या बॉक्सरने मोहोम्मद अलींना झुंजवलं होतं.

मोहोम्मद अली या नावाला कुठल्याही प्रस्तावनेची गरज नाही. ते निर्विवादपणे आतापर्यंतच्या बॉक्सिंगच्या इतिहासातील सर्वात महान बॉक्सर होते. त्यांच्यासारखा बॉक्सर त्यांच्यानंतर क्रीडा जगताने पुन्हा पहिला नाही.

बॉक्सिंगच्या रिंगमध्ये मोहोम्मद अलींसमोर लढणं ही काही खायची गोष्ट नव्हती. अनेक दिग्गज बॉक्सर्सना या कल्पनेने देखील घाम फुटायचा. पण एका भारतीय बॉक्सरने मोहोम्मद अलींसोबत फक्त प्रदर्शनीय सामनाच खेळला नव्हता तर मोहोम्मद अलींना तब्बल ४ राउंडपर्यंत कडवी झुंज दिली होती.

या भारतीय बॉक्सरचं नाव कौर सिंग.

kaur singh
कौर सिंग

१९८० सालातला हा किस्सा.

मोहोम्मद अली त्यावेळी भारताच्या दौऱ्यावर होते. ही बातमी राजीव गांधी यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी  मोहोम्मद अलींशी संपर्क साधला आणि भारतातील चाहत्यांसाठी एक प्रदर्शनीय सामना खेळण्याची विनंती केली.

भारतामध्ये बॉक्सिंगची लोकप्रियता वाढविण्यासाठी अशा सामन्याची गरज राजीव गांधींना वाटत होती. राजीव गांधी त्यावेळी राजकीयदृष्ट्या फारसे सक्रीय नसले तरी त्यांना क्रीडा क्षेत्राविषयी प्रेम होतंच. खेळाप्रतीच्या याच प्रेमापोटी त्यांनी मोहोम्मद अलींना विनंती केली आणि अलींनी देखील राजीव गांधी यांच्या विनंतीला मान देत सामना खेळण्याची तयारी दर्शविली.

२७ जानेवारी १९८०.

हाच तो दिवस होता जेव्हा दिल्लीच्या राष्ट्रीय स्टेडीयममध्ये प्रदर्शनीय सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ५० हजारांपेक्षा अधिक लोक हा सामना बघण्यासाठी जमले होते. जिकडे तिकडे मोहोम्मद अलींच्या नावाचा जयघोष सुरु होता. चाहते इतिहासातील सर्वात महान बॉक्सरचा खेळ ‘याची देही याची डोळा’ बघणार होते.

कौर सिंग यांना देखील ज्यावेळी सर्वप्रथम प्रदर्शनीय सामन्याची आणि हा सामना ते खेळणार आहेत ही बातमी समजली त्यावेळी आश्चर्याचा धक्काच बसला होता. कारण मोहोम्मद अली हे त्यांचे देखील हिरो होते.

मोहोम्मद अलींचे फोटोज आपल्या रूममध्ये चिटकवून त्यांच्यासारखा बॉक्सर होण्याचं स्वप्न बघत तर ते बॉक्सिंगची साधना करत  होते. आपल्या ‘रोल मॉडेल’ असणाऱ्या खेळाडूच्या विरोधात झुंजायला मिळणार या भावनेनेच ते उत्साहित झाले होते.

दिल्लीच्या राष्ट्रीय स्टेडीयममध्ये हा सामना पार पडला. अनेकांना वाटत होतं की हा सामना एकतर्फी होईल. मोहोम्मद अली कौर सिंग यांना अगदी सहजच हरवतील. पण असं झालं नाही. कौर सिंग यांनी मोहोम्मद अलींना कडवी झुंज दिली. मोहोम्मद अलींना विजयासाठी जवळपास ४ राउंडची वाट बघावी लागली.

मोहोम्मद अलींना कडवी झुंज दिल्यानंतर २ वर्षांनी म्हणजेच १९८२ साली दिल्ली येथे पार पडलेल्या आशियायी स्पर्धांमध्ये कौर यांनी बॉक्सिंगमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं होतं. याचवर्षी भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने आणि १९८३ साली पद्मश्रीने गौरवलं होतं.

बॉक्सिंगच्या रिंगमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी भारतीय सैन्याला देखील आपली सेवा दिली होती. या सेवेसाठी १९८८ साली सैन्याकडून त्यांचा ‘विशिष्ठ सेवा पदक’ देऊन सन्मान करण्यात आला होता.

मोहोम्मद अलींना झुंजवणारा आणि आशियायी स्पर्धांमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकणारा हा बॉक्सर गेल्या वर्षी परत एकदा चर्चेत आला होता. बॉक्सिंगच्या दरम्यान त्यांना झालेल्या जखमांमुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती व्हायला लागलं होतं, पण इलाजाच्या मोठ्या खर्चासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते.

बातमी ज्यावेळी प्रासारमाध्यमांमध्ये आली त्यावेळी कुठे भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने त्यांना ५ लाखांची, अभिनेता शाहरुख खान याने ५ लाखांची आणि पंजाब सरकारने २ लाखांची मदत केली होती. सैन्याकडून देखील त्यांच्यावरील उपचारांचा खर्च उचलण्यात आला होता.

हे ही वाचा. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.