हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना केली गजाननराव वैद्य यांनी पण मदत होती प्रबोधनकारांची..

कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रात ज्या सभेचं वारं वाहत होतं, अखेर ती सभा काल औरंगाबादेत पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी भोंग्या सारख्या जुन्या मुद्यांसहित नवीन प्रश्नांची, सल्ल्यांची देखील उत्तरं दिलीत. त्यात एक सल्ला म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा.
शरद पवारांनी प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं वाचण्याचा सल्ला राज यांना दिला होता.
त्यावर कालच्या सभेत राज यांनी प्रतिउत्तर देताना ‘माझी जीवनगाथा’, ‘उठ मराठ्या उठ’, ‘प्रबोधनमधील प्रबोधनकार’, ‘रायगडचे रामण्य’ आणि ‘राष्ट्रसेवा हिंदूंचा राजधर्म’ अशा काही पुस्तकांचा संदर्भ देत ती वाचण्याचा सल्ला पवारांना दिला… शिवाय फक्त आपल्या कामापुरतीच पुस्तकं वाचू नये, असा टोला देखील लगावला.
दरम्यान या सर्व पुस्तकांचा उल्लेख करताना राज यांनी प्रबोधकारांचं हिंदू धर्मासाठीचं योगदान आणि त्यांचं काम याबद्दल सांगितलं. त्यात त्यांनी…
“माझे आजोबा हे हिंदू धर्म मानणारा माणूस होता. ते धर्माच्या चुकीच्या गोष्टींवर बोट दाखवायचे, भटभिक्षूकीच्या विरोधात होते. माझ्या आजोबांनी नवरात्र उत्सव सुरू केला… इतकंच नाही तर क्रिश्चन मिशनरीजला विरोध म्हणून हिंदू मिशनरीज चळवळ स्थापन करणारे माझे आजोबा होते” असं म्हटलंय.
जेव्हा आम्ही संदर्भ शोधला तेव्हा समजलं…
हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना करण्यात प्रबोधनकारांचा हातभार होताच. मात्र मूळ कल्पना आणि अग्रेसर कार्य ‘गजाननराव वैद्य’ यांचं होतं…
असा आहे घटनाक्रम…
१९०० चं शतक होतं. क्रिस्ती मिशनऱ्यांचा त्याकाळी गिरगाव भागात मोठा जोर होता. त्यांची एक सार्वजनिक मोफत लायब्ररी पालव रोडवर होती. सर्व दैनिके, मासिके, परदेशी सचित्र वृत्तपत्रे आणि क्रिस्ती धर्माची लहानमोठी पुस्तके टेबलावर पसरलेली असायची. दररोज सकाळी भली मोठी वाचकांची गर्दी तिथे व्हायची.
यात दोन गोष्टी होत्या…
एक म्हणजे सगळे. लोक उभं राहूनच वाचन करायचे. कारण तिथल्या बाकांवर ढेकणांचं साम्राज्य होतं. बसलं कीच चढले अंगावर. वाचणारा वाचन सोडून नाचायला लागायचा.
तर दुसरं म्हणजे. बाटलेले अनेक विद्वान क्रिस्ती बॅकबेवर तंबू ठोकून असायचे. तिथे ते व्याख्याने, प्रवचने, गाणी यांच्या कार्यक्रमांसहित सचित्र पुस्तके वाटायचे. शिवाय कुणी गरजू बेकार आढळला तर त्याला ‘नोकरी किंवा छोकरी’ याची लालूच दाखवून बिनबोभाट बाटवायचे.
या क्रिस्ती लोकांप्रमाणेच इस्लामी मिशनऱ्यांचही हेच काम चालायचं. मात्र ते सारे बुरखेवाले असल्याने कुणाला थांगपत्ता लागायचा नाही.
‘बाटला तो आम्हाला मेला’ असं तेव्हा असायचं. अशात उभ्या महाराष्ट्रात एकटे फक्त गजाननराव वैद्य व्याकुळ झाले.
लक्षावधी हिंदू या ना त्या मार्गाने परधर्मात खेचले जात आहेत, मात्र या हिंदुसमाज-बल-विध्वंसाकडे कोणीच लक्ष कसं देत नाही? प्रत्येकजण फक्त राजकारणात गढलेला..! हिंदुस्थानात हिंदूच अल्पसंख्य जमत म्हणून जगण्याची वेळ आली तर या राजकारणाने मिळणाऱ्या स्वराज्यात इतर लोक सत्ताधारी होतील आणि आमच्यावर सत्ता गाजवतील?
अशी ही भावी दुरावस्था गजाननराव वैद्यांच्या लक्षात आली आणि त्यांच्यातील बंडखोरीचा पिंड जागा झाला.
“हिंदूंच्या लोकसंख्येला कोणत्याही अटकाव आणि प्रतिकाराविना लागलेली ही गळती थांबलीच पाहिजे. इतर कोणी हे कार्य करत नसलं, तर मी स्वतः करेल” असं म्हणत वैद्यांनी निर्धार जाहीर केला.
त्यानंतर थोडीफार मात्र मनोभावे कार्य करणारी मंडळी त्यांच्या सोबत सामील झाली.
यात प्रबोधनकार ठाकरे देखील होते.
शिवाय बेंद्रे, एल.बी. उर्फ बाळासाहेब राजे, केसरीचे मुंबईचे बातमीदार अनंतराव पिटकर, श्री. सावळाराम दौंडकर अशी पंधरावीस मंडळी वैद्यांच्या खांद्याला खांदा भिडवून उभी राहिली.
हिंदू मिशनरी स्थापन करण्याचे वारे वाहू लागले, तशी प्लॅनिंग सुरु झाली.
त्यावेळी गिरगाव हाच हिंदूंचा बालेकिल्ला होता. उत्तर मुंबई फारशी वर आलेली नव्हती. गजाननरावांनी ठिकठिकाणी व्याख्याने देण्याचा सपाटा सुरु केला. ते सहज बोलायचे मात्र त्यांचं बोलणं ‘हित उपदेश’च ठरायचं. व्याख्यानासाठी वैद्यबुवा उभे राहिले की प्रथम दर्शनीच ते त्यांच्या नितांत हिंदुत्व-भक्तीचा आणि साधुत्वाचा ठसा श्रोत्यांवर बिनचूक उमटावायचे.
हिंदू मिशनरीजसाठी वैद्यांच्या योजनेवर वृत्तपत्रांतून विचार व्यक्त होऊ लागले होते. सभा देखील आयोजित केल्या जायच्या. बहुतेकवेळा त्या कावसजी पटेल टॅंकरोडवरील हिराबागेच्या प्रशस्त दिवाणखान्यातच व्हायच्या. त्यात श्रोत्यांच्या शंका आणि अपेक्षांना गजाननराव थोडक्यात पण इतक्या समर्पक, विनयाने आणि निर्धाराने उत्तर द्यायचे की तो व्यक्ती तेव्हाच सोसायटीचा मेंबर व्हायचा.
“मी बोलतो ते निर्भेळ सत्य असेल, तुम्हाला पटत असेल, हिंदुत्वाविषयी जातिवंत कळवळा असेल, तर या माझ्या मागे… हिंदुधर्माचा दरवाजा मी सताड उघडा करत आहे. जगातल्या सर्व मानवांनी या धर्मक्षेत्रात यावं. आम्ही त्यांचं स्वागत करू. हा अधिकार आम्हाला कोणी दिला? विचारताय. अधिकार देवाने दिला. हिंदूंचा वैदिक धर्म हा जगाचा धर्म झालाच पाहिजे, ही देवाची आज्ञा आहे”.
असं उद्गारांसहित गजाननराव सर्वांना संबोधित करायचे.
हळूहळू हिंदू मिशनरीजची योजना निश्चित होत गेली. ती निश्चित होताच लोकमान्य टिळकांच्या कानावर ती घालण्यात आली. त्यांचा अभिप्राय काय, याचा अंदाज घेण्यासाठी वैद्यांनी अनंतराव पिटकरांना खास पुण्याला पाठवलं होतं.
हिंदू मिशनरीज म्हणजे अपूर्व अशी धर्मक्रांती. पण वैद्य हे तर ब्राम्हणेतर..!
ब्राम्हणेतर पंडिताने ‘हा अधिकार मला देवाने दिला’ असं म्हणत धर्माचे दरवाजे सर्वांसाठी उघडे करत बाटलेल्याना परत हिंदू करून घ्यायचं, तेही जगद्गुरू शंकराचार्यांनाही धाब्यावर बसवून. हे लक्षात घेता या विलक्षण धर्मक्रांतीच्या योजनेला स्पष्ट होकार किंवा नकार देण्याची लोकमान्यांची शाहमत झाली नाही.
“आज काय सांगणार? प्रयोग करून पहा” असा अभिप्राय टिळकांनी दिला.
या योजनेला विरोध देखील झाला…
करवीर पीठाचे पदच्युत शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी म्हणजे खरोखरच पंडिताग्रणी, बहुश्रुत आणि आतरराष्ट्रीय कीर्तीचे विद्वान होते. त्यांना सोसायटीची कल्पना कळविताच त्यांनी तात्काळ उत्तेजनपर संदेश पाठवला.
मात्र थोरामोठ्यांच्या अशा बऱ्या-वाईट अभिप्रायांनी खचून जाणारे आणि मागे हटणारे वैद्य नव्हते. उलट अशाप्रसंगी ते वज्रापेक्षाही कठोर व्हायचे. त्यांचा आत्मविश्वास दांडगा होता.
याच आत्मविश्वासाने अखेर तो दिवस उजाडला…
वर्ष होतं १९१८. गुरुपौर्णिमेचा मुहूर्त होता.
‘सायंकाळी बरोबर सहा वाजता हिराबागेत गजाननराव वैद्य हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना करणार’ अशी बातमी वृत्तपत्रांत झळकली.
मग काय. हिंदूंमध्ये एक नवचैतन्य भरून आलं. हिराबागेत जिज्ञासू प्रेक्षकांनी अफाट गर्दी केली. तर आजवर जे घडलं नाही ते घडणार, या उत्साहाने जनतेने हिराबागेकडे मोर्चा वळवला. सभेच्या जागी काही नामांकित क्रिस्ती मिशनरीही आले होते, ज्यांचं गजाननरावांनी जातीने स्वागत केलं.
सर्वत्र उद धुपाचा सुगंध पसरला होता. व्यासपीठावर फुलांच्या माळांनी आणि चंदन कापूराने अग्निपात्र भरून होतं. समया तेवत होत्या.
घड्याळाचा काटा बरोबर सहावर गेल्यावर श्री. सुंदरराव वैद्य (अग्निहोत्री) यांनी निळा झगा आणि तांबडी पगडी घालून प्रवेश केला. पाठोपाठ गजाननराव आणि बाळासाहेब राजे आले. त्यांनीही अगदी सुंदररावांसारखाच वेष धारण केला होता. एकच टाळ्यांचा गडगडाट झाला.
अग्निहोत्री सुंदररावांनी अग्नी प्रज्वलित करताच वैद्यबुवा आणि राजे यांनी गंभीर स्वरात…
अग्निमीळे पुरोहितम्
यज्ञस्य देव ऋत्विजम्
या वेदमंत्रांचा घोष चालू केला. सुमारे अर्धा तास हा विषयी झाल्यानंतर, गजाननरावांनी हिंदू मिशनरी सोसायटी, तिचं उद्देश्य, कार्यक्रम अशा सर्व प्लॅनिंगवर दीड तास रसाळ प्रवचन केलं.
वैद्यांच्या वाणीत खूप जिव्हाळा, विनयशीलता आणि हिंदुत्वाबद्दल निष्ठावान भक्ती ओसंडून जात होती.
सर्व समारंभ आटोपला. हिंदू मिशनरी स्थापन झाली.
प्रबोधनकार ठाकरेंनी समारंभ आटोपल्यावर तिथे आलेल्या वेलिणकर नावाच्या एका ओळखीच्या क्रिस्ती मिशनरीला विचारलं होतं,
“काय वेलिणकरसाहेब, काय वाटतं तुम्हाला?”
त्यावर त्यांचं उत्तर होतं…
“विलक्षण साधू पुरुष आहेत तुमचे वैद्य. आम्ही काय सांगणार?”
असा होता हिंदू मिशनरी स्थापनेचा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यात गजाननराव वैद्य आणि प्रबोधनकार ठाकरेंचं योगदान.
हे ही वाच भिडू :
- राज ठाकरे म्हणाले ते खरंय, महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सव प्रबोधनकारांनी सुरू केला
- अजान सुरू झाली अन बाळासाहेबांनी आपलं भाषण थांबवलं, पण राज ठाकरेंनी उलट केलं..
- उद्धव ठाकरेंनी विचारलं “बाबरी पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते..?” हे आहे उत्तर…