पोर्तुगीजांनी लिहून ठेवलय, संभाजी राजांनी जसा आमचा पराभव केला तसा द. आशियात कोणी केला नाही

शिवरायांची मुत्सद्देगिरी आणि संभाजी राजांची भरारी.

वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी निर्भिडपणे शत्रूच्या गोटात जाणारे इतिहासातले एकमेव उदाहरण म्हणजे संभाजी महाराज. वयाच्या आठव्या वर्षी शंभुराजांना पुरंदरच्या तहामुळे मिर्झा राजे जयसिंग यांच्याकडे मनसबदार म्हणून राहावे लागले. शंभुराजांवर मनसबदारी सारखी राजकीयदृष्ट्या महत्वाची जबाबदारी देण्यामागे कारणीभूत ठरला पुरंदरचा तह आणि छत्रपती शिवरायांची मुत्सद्देगिरी.

आणि इथून सुरूवात झाली शंभूराजांच्या राजकीय कारकिर्दीला.

पुढे लहान वयातच संभाजी राजांना छत्रपती शिवरायांनी स्वतंत्र्य तुकड्यांचे नेतृत्व देऊन रणांगणात धाडले. तसेच शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना मोगल, विजापूरकर, गोवळकोंडेकर यांच्या बाबतचे शिक्षण दिले तसेच युरोपियन व्यापारी कंपन्या, भारतामध्ये पाय रोवू पाहणारी राष्ट्रे, त्यांची दूत व वकील यांच्याशी चर्चा संभाजी महाराजांना करायला सांगुन परराष्ट्र धोरणाचे शिक्षणसुद्धा संभाजी महाराजांना दिले.

याचे परिणाम संभाजी महाराजांच्या नंतरच्या कारकीर्दीत दिसून आले. व प्रत्येक परकीय राष्ट्राला संभाजीमहाराजांनी आपली दखल घेण्यास भाग पाडले. या सर्व घटनांच्या पाठीमागे होती ती शिवरायांची मुत्सद्देगिरी.

परकीयांनी संभाजी महाराजांची कशा प्रकारे दखल घेतली होते ते पाहू.

२४ ऑगस्ट १६८० रोजी डाग रजिस्टरमध्ये कोलंबोकडील एक बातमी दिली आहे. त्यात नमुद केलं आहे की,

“आपल्या वडिलांच्या तत्वांप्रमाणेच संभाजी राजे वागणारे आहेत, असे लोकं म्हणतात. पण त्यांचा स्वभाव अधिक नरम असून कंपनी बद्दल त्यांच्या मनात तितका तिटकारा नाही.”

१८ ऑक्टोंबर १६८० रोजी सुरतकर इंग्रजांनी कंपनीला कळविलेल्या पत्रात म्हटले आहे की,

” संभाजीच्या हल्लीच्या कारभारावरून वडीलांपेक्षा हा निराळ्या स्वभावाचा म्हणजे आधिक नेमस्त आणि सहृदय असा दिसतो.”

बुसातिन – उस – सलातीन मध्ये संभाजी महाराजांबद्दल नमूद केलं आहे की,

” शिवाजींचा पुत्र संभाजी हाही आपले वडिलांचे ठिकाणी कायम होऊन आपले वडिलांचे वतनदारीस पुन्हा नविन तेज देऊन सांभाळीता झाला, म्हणजे संभाजी महाराज हे सुद्धा शिवाजी महाराजांसारखे वागू लागले आहे.

केव्हा केव्हा मसऊदखानाशी सख्य करून मोगलांशी म्हणजे दिल्लीवाल्याशी दगलबाजी करीत होता, व केव्हा केव्हा मोगलांशी सख्य करून दक्षिणी लोकांशी ठकबाजी करून उपद्रव करीत होता.

संभाजीही आपले वडिलांहून म्हणजे शिवाजींहून कमी नव्हता,शिवाजी प्रमाणेच होता. संभाजीनेही आपला बाप व आजाचे वर्तणूकीप्रमाणे वर्तणूक करून दहा वर्षे पर्यंत राज्य केले.”

तसेच काही असे प्रसंग की जे संभाजी महाराजांचे विशेष पैलू आपल्यासमोर ठेवतात.

स्वराज्याच्या सीमेवर औरंगजेब हल्ले करीत असताना त्याला रोखून ठेवून संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांवर स्वारी केली होती. या स्वारीत राजांनी पोर्तुगीजांना चांगला धडा शिकवला. पोर्तुगीजांचा दारुण पराभव झाला. परंतु तो पराभव त्यांनी लपवला नाही त्यांनी संभाजी महाराजांनां बद्दल लिहून ठेवले की,

” दक्षिण आशियात कोणीही केला नाही असा नामुष्कीयुक्त पराभव संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांचा केला आहे.”

सन १६७६ च्या अखेरीस व १६७७ च्या सुरवातीस इंग्रजांची राजापूरची वखार बंद करण्याचे प्रकरण घडले. राजापूरकर इंग्रज अक्षरशः वैतागून राजापूरची वखार बंद करून, व्यापार गुंडाळुन निघाले होते. त्यांना थोपविणे आवश्यक होते. शिवाजी महाराजांकडे अनेक माणसं होती, परंतु त्यांनी या क्षणी संभाजी राजांची नेमणूक केली.

संभाजी राजांनी आपले काम चोख केले. इंग्रज थोपविले गेले. राजापूरला त्यांनी आपला व्यापार चालूच ठेवला आणि त्याचवेळी संभाजीराजे कसे होते याबद्दलचा भक्कम पुरावा दाखल्या स्वरूपात मागे ठेवून गेले. १० जानेवारी १६७७ रोजी सुरतकर इंग्रज म्हणतात की,

“शिवाजी महाराजांच्या मरणानंतरही काळजी करण्याचे कारण दिसत नाही. कारण त्याच्या मुलास अगोदरच मुकुट प्राप्त झालाच असून बराच समंजस असल्याचे दिसते.”

फक्त परकियच न्हवे तर कवींद्र परमानंद आपल्या ‘परमानंद काव्यम्’ या ग्रंथात म्हणतात की,

शिवनरपतिपुत्रश्चारूचत्र्चच्चारित्र
प्रतिसमरमजस्त्रं घोतति स्मातिद्यप्त: || ९६ ||

शिवाजी महाराजांचा पुत्र चरित्राने अत्यंत स्वच्छ होता. परंतु युद्धामध्ये अत्यंत अजस्त्र होता.

संभाजी राजांनी घेतलेली ही भरारी सतराव्या शतकाच्या अखेरीस संभाजी नावाच हे वादळ देशभर घोंगावत होती.

  • भिडू कपिल जाधव

हे ही वाच भिडू 

3 Comments
  1. Satwashil gaikwad says

    अभ्यासपूर्ण लेख आहे आवडला

  2. SHUBHAM KUMBHAR says

    अप्रतिम लेखन

  3. Gayatri@J says

    अप्रतिम लेख👌

Leave A Reply

Your email address will not be published.