चंद्रपुरच्या लोकांनी मुख्यमंत्र्यांना सोन्यात तोललं आणि ते पैसे ६२ च्या युद्धासाठी पाठवले

शाळेत देशभक्तीपर गीत सादर करतांना १९६२ च्या भारत चीन युद्धावर आधारित अनेक कविता आपण गायल्या आहेत. या कवितांमध्ये कवी राजा मंगसुळीकरांनी यशवंतराव चव्हाणांवर लिहिलेली प्रसिद्ध कविता आजही सर्वांच्या ओठांवर आहे..

हिमालयावर येता घाला सह्यगिरी हा धावून गेला… 

मराठमोळ्या पराक्रमाने दिला दिलासा इतिहासाला..

परंतु हिमालयाच्या मदतीला गेलेला सह्यगिरी आपल्याला ठाऊक आहे मात्र हिमालयाचे रक्षण करणाऱ्या सह्यगिरीला ज्याने रसद पुरवली तो झाडीपट्टीतील नेता मात्र विस्मरणात गेला..

यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर मारोतराव कन्नमवार महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री झाले. मारोतराव कन्नमवारांनी हिमालयाचे रक्षण करण्यासाठी राज्यात लोकसहभाग उभा करून देशासाठी संरक्षण निधी गोळा केला होता. 

त्यांच्या या कामाने भारावलेल्या चंद्रपूरकरांनी चक्क मारोतरावांची सुवर्णतुला केली आणि आपलं सोनं देशाच्या रक्षणासाठी अर्पण केलं होतं..

१९६२ चं युद्ध आणि महाराष्ट्रातील घडामोडी..

कोणतीही पूर्वसूचना न देता २० ऑक्टोबर १९६२ ला चीनने भारताच्या अरुणाचल प्रदेशावर आक्रमण केले होते. या हल्ल्याची माहिती दिल्लीला मिळाली आणि युद्धाचा मोर्चा पक्का करण्यात आला. 

युद्धाची गंभीरता लक्षात घेऊन युद्धाच्या बाराव्या दिवशी संरक्षण मंत्री वि.के. कृष्ण मेनन यांना पदावरून काढून पंत्रप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संरक्षण खाते आपल्या हातात घेतले. परंतु तरीही युद्ध संपले नाही. 

त्यानंतर लगेच १४ दिवसांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीला बोलावले आणि त्यांच्या हाती देशाच्या संरक्षण मंत्री पदाची सूत्रे सोपवली.

यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षण मंत्रिपदाची सूत्रं हातात घेतली तोच सातव्या दिवशी म्हणजेच २१ ऑक्टोबर १९६२ ला भारत चीन युद्ध समाप्त झालं..

युद्ध समाप्त झालं मात्र देशाच्या संरक्षण व्यवस्थेला पुन्हा नव्याने उभं करण्याची मोठी जबाबदारी यशवंतरावांच्या खांद्यावर आली होती..

स्वातंत्र्याबरोबर झालेली फाळणी आणि पाकिस्तानबरोबर झालेल्या काश्मिरातील युद्धाची जखम भरून निघण्याच्या आतच चीनने भारतावर आक्रमण केलं होतं. दोन देशात झालेल्या या युद्धानंतर मुळात ब्रिटिशांनी पोखरून काढलेल्या भारतासमोर संरक्षण निधी उभं करण्याचे मोठे आव्हान होते.

भारतासमोर असलेल्या या संकटाला दूर करण्यासाठी महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार खंबीरपणे उभे राहिले.

 मारोतरावांनी अभिनेत्यांच्या हातात चादरी दिल्या आणि लोकसहभाग उभा केला..

भारतावर आलेल्या या संकटात यशवंतराव धावून गेलेच पण त्यांना संरक्षण साहित्य उभे करायला निधीची गरज होती. हा निधी केवळ सरकारच्या बजेटमधून उभा करणे अवघड होते. त्यामुळे मारोतरावांनी लोकसहभागाची चळवळ उभी केली..

त्यासाठी युद्ध समाप्त झाल्याच्या अवघ्या पाच दिवसांनंतर म्हणजेच २६ नोव्हेंबार रोजी मुंबईत मोठ्या प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभातफेरीत तिन्ही बाजूने मोकळे ट्रक चालत होते. 

यात पहिल्या ट्रकवर स्वतः मारोतराव उभे होते तर त्यामागील ट्रकांवर लता मंगेशकर, दिलीप कुमार, अशोक कुमार, मोतीलाल, राज कपूर आपल्या जातात चादरी घेऊन उभे होते आणि देशाच्या संरक्षण निधीला मदत करा असे आवाहन करत होते.

सकाळी आठ वाजता निघालेली प्रभात फेरी रात्रीपर्यंत फिरत होती. त्या प्रभात फेरीत तब्बल ७ कोटी ९१ लाख ५५ हजार रुपयांचा निधी गोळा करण्यात आला होता.. 

जमा झालेल्या निधीचे पोते शिवाजी पार्कवर मोजण्यात आले होते. आणि त्यांनतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना मुंबईत बोलावून सामान्य लोकांच्या उपस्थितीत हा निधी त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

संरक्षण निधीसाठी वयाच्या ६४ व्या वर्षी मारोतराव क्रिकेटच्या मैदानावर उतरले..

मुंबईतील प्रभातफेरीतुन करोडो रुपये जमा झाले तरी मारोतराव कन्नमवार यावर थांबले नाही. संरक्षण निधी उभा करण्यासाठी मारोतरावांनी वयाच्या ६४ च्या वर्षी क्रिकेट खेळण्याचं ठरवलं.

मग यासाठी दोन टीम बनवण्यात आल्या. पहिली टीम आमदार आणि मंत्र्यांची होती ज्याचे कॅप्टन स्वतः मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार होते. तर दुसरी टीम मुंबईच्या नगरसेवकांची होती ज्याचे कप्तान मुंबईचे महापौर एम एन शाह होते.

मुंबईच्या बॉम्बे जिमखान्याच्या मैदानावर खेळलेल्या या मॅचमुळे २५ लोक रुपयांचा निधी गोळा झाला. लहानपणी स्वतः लाकडाच्या बॅट बनवून क्रिकेट खेळणाऱ्या मारोतरावांनी आपला छंद देशाच्या संरक्षणासाठी वाहिला.

आणि भारावलेल्या चंद्रपूरकरांनी आपल्या नेत्याची सुवर्णतुला केली..

मारोतराव राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असतांना जेव्हा जेव्हा चंद्रपुरात यायचे तेव्हा चंद्रपुरात सोहळे व्हायचे. लोकं दुरदुरून त्यांना बघायला यायचे. मग आपल्या जिल्ह्यातील माणूस देशाच्या संरक्षणासाठी एवढं मोठं योगदान देतोय ही संधी ते कसे सोडतील.

देशाच्या संरक्षण निधीत मदत करण्यासाठी भारावलेल्या चंद्रपूरकरांनी मुख्यमंत्र्यांची सुवर्णतुला करण्याचं ठरवलं. चंद्रपूर शहरासह ज्या ज्या खेड्यापाड्यात ही बातमी पसरली तिथल्या लोकांनी आपल्या घरचे जमेल तितके सोने यात देऊ केले.

महिलांनी आपले दागिने, अनेकांनी आपल्या लहान लेकींच्या कानातल्या सोन्याच्या बाळ्या या सुवर्णतुलेसाठी अर्पण केल्या आणि भराभर सोनं नाणं जमा झालं.

सुवर्णतुलेसाठी धान्य मोजण्याच्या पसरट वजन काट्याच्या एका पारड्यात मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार पारड्याच्या साखळ्यांना हात पकडून उभे झाले. आणि दुसऱ्या पारड्यात लोकांनी गोळा केलेले सोने नाणे आणि दागिने टाकण्यात आले.

सोन्याची पिशवी पारड्यात टाकल्याबरोबर सोन्याचं पारडं जमिनीला टेकलं आणि मुख्यमंत्र्यांचं पारडं हवेत वर गेलं.

चांदा वासियांनी आपल्या पोराला सोन्याने मोजून ते सोनं संरक्षण निधीमध्ये दिलं. मारोतरावांनी लोकसहभागासाठी जे कष्ट उपसले त्याला त्यांच्याच जिल्ह्याने सोन्याचा मुलामा दिला मुख्यमंत्र्यांच्या कष्टाचं केलं.

भविष्याचा विचार करणाऱ्या मारोतरावांनी भद्रावती, भंडारा, वरणगाव येथे संरक्षण साहित्य निर्माण करण्याचा कारखाना आणला. तर ओझर येथे मिग विमानांचा कारखाना सुरु केला.

संरक्षण निधीसाठी मारोतरावांनी प्रत्येक जिल्ह्यातून निधी गोळा करण्यासाठी त्या त्या जिल्ह्यातील मंत्र्यांना जबाबदारी दिली, श्रमदान मोहीम राबवली, वृक्षारोपण कार्यक्रम केले आणि जमेल त्या मार्गाने निधी गोळा करून हिमालयाचे रक्षण करण्यासाठी गेलेल्या सह्यगिरीच्या रसद पुरवली आणि मराठी माती किती चिकाटीची असते हे दाखवून दिलं..

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.