एअरवेजच्या मालकाचा पराभव झाला अन् राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संघर्षाला सुरुवात झाली

महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव आणि राज यांच्यातला राजकीय संघर्ष हा अधे मध्ये चर्चेत येत असतो. मात्र या संघर्षांलाही मोठा इतिहास आहे. या दोघांमध्ये संघर्ष सुरु व्हायला इतिहासातली एक निवडणूक कारणीभूत ठरली होती.

ते वर्ष होते १९९६.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. राज्यात शिवसेना भाजप युतीची सत्ता आली होती. बाळासाहेब ठाकरे नावाचं भगवं वादळ संपूर्ण राज्यावर घोंगावत होतं. आपल्या जहाल आणि रोखठोक भाषणांनी त्यांनी महाराष्ट्राला जिंकून घेतल होतं. मनोहर जोशी जरी मुख्यमंत्री असले तरी सत्तेचा रिमोट बाळासाहेब ठाकरेंच्या हातात होता.

शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचं पक्षात एकहाती वर्चस्व जरी असलं तरी हळूहळू नवं नेतृत्व उभं राहात होतं. यातच प्रमुख नाव म्हणजे बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे.

भारतीय विद्यार्थी सेनेच्या रूपात राज ठाकरे यांनी आपली स्वतःची ताकद निर्माण केली होती. तरुण मुलं त्यांचे फॅन होते. बाळासाहेबांची झलक राज ठाकरेंमध्ये दिसते असं बोललं जात होतं. राज ठाकरे यांनी ग्रामीण भागात सेनेला वाढवायची जबाबदारी स्वीकारली होती.

१९९६ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी हट्टाने सेनेची काही तिकिटे आपल्या आवडीच्या उमेदवाराला द्यायला लावली होती. राज ठाकरे यांच्या कोट्यातूनच अहमदनगर लोकसभा मतदारसंघात परवेझ दमानिया यांना तिकीट मिळालं होतं.

परवेझ दमानिया म्हणजे त्या काळातील हवाई वाहतूक क्षेत्रातील बडी हस्ती.

तो काळ जागतिकीकरणा नंतरचा होता. भारतात अनेक एअरलाईन्स उभ्या राहत होत्या. हॅचरीज पासून ते फार्मस्युटिकल कंपन्यांचा बादशाह असलेल्या दमानियांनीही आपली एअरलाईन्स उभी केली. डोमेस्टिक लेव्हलला फाईव्ह स्टार सुविधा देणारी एअरलाईन्स म्हणून दमानिया यांना ओळखलं जायचं. त्याकाळात ते विमानात दारू देखील पुरवायचे.

प्रचंड श्रीमंत असणारे दमानिया नगर मधून हमखास निवडून येणार असं बोललं जात होतं. शिवाय आक्रमक शिवसैनिकांची ताकददेखील त्यांच्या पाठीशी उभी होती. दमानियांनी जोर लावला होता.

त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून उभे होते दादा पाटील शेळके.

दादा पाटील शेळके यांचे गाव खारेकर्जुने, नगरपासून बारा किमी अंतरावर. घरी सर्व शेती करायचे. दादा पाटीलही शाळेत असताना शेतीची कामे करायचे. विशेष म्हणजे आमदार, खासदार झाले तरी शेती करायची त्यांची आवड त्यांनी सोडली नाही.

त्यांचं शिक्षण दहावी पर्यंत झालं होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर घरची जबाबदारी पडल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. शेतीत राबले तर खायला मिळेल असे ते दिवस होते. यामुळे दादा पाटलांनी शेतीत स्वत:ला झोकून दिले. 

गावातील काही तरुणांनी ‘चांगला बोलतो, लोकांच्या कामाची आवड आहे’ या गुणावर त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभे करण्याचा चंग बांधला. दादा पाटलांनी देखील हे आव्हान स्वीकारलं. १९६२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत ते अपक्ष म्हणून निवडून आले होते.

पंचायत राज व्यवस्था, ग्रामीण भागातील प्रश्नांचा त्यांनी अभ्यास केला. लोक कामे घेऊन आल्यावर कोण, कोणत्या गावचा असे अस्थेने विचारपूस करत. लोकांनाही त्यांच्याबाबतीत आपुलकी वाटू लागली. पुढे ते पंचायत समितीचे सभापती झाले.

१९७८ साली विधानसभा निवडणुकीसाठी दादा पाटील अपक्ष म्हणून उभे राहिले. पहिल्यांदाच त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली. त्यांच्या निवडणुका लोकच हातात घेत हे विशेष. वसंतदादा पाटलांचे ते पट्टीचे शिष्य होते. पुढे जेव्हा पवारांनी वसंतदादांचं सरकार पाडलं आणि पुलोदचा प्रयोग केला तेव्हा दादा पाटलांना मंत्रिपदाची ऑफर होती पण ते शब्दाला पक्के होते. पवारांना त्यांनी त्याकाळात नकार कळवला होता.

दादा पाटील शेळके यांनी सलग चार वेळा आमदारकी, दोन वेळा खासदारकी जिंकली पण आयुष्यभर अत्यंत साधेपणा जपला. 

आपला प्रचार ते सायकलवरून किंवा मोटारसायकलवर बसून प्रचार करायचे. कोण कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या नेत्याचा कार्यकर्ता आहे, याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. सर्वांची कामे ते आवडीने करत. लोकांच्या कामासाठी अधिकाऱ्यांना फोन लावून कळकळीची विनंती करायला ते विसरत नसत. अधिकाऱ्यांना झापणे, त्यांची झाडाझडती असले प्रकार दादा पाटील यांनी कधीच केले नाहीत.

१९९४ मध्ये बाळासाहेब विखे-यशवंतराव गडाख यांच्या लोकसभा निवडणुकीचा वाद कोर्टात गेला. कोर्टाने निवडणूक रद्द केली. त्यावेळी दादा पाटील यांच्या गळ्यात दोनदा खासदारकीची माळ पडली. दूधसंघापासून ते साखर कारखान्यापर्यंत सगळीकडे अध्यक्षपद भूषवलं. पण कधी राजकारणाचा रुबाब दाखवणारा कडक खादीचा शर्ट वापरला नाही कि कधी मर्सिडीज बीएमडब्ल्यू सारखी गाडी वापरली नाही.

फक्त दिखावा नाही तर बऱ्याचदा दादा पाटील आपल्या एखाद्या कार्यकर्त्याच्या सायकलीवर डबलशीट बसून लोकांचे प्रश्न सोडवायला जाताना कित्येकांनी पाहिलंय. पाटलांच्या साधेपणाबद्दल नगर जिल्ह्यात विरोधक देखील कधी शंका घेताना दिसले नाहीत.

अशा या दादा पाटील शेळकेंनी दमानिया यांच्या विरुद्धची लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी बदलली.

स्वतः राज ठाकरे परवेझ यांच्या मागे संपूर्ण ताकदीने उभे होते. जनशक्तीचा जोर परवेझ दमानिया यांच्यावर भारी पडला. मोटारसायकल वरून प्रचार करणाऱ्या दादा पाटील शेळकेंनी त्यांना अस्मान दाखवलं. राज्यभरात याची चर्चा झाली.    

असं म्हणतात की याच निवडणुकीपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात स्पर्धेला सुरवात झाली. लोकसभेला हरलेल्या दमाणियांना राज ठाकरे राज्यसभेवर पाठवू पाहत होते पण अखेर उद्धव ठाकरे यांच्या आग्रहानुसार संजय निरुपम यांना तिकीट मिळालं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राजकीय संघर्षांला ही निवडणूक कारणीभूत ठरली होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.