शिवरायांच्या खऱ्या चित्रांचा शोध घेण्यासाठी एका मराठी माणसानं थेट लंडन गाठलं होतं!

महाराज. हे नाव जरी घेतलं तरी एकच व्यक्तिमत्व सर्वात पहिले बिनविरोध सगळ्यांच्या नजरेसमोर येतं, ते म्हणजे ‘छत्रपती शिवाजी महाराज’. सोबतच महाराजांची प्रतिमाही डोळ्यासमोर उभी राहते. मात्र प्रत्येकासमोर उभी राहणारी ही प्रतिमा वेगवेगळे असते. याचं कारण म्हणजे महाराजांचे अनेक वेगवेगळे चित्र आपल्या बघण्यात आलेले आहेत.

इतिहासात बघितलं तर प्रत्येकाने महाराजांना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या ब्रशमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केलाय. ज्यामुळे महाराज नेमके कसे दिसायचे? त्यांचं खरं चित्र कोणी काढलं? याबद्दल अनेकांच्या मनात साशंकता आहे. त्याचमुळे महाराजांच्या चित्राबद्दल इतिहासात थोडी माहिती शोधावी असा विचार आला आणि ‘मऱ्हाटा पातशाह’ हे पुस्तक घावलं.

या पुस्तकातही शिवाजी महाराजांच्या चित्राबद्दल अनेक समज गैरसमज नोंदविण्यात आले आहेत. मात्र शिवरायांची इतिहास विषयक पुस्तकातून जी चित्र घराघरांमध्ये पोहचली आहेत, ती नेमकं कोणी दिली? याचा संदर्भ सापडतो.

ज्यांच्यामुळे हे शक्य झालं ते म्हणजे ‘श्री वा. सी. बेंद्रे’.

आता शिवाजी महाराजांचं अस्सल चित्र बेंद्रे यांनी कसं मिळवलं? याबाबतची हकीकत ‘छत्रपती शिवाजी महाराज’ (पूर्वार्ध) या ग्रंथाच्या निवेदनात दिली आहे. त्यानुसार…

श्री बेंद्रे ‘संभाजी महाराजांच्या’ चरित्राची तयारी करण्यासाठी लंडनला गेले होते त्यावेळी ग्रंथ चाळताना त्यांच्यासमोर मॅकेंझीने संपादित केलेल्या ग्रंथाचे काही भाग आले. त्यातच त्यांना महाराजांची अस्सल चित्र सापडली. ‘व्हॅलेंटीन’ या डच गव्हर्नरने लिहिलेले पत्र त्यात होते. हा गव्हर्नर इसवी सन १६६३-६४ मध्ये सुरतच्या डच वखरीत गव्हर्नर होता.

महाराज यादरम्यान जेव्हा सुरत स्वारीला गेले होते तेव्हा व्हॅलेंटीन याने त्याच्या आणि शिवाजी महाराजांच्या भेटीप्रसंगी काही चित्र काढून घेतले होते. हेच चित्र आणि व्हॅलेंटीनचे पत्र बेंद्रे यांना मिळाले. अशावेळी बेंद्रे यांनी मूळ चित्राचं तितक्याच आकाराचं एक छायाचित्र काढून घेतले. यामध्ये महाराजांचं एक वेगळे स्वरूप समोर जगासमोर आलं.

यातील एका चित्रात शिवाजी महाराजांचे कल्ले दाखवण्यात आले आहेत, जे इतर कोणत्याही चित्रात दिसणार नाही. पांढऱ्या अंगरख्यावर शिवरायांनी चक्क उपरणे टाकले आहे आणि अंगावर दागिने मराठमोळ्या पद्धतीचेच आहेत. इंग्लंडमध्ये या चित्राची बेंद्रे खात्री करून घेतली आणि अशाप्रकारे त्यांना प्राप्त झालेल्या चित्रामुळे मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाची देणगी मिळाली.

शिवाजी महाराजांच्या या चित्रामुळे तोपर्यंत समाजात पूजले जाणारे अनेक संदर्भहीन चित्र नाहीशी झाली. बेंद्रे यांच्या चित्रांच्या सहाय्याने पुढे इतिहासातील चित्र छापली जाऊ लागली.

या चित्राची प्राप्ती ही बेंद्रे यांची एक अतिशय महत्त्वाची कामगिरी मानावी लागेल.

पुढे बेंद्रे यांनी या चित्राच्या प्रसारास सुरुवात केली. सर्वप्रथम चित्राच्या आकाराच्या प्रती काढण्यासाठी त्यांनी ‘इंडिया हाऊस’ कडुन परवानगी मिळवली आणि सरकारी छापखान्यातून अशा प्रती छापण्याची त्यांनी योजना आखली.

यात त्यांना साहित्याचार्य न. चिं. केळकर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. इसवी सन १९३३ मधील शिवजयंतीच्या निमित्ताने साहित्याचार्य न. चिं. केळकर यांनी हे चित्र समाजापुढे आणण्‍यासाठी पुण्यातील शिवाजी मंदिरात कार्यक्रम योजना आणि तिथेच या चित्राचं समारंभपूर्वक प्रकाशन करण्यात आलं.

व्हॅलेंटीनच्या संबंधातील शिवाजी महाराजांचे चित्र आणि त्यासंबंधीचा लेख प्रसिद्ध करून वा. सी. बेंद्रे यांनी मराठ्यांच्या इतिहासाला मोलाचे योगदान दिलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीला न्याय देण्याचे काम याच महान संशोधकाकडून झालं आहे.

त्यामुळे वा. सी. बेंद्रे यांना ‘इतिहासाचे भीष्माचार्य’ म्हणूनही ओळखण्यात येतं.

संदर्भ – मऱ्हाटा पातशाह’ लेखक- केतन कैलास पुरी 
हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.