आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स घेणारा पहिला स्पिनर, ज्याने एकही नो-बॉल टाकला नाही !

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सत्तरच्या दशकात जेव्हा वेस्ट इंडीजचे फास्ट बॉलर्स तोफगोळे फेकल्याप्रमाणे आक्रमण करायचे त्यापूर्वी वेस्ट इंडिजच्या संघात  एक स्पिनर देखील होता, जो प्रतिस्पर्धी संघाला आपल्या फिरकीच्या तालावर नाचवायचा. वेस्ट इंडीजच्या ‘ऑल टाईम ग्रेट’ संघाची निवड करायची ठरवलं तर त्याला निश्चितच या संघात स्थान द्यायला लागेल.

लान्स गिब्ज असं या महान खेळाडूचं नाव !

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात आधी ३०० विकेट्स पूर्ण करणारा बॉलर म्हणून लान्स गिब्जचं नाव लिहिलं गेलंय. विशेष म्हणजे त्याच्या शिस्तबद्ध बॉलिंगची सुद्धा दाद द्यायला लागेल. वेस्ट इंडीजसाठी खेळताना ७९ मॅचेसमध्ये २९.०९ च्या अॅव्हरेजने आणि १.९८ च्या इकॉनॉमी रेटने ३०९ विकेट्स घेणाऱ्या या बॉलरने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत एकही नो-बॉल टाकला नव्हता.

क्रिकेटच्या इतिहासात संपूर्ण कारकिर्दीत नो-बॉल न टाकणाऱ्या बॉलर्सच्या यादीत तो एकमेव स्पिनर आहे, हे विशेष.

२९ सप्टेबर १९३४ साली वेस्ट इंडीजमध्ये जन्मलेले लान्स क्रिकेटकडे ओढले गेले ते वडिलांच्या निधनानंतर आपल्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सांभाळता यावी म्हणून. सुरुवातीच्या काळातील डोमेस्टिक क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीच्या आधारावर १९५७ सालच्या पाकिस्तान संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी त्यांची इंडिजच्या संघात निवड झाली. पहिल्याच कसोटीत पाकिस्तानच्या ४ विकेट्स मिळवत त्यांनी आपली निवड सार्थ ठरवली आणि पुढे ते संघाचे रेग्युलर प्लेअर झाले.

lance 1

१९६२ सालचा भारतीय संघाचा वेस्ट इंडीज दौऱ्याने तर गिब्ज यांच्या कारकिर्दीला चार चांद लावले. या दौऱ्यात भारतीय संघाने त्यांच्या फिरकीसमोर सपशेल शरणागती पत्करली होती. संपूर्ण दौऱ्यात २०.४१ च्या सरासरीने २४ विकेट्स घेणाऱ्या गिब्ज यांनी ब्रिजटाऊन टेस्टमध्ये आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय स्पेल टाकला होता. त्यांच्या या स्पेलमुळे १४९ रन्सवर २ विकेट्स अशा सुस्थितीत असणाऱ्या भारतीय संघाचा डाव १८७ रन्समध्ये गडगडला होता. आपल्या १५.३  ओव्हरच्या या स्पेलमध्ये  त्यांनी फक्त ६ रन्स मोजत भारताचा उरलेला संपूर्ण संघ पॅव्हेलीयनमध्ये पाठवला होता.

लान्स यांनी जरी ऑफ स्पिनर म्हणून नाव कमावलं असलं तरी आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात मात्र त्यांनी  लेग-स्पिनर म्हणून केली होती. पण लेग-स्पिनर म्हणून त्यांचा बॉल स्पिन तर व्हायचा, पण त्यांना गुगली टाकायला जमायची नाही. ही गोष्ट इंग्लंडचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आणि त्यावेळी गयानामध्ये कोचिंग करत असलेल्या मॅक्लंटायर यांनी हेरली आणि त्यांनी लान्सला ऑफ स्पिन बॉलिंग टाकण्याचा सल्ला दिला. याच सल्ल्याने त्यांच्या संपूर्ण क्रिकेटिंग कारकिर्दीला कलाटणी दिली.

१९७६ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले लान्स आजदेखील वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळविणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वाल्श, अँम्ब्रोस आणि मार्शल नंतर चौथ्या स्थानी आहेत. मात्र स्पिनर म्हणून कधीकाळी क्रिकेटविश्व गाजवलेल्या या खेळाडूला एक खंत मात्र कायमच राहिलीये की वेस्ट इंडीज क्रिकेटने मात्र त्यांच्या स्पिन बॉलिंगचा वारसा जपला नाही.

लान्स यांना खटकणाऱ्या या गोष्टीत बरचसं तथ्य देखील आहे कारण, गिब्जनंतर वेस्ट इंडीजकडून कसोटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स आहेत कार्ल हूपरच्या (१११) नावे आहेत, ज्याने कधीच रिटायरमेंट घेतलीये. शिवाय सद्यस्थितीत गिब्ज यांच्या जवळपास पोहोचेल असाही कुणी स्पिनर वेस्ट इंडीजकडे नाही. आज लान्स यांच्या जन्मदिनी वेस्ट इंडिजच्या संघाला त्यांचा वारसा पुढे चालवणारा एखादा चांगला स्पिनर याच शुभेच्छा !

हे ही वाच भिडू

3 Comments
  1. Sachin ssr says

    Ind Vs pak mdhe sarvat jast kuthlya player ne bhandan keli ahe

Leave A Reply

Your email address will not be published.