उद्धव ठाकरेंची मवाळ, स्वच्छ, सोज्वळ भूमिका जनतेला भावली पण आमदारांना नाही…

महाराष्ट्रातल्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. एका मुख्यमंत्र्याला पद सोडावी लागलेय तर तर गेले अडीच वर्षे सत्तेसाठी प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदाराला उपमुख्यमंत्रीपदी समाधान मानावं लागलं. आता हे अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत झालं आहे हे तर तुम्हाला कळलंच असेल. मात्र उद्धव ठाकरेंना जनमानसात एक वेगळीच सहानुभूती पाहायला मिळाली.

सुप्रीम कोर्टाने ३० जूनला म्हणजे आज होणाऱ्या फ्लोअर टेस्टला स्थागिती देण्यास नकार दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

मागच्या दोन अडीच वर्षांपासून महाराष्ट्राला परिचित झालेल्या आपल्या  स्टाइलमध्ये मुख्यमंत्री फेसबुक लाइव्हने लोकांशी संवाद साधण्यासाठी जनतेसमोर आले.

सत्ता हातातून जात असताना, पक्षात उभी फूट पडली असतानाही देखील या भाषणात उद्धव ठाकरे यांचा संयम कुठेही ढळलेला दिसला नाही. आपल्या नेहमीच्या शांत, मृदू शैलीत त्यांनी सामान्य शिवसैनिक, मित्रपक्ष अगदी राज्यपालांचे आभार मानत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

मी पुन्हा येइल असं कधी म्हटलंच नव्हतं असा आपल्या टिपिकल स्टाईलमध्ये टोमणा हाणत त्यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला.

त्यांच्या या मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या भाषणातही कुठं राग, लोभ ,मत्सर दिसला नाही. सोज्वळ, स्वच्छ मनाचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची प्रतिमा कायम राहिली.

जनमानसातही अशीच प्रतिमा उलटली. चांगला होता बिच्चारा! याचा आशयाचा प्रतिक्रीया लोकांच्या होत्या. ज्यांनी कधी राजकारणात इंटरेस्ट दाखवला नाही त्यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवले होते. सेलीब्रिटीज जे कधीही कोणत्या राजकीय पक्षाची बाजू घेण्यास कचरतात त्यांनी देखील मुखमंत्र्यांच्या राजीनाम्यावर हळहळ व्यक्त केली.

 

ठाकरे म्हणजे आक्रमकता, कट्टरता अशी प्रतिमा असताना ठाकरेंनी आपल्या मवाळ भूमिकेने लोकांच्या मनात स्थान कसं मिळवलं हे बघण्यासारखं आहे.

१)सर्वसमावेशक भूमिका

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेपेक्षा काही कारणांनी वेगळी ठरते त्यातलंच हे एक कारण. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात शिवसेनेनं कोणतीही टोकाची भूमिका घेतलेली आपल्याला दिसत नाही.

हिंदू धर्म, मराठी माणूस ही याची अस्मिता मुखमंत्र्यांच्या भाषणात दिसत असली तरी उत्तर भारतीय, धार्मिक अल्पसंख्यांक यांच्या विरोधात मात्र त्यांनी कधी द्वेषपूर्ण वक्तव्ये केली नाहीत. 

त्यांच्या मुख्यामंत्रीपदाच्या काळात CAA -NRC, मॉब लिंचिंग याववरुन देशभर वातवरण तापलं होतं, मात्र उद्धव ठाकरेंनी याचं लोण महाराष्ट्रत पसरवू दिलं नाही. 

त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात हिंदू-मुस्लिम  धार्मिक तणाव निर्माण होईल अशा खूप कमी घडल्या. हे यासाठी हायलाइट कारण्यासारखं आहे कारण देशभरता याच काळात हिंदुत्वाची विचारधारा असणारे मुख्यमंत्री आहेत तिथं धार्मिक तणाव शिखरावर राहिला.

त्यांच्या या भूमिकेमुळे त्याना काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जुळवूनही सोपं गेलं हा त्याचा अजून एक फायदा झाला हा भाग वेगळा. त्यामुळं ध्रुवीकरणाचं, धार्मिक कट्टरतेचं राजकारण नेहमीचंच झालेल्या जनतेला हा बदल वेगळा वाटला.

२)जहरी हिंदुत्व स्विकारलं नाही 

आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं; घर पेटवणारं नाही. हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्वापेक्षा आमचं हिंदुत्व वेगळं असल्याचं म्हटलं होतं. बाळासाहेबांच्या हिंदुत्वापासून सेना लांब चालली आहे याला उद्धव ठाकरे यांनी असं ट्विस्ट केलं होतं.

एका बाजूला शिवसेना राममंदिर आंदोलनात आम्ही कसं सामील होतो हे वेळोवेळी सांगत होती.  आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचं भांडवल देखील सेनेनं केलं.

मात्र त्याचवेळी मशिदीवरील भोंग्यांचा वादात मात्र कोणती टोकाची भूमिका घेतली नाही.

देशभर गाजलेला हिजाबचा मुद्दा असू दे या कशी, मथुरा येथील मंदिर-मस्जिद वाद यातही शिवसेनेच्या नेत्यांनी वादग्रस्त भूमिका घेतली नाही.

३) पक्षात लिबरल चेहरे वाढवले 

प्रियांका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर यांसारखे चेहरे उद्धव ठाकरेंनी काँग्रेसमधून शिवसेनेत आणले. सरकारच्या  वेब ३.० वर बोलणं, झुबेरच्या अटकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे ते अगदी काश्मिरी पंडितांवरील हल्यांचा निषेध या सर्व मुद्यांवरील भूमिका प्रियांका चुतुर्वेदींसारख्या नेत्या राष्ट्रीय चॅनेल्सवर मांडत असतात.

त्यामुळॆ शिवसेना म्हणजे नुसते कट्टर हिंदुत्व आणि मराठी अस्मिता हे शिवसेनेची ओळख पुसून टाकनं  शिवसेनेला शक्य झालं.

यामुळं शहरी उच्चवर्गींयांपर्यंत पोहचण्यास सेनेला मदत झाली.

४) कोरोना काळात आपला माणूस, कुटुंबप्रमुख अशी तयार झालेली प्रतिमा 

ठाकरे सरकारच्या सुरवातीच्या काही महिन्यातच करोनाची लाट आली. पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची ही कसोटी होती मात्र ठाकरे  यांनी हे अभूतपूर्व संकट देखील तितक्याच संयमाने हातळले असं मत अनेक विश्लेषकांनी नोदंवलं होतं. 

करोना काळात प्रत्येक निर्णय उद्धव ठाकरे जनतेच्या समोर येऊन जाहीर करत होते. त्यामागील कारणं लोकांना समजवून सांगत होते. विशेषतः लोकांना धीर देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुकही झाले होते. लॉकडाऊनमुळे घरात अडकलेली जनता मुखमंत्र्याचं प्रत्येक संबोधन मन लावून बघत असायची.

करोनाकाळात  काळात मुख्यमंत्र्यांचा चेहरा घरात पोहचला आणि त्यांची कुटुंबप्रमुख ही छबी निर्माण झाली. 

जेव्हा मुख्यमंत्री राजीनाम्याचं संबोधन करत होते तेव्हा त्यांच्या कोविड काळातल्या संवादांची आठवण झाली असणार एवढं नक्की.

मात्र मुख्यमंत्र्याची ही भूमिका सगळ्यांनाच विशेषतः त्यांचा आमदारांनाच पटली नाही हे सत्य आहे. आज आमदार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाला देखील दोष आहेत. आमदार ज्याबद्दल तक्रार करतात त्यातील प्रमुख कारणांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या आदर्शवादी भूमिकांचा देखील तितकाच रोल असल्याचं कळतं.

१)नियमाच्या बाहेर जाऊन मागण्या मान्य केल्या नाहीत 

बंडांनंतर गुवाहाटीमधून एकनाथ शिंदेंच्या कॅम्पमधले एक एक आमदार व्हिडिओच्या माध्यमातून आपलं दुखणं मांडत होते. त्यामध्ये संजय शिरसाट यांनी एक खदखद बोलून दाखवली होती. त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंकडून निधीचा आणि बदल्यांचा विषय डावलल्याचं कळतं. हे दोन्ही विषय असे आहेत की जिथं मुख्यमंत्री किंवा कोणी मंत्री आपल्या ताकदीची उपयोग करून कायद्याची चौकट वाकवून आपल्या समर्थकांची सोय करत असतात. कारण यातून मिळणार पैसा, वाढणारं कार्यकर्त्यांचं नेटवर्क हे निवडणुकीच्या कामात येत असतंय.

मात्र मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्र्यांनी आदर्शवादी भूमिका घेत  निधीचा आणि बदल्या असे विषय टाळल्याचं दिसतं. 

त्यामुळे त्यांची स्वच्छ, भ्रष्टाचाराचे आरोप नसलेले मुख्यमंत्री अशी प्रतिमा निर्माण झाली.मात्र त्यावेळी आमदारांची नाराजी मात्र त्यांना भोगावी लागली.

२)सत्तेचं राजकारण नं करण्याची चूक 

आजपर्यंतचा आघाड्यांच्या किंवा युतीच्या सरकारांचा हा एक महत्वाचा अडथळा राहिला आहे तो म्हणजे एकत्र आलेले पक्ष नेहमीच एकमेकांवर कुरघोड्या करत असतात. त्यामध्ये स्वतःच्या पक्षाच्या आमदारांना निधी जास्त देणे, मित्रपक्षांच्या निधी आडवाने, आपल्या हरलेल्या उमेदवारांना बळ देणे असे प्रकार चालू असतात. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी देखील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर हेच आरोप केले आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने असे कोणतेच आरोप केलेले नाहीत.

त्याचवेळी त्यांनी आपल्या पक्ष वाढवण्यासाठी मुख्यमंत्री पदाचा वापर देखील केला नाहीआणि सत्तेच्या राजकारणात उद्धव ठाकरे इथंच मागे पडले.

३) मवाळ हिंदुत्व म्हणजे काँग्रेससीकरण  

मवाळ हिंदुत्वाची भूमिका हे कारण सध्या बंडखोर आमदार शिवसेना सोडण्यामागील कारण सांगत आहेत. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत अशी त्यांची भूमिका आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला जवळ करून सेनचं काँग्रेससीकरण केल्याचा आरोपही त्यांना सहन करावा लागत आहे. विरोधी पक्ष भाजप आणि मनसे यांनी याच मुद्यांवरून उद्धव ठाकरे यांना घेरलं होतं.

या सगळ्यांमुळे महाराष्ट्राच्या अजून एका मुख्यमंत्र्याने ५ वर्षे पूर्ण नं करताच राजीनामा दिला मात्र मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने जनतेला झालेली हळहळ आमच्या पिढीने पहिल्यांदाच पहिली. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.