भारताला स्वातंत्र्य देण्याच्या विरोधात असणाऱ्या पक्षाच्या निवडणुकीत एक भारतीय बाजी मारतोय..

एकेकाळी भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव समोर आहे. कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या लीडरशिपच्या निवडणुकीत एक भारतीय बाजी मारत आहे. १८ जुलैला कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा लीडर निवडण्यासाठी तिसऱ्या फेरीतील मतदान झाले. 

या निवडणुकीत कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या ३५७ मतांपैकी ११८ मतं मिळवून ऋषी सुनक पहिली पसंत ठरले आहेत. तर या निवडणुकीत पेनी मॉर्डनंट दुसऱ्या स्थानावर राहिल्या आहेत. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या केमी बेडानोच या शर्यतीतून बाहेर पडल्या आहेत. 

ऋषी सुनक पहिली पसंत असलेल्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा भारत आणि भारतीयांबरोबरच इतिहास मात्र रंजक आहे..

कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या लीडरशिपची निवडणूक अशी आहे..

मंत्रिमंडळातील खासदारांच्या बंडखोरीनंतर बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. बोरिस जॉन्सन यांच्यानंतर कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा नेता आणि ब्रिटनचा भावी पंतप्रधान बनण्यासाठी पक्षातील सात चेहरे समोर आले होते.

त्या सात व्यक्तींमधून लीडरची निवड करण्यासाठी दररोज मतदान चालू आहे. १८ जुलैला तिसऱ्या राऊंडचे मतदान झाले तर २१ जुलै ला शेवटचे मतदान केले जाईल. त्यात पक्षाचा नेता निवडला जाईल आणि ५ सप्टेंबर रोजी नवीन व्यक्ती ब्रिटनच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतील. 

मात्र याच कन्झर्व्हेटिव्ह पक्षाने भारताला स्वातंत्र्य द्यायला विरोध केला होता..

१९४० च्या दशकात जेव्हा भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी चालू झाली होती तेव्हा याच कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा भारताला स्वातंत्र्य देण्याला विरोध होता. १९४० मध्ये कन्झर्व्हेटिव्ह पक्ष सत्तेत होता. 

तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान असलेले विन्स्टन चर्चिल हे भारताला स्वातंत्र्य देण्याला विरोध करणाऱ्या नेत्यांमध्ये सर्वात मोठे नेते होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यास भारतात कशा पद्धतीने अनागोंदी माजेल यावर विन्स्टन चर्चिल यांनी अनेक भविष्यवाण्या सुद्धा केल्या होत्या. 

विन्स्टन चर्चिलची भविष्यवाणी..  

जेव्हा भारताला स्वातंत्र्य देण्याचा मुद्दा उठला होता तेव्हा चर्चिलने भारताबद्दल आणि भारतीय नेत्यांबद्दल अनेक भविष्यवाण्या आणि बेताल विधानं केली होती.

विन्स्टन चर्चिलनी म्हटलं होतं कि, “जर भारताला स्वातंत्र्य देण्यात आले तर भारताची सत्ता नालायक, बदमाश आणि फूकटखाऊंच्या हातात जाईल. भारतीय नेते अकार्यक्षम आणि भुसभुशीत आहेत. त्यांच्याकडे फक्त गोड जीभा आणि मूर्ख हृदयं आहेत.”

परंतु भारताला स्वातंत्र्य देणाऱ्या मजूर पक्षाला सोडून ब्रिटिश-भारतीय कन्झर्व्हेटिव्ह पक्षाला पाठिंबा का देतात..

कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या विन्स्टन चर्चिलची सत्ता गेल्यांनतर १९४५ ला ब्रिटनचे पंतप्रधान झालेल्या क्लेमंट ॲटली यांची भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका होती. मजूर पक्ष सुद्धा कायम भारताला स्वातंत्र्य देण्याच्या भूमिकेचाच राहिला होता. 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यांनतर सुद्धा भारत आणि भारतीयांची मजूर पक्षाशीच जवळीक होती. मात्र १९८० नंतर कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या भूमिकेत बदल होत राहिला आहे. त्यामुळे ब्रिटनमधील भारतीयांच्या भूमिकेत सुद्धा बदल होत गेला.

आज भारतीय मोठ्या संख्येने कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या बाजूने तर पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक मात्र मजूर पक्षाच्या बाजूने असल्याचे यावर झालेल्या काही अभ्यासांवरून दिसते. 

कश्मीरमधून कलम ३७० काढून टाकल्यानंतर मजूर पक्षाने भारताविरोधात प्रस्ताव मांडला होता..

भारताने जम्मू कश्मीर राज्याला स्वायत्तता देणारा कलम ३७० काढून टाकला. भारताने कलम ३७० काढून टाकल्याच्या विरोधात मजूर पक्षाने आपत्कालीन प्रस्ताव सुद्धा ब्रिटनच्या संसदेत मांडला होता. 

या प्रस्तावादरम्यान भारताच्या विरोधात नारेबाजी झाली होती तसेच कश्मीरात मानवाधिकाराचे हनन केले हात असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे भारतीयांमध्ये बहुसंख्य असलेल्या हिंदूंनी मजूर पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली असे सांगितले जाते.

त्याउलट कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदारांनी जम्मू कश्मीरला भेट देऊन कश्मीरात सगळं काही व्यवस्थित असल्याचा निर्वाळा दिला होता.  

ब्रिटिश-भारतीयांची लोकसंख्या आणि भारतीयांना असलेला मतदानाचा अधिकार..

ब्रिटनमध्ये भारतीयांची लोकसंख्या प्रभावी आहे. ब्रिटनमध्ये भारतीयांची लोकसंख्या जवळपास २.३ टक्के आहे. तसेच ब्रिटनमधील भारतीय व्यवसाय, नोकऱ्या, राजकारण या सगळ्यांमध्ये प्रभावी असलेले दिसतात. 

परंतु यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटिश नागरिक असलेल्या भारतीयांव्यतिरिक्त अनिवासी भारतीयांना म्हणजेच एनआरआयला सुद्धा मतदानाचा अधिकार आहे.

ग्रेट ब्रिटनने राज्य केलेल्या देशांची एक संघटना आहे कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स. या कॉमनवेल्थ संघटनेत सहभागी असलेल्या ५६ सदस्य देशांमधील नागरिकांना ब्रिटनच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आहे.

भारतसुद्धा या कॉमनवेल्थ देशांच्या संघटनेतील सदस्य असल्याने भारतीय नागरिकांना सुद्धा ब्रिटनमध्ये मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे भारतीयांची भूमिका सुद्धा महत्वाची आहे. 

ऋषी सुनक यांना मिळणारी पहिल्या पसंतीची मतं आणि ब्रिटनच्या पंतप्रधानाच्या शर्यतीतील सुनक यांना मिळत असलेली पसंती अभूतपूर्व आहे. यावरून ब्रिटिश राजकारणात भारतीयांचा ठसा उमटण्याची दाट शक्यता आहे. 

ऋषी सुनक यांच्या रूपाने एकेकाळी भारताच्या स्वातंत्र्याला विरोध करणाऱ्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदाची माळ भारतीयाच्या गळ्यात पडणे हे इतिहासातील एक नवे वळण असेल. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.