स्थापत्यकार हेमाद्रीपंत ज्याच्या नावाने हेमाडपंथी मंदिरे उभारली जातात तो यादवांचा प्रधान होता. देवगिरी किल्याची रचना सुद्धा खूप अनेक संशोधकांना चक्रात पडणारी अशी आहे. भारतातला सगळ्यात अभेद्य किल्ला म्हणून या किल्ल्याला ओळखल जायचं. किल्ल्यावर शत्रूला रोखण्यासाठी केलेल्या अनेक योजना आजही सुस्थितीत आहेत.
आता जिथे भारत माता मंदिर आहे तिथे पूर्वी जैन मंदिर होत असा इतिहासकारांचा दावा आहे. बाराव्या शतकात यादव राजा रामचंद्र यांन हे मंदिर बांधलं असं म्हणतात. काही इतिहासकारांच्या मते हे मंदिर भोज राजांनी बांधलं. या रामचंद्र राजाचा १२९६ साली दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दिन खिल्जीने पराभव केला . पहिल्यांदाच देवगिरी किल्ल्याने पराभव बघितला होता. अल्लाउद्दिन खिल्जीने तिथली अगणित संपत्ती लुटली आणि यादव राजाला आपले मांडलिक बनवलं.
पुढे हा किल्ला त्याचा सेनापती मलिक काफुरने ताब्यात घेतला. अल्लाउद्दिन खिल्जी मेल्यानंतर काळासाठी देवगिरी परत यादव राजा हरपालदेवकडे गेला. मात्र अल्लाउद्दिन नंतर गादीवर आलेला त्याचा मुलगा कुतुबुद्दिन मुबारकने तो किल्ला जिंकला. कुतुबुद्दीनने यादव घराण्याचा सर्वनाश केला.
कुतुबुद्दीन मुबारकशाह खिल्जी हा वृत्तीने कट्टर होता. त्याने इसवी सन १३१८ साली देवगिरी किल्ल्यावरील मंदिरांची तोडफोड केली. यातच हे जैन मंदिरसुद्धा होते. या भव्य मंदिराची तोडफोड करून तिथे मशिदीचं निर्माण करण्यात आलं. तरीही तिथे मंदिराचे अवशेष पहावयास मिळतात.
या मंदिरात आत येण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत. दीडशे खांबांचा भव्य सभामंडप आणि त्याच्या पुढे पटांगन अशी व्यवस्था इथे पाहायला मिळते. पटांगनात दगडी पाषाण अंथरलेला आहे. मंदिरातल्या खांबावर कमळफुल, देवी,जैन तीर्थंकर मूर्ती अशी नक्षी पहावयास मिळते. मंदिराच्या सभोवती मजबूत तटबंदी बांधण्यात आली आहे. यादव काळात इथे थाटात नवरात्रोत्सव साजरा केला जायचा. यानिमित्ताने जनतेला राजधानीत प्रवेश मिळायचा.
इसवी सन १३२८मध्ये दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलकने आपली राजधानी देवगिरीला हलवली आणि तिचे नामकरण दौलताबाद असे केले. त्यानंतर अनेक सुलतान बादशाह मुघल सम्राट यांची राजवट दौलताबाद किल्ल्याने पाहिली. अखेर हैद्राबादच्या निझामाकडे हा किल्ला आला.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावरही निझामाला स्वतंत्र राहायचं होत. सरदार वल्लभभाई पटेलांनी लष्करी कारवाई करून निझामाचा बेत हाणून पाडला. निझामाच संस्थान भारतात विलीन करण्यात आल. त्याच बरोबर मराठवाडा सुद्धा मुक्त होऊन भारतात आला.याच मराठवाड्यात असलेल्या दौलताबाद किल्ल्यामध्ये एक नवाच वाद उभा राहिला.
हे मंदिर नेमके कोणाचे असा वाद निर्माण झाला. हिंदू भाविकांच्या मते इथे हिंदू मंदिर होते, जैन श्रद्धाळूनां तिथे जैन मंदिर हवे होते, तर मुस्लीमधर्मीय मशिदीची जागा सोडायला तयार नव्हते. तेव्हा सरदार वल्लभभाई पटेलांनी निर्णय घेतला की या विवादित जागी भारतमातेची मूर्ती बसवावी . १९४९ साली स्वतंत्र भारतातलं पहिलं भारतमाता मंदिर अस्तित्वात आलं.
अशा प्रकारे सर्वधर्मसमभावाचं प्रतिक म्हणून ही देवी आजही दौलताबादच्या किल्ल्यात उभी आहे.
हे ही वाच भिडू
- शितला मातेच्या या पौराणिक कथेमुळं देवी रोग नाव पडलं.
- पाकिस्तानमधील हिंगलाज भवानी कोल्हापूरच्या गडहिंग्लजला कशी आली?
- आणि ‘हैद्राबाद संस्थान’ बिनशर्तपणे भारतीय सैन्याला शरण आले !
- कशी बदलली आता, आपली भारतमाता?