कोटा सिस्टीम मुळे अन्याय झाला पण विनोद कांबळीने मुंबई सोडली नाही

भारतात क्रिकेटला नेहमीच प्रोत्साहन दिलं जातं. म्हणजे जेवढी चर्चा राष्ट्रीय खेळ असणाऱ्या हॉकीची होत नाही, तेवढं प्रेम लोक क्रिकेटला देतात. पण क्रिकेट म्हंटल कि, खेळाबरोबर क्रिकेटमधल्या राजकारणाची सुद्धा नेहमीच चर्चा होत असते. यातलाच नेहमीच वादग्रस्त असलेला मुद्दा म्हणजे खेळाडूंची निवड.

खेळाडूंची निवड आणि कोटा सिस्टिमवरून बऱ्याचदा वाद होतात. यामुळे खऱ्या खेळाडूंना डावललं जातं, तो खेळाडू कधी पुढेच येत नाही, असा आरोप होत असतो.

शक्यतो पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण व मध्य अशा पाच विभागांचे प्रतिनिधी निवड समितीत असतात. आता साहजिकच प्रत्येकजण आपापल्या विभागातला चेहरा पुढे आणायला प्राधान्य देणार. याच प्रकारामुळे असा आरोप होतो की, गुणवान खेळाडूंना डावलून प्रांतीय भावना वरचढ होते.

अशी बरीच उदाहरण आहेत ज्यांना कोटा सिस्टीममुळे कसोटी पासून दूर राहावं लागलं. याच सिस्टीमच्या प्रकाराला बळी पडला विनोद कांबळी.

त्यावेळी भारतीय क्रिकेट टीम आफ्रिकेच्या दौऱ्यावर होती. सात एकदिवसीय सामन्यांची मालिका आपण हरलो होतो. पाच सामन्यांत आपल्या संघाचा पराभव झाला होता. चार कसोटी सामन्यांची मालिकाही हातातून गेली होती. या परिस्थितीत विनोद कांबळी सारख्या जबरदस्त खेळाडूची गरज होती. पण तत्कालीन कोटा सिस्टीममुळे विनोद कांबळीला खेळता आले नाही.

या आफ्रिका दौऱ्याच्या वेळी संघाची निवड करताना निवड समितीवाल्यांनी कॅप्टन असलेल्या अझरला विचारले, ‘तुला ज्यादाचा बॅटर पाहिजे की बॉलर?’ यावर अझरने बॉलर मागितला त्यामुळे कोटा सिस्टीमच्या मदतीने तामिळनाडूचा डब्ल्यू. व्ही. रामन दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी निघाला. विनोद कांबळी मात्र एकट्याने कोपऱ्यात बसून रडायला लागला.

या कोटा सिस्टीममुळे अनेक खेळाडूंनी आपले राज्य आणि विभाग बदलून कसोटीत प्रवेश मिळवलेला. विनोद सुद्धा जर मुंबई सोडून दुसऱ्या विभागातून क्रिकेट खेळला असता तर तो कसोटी संघात दिसला असता. पण विनोदने हे पाऊल उचलले नाही.

दिल्लीच्या आकाश लालने सुद्धा विनोदला आपला विभाग बदलण्याचा सल्ला दिला होता कि, “मुंबई सोड. दुसऱ्या विभागात खेळ”. पण विनोदने नकार दिला.

“मी मुंबईत जन्मलो, इथेच नावारूपाला आलो. मुंबईतील क्रिकेट प्रेमींनी माझ्यावर उदंड प्रेम केले. प्रोत्साहन दिले. ही माझी जन्मभूमी मी कशी सोडू ? मी येथेच खेळत राहीन. निवड समिती संधी देईल तेव्हा कसोटीतही माझी निवड सार्थ ठरवून दाखवीन”.

याच कोटा सिस्टीमचा बळी ठरलेले आणखी चेहरे म्हणजे पद्माकर शिवलकर. त्यांनी सुद्धा मुंबईचा नाद सोडला नाही, त्यामुळे रणजी-दुलीपच्या पुढे ते जाऊ शकले नाहीत. त्यातलंच आणखी एक नाव म्हणजे राज कुलकर्णी.

विनोद हा मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला खेळाडू. बाकीच्या श्रीमंत खेळाडूंसारखं त्याला कधी राहता आलं नाही, आणि त्याने कधी त्याचा गवगवा सुद्धा केला नाही. आणि त्याचा खेळ म्हणाल तर भल्याभल्याना डोक्याला हात लावायला भाग पाडेल. पण कसोटी क्रिकेटमध्ये पोहोचण्यासाठी कोटा सिस्टीम त्याला अडथळा बनली.

असं म्हणतात कि, राजसिंह डुंगरपूर यांनी विनोदला, ‘गल्लीतला क्रिकेटपटू’ म्हणून हिणवले होते.

पण कोणाच्या म्हणण्या न म्हणण्याने विनोदच्या खेळावर कधी परिणाम झाला नाही. धावांचा पाऊस त्याने नेहमीच पाडला. त्याची कामगिरी डोळे दिपवणारी होती. पण तरीही त्याला डावलले गेले याचा त्रागा त्यावेळी चाहत्यांमध्ये दिसून आला होता.

त्यावेळी माधवराव महाराज शिंदे हे भारत क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांना हे सगळंच राजकारण ठाऊक होतं. आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात विनोद कांबळीची निवड झाली नाही तेव्हा त्यांनी स्वतः विनोदला बोलावून घेतले. त्याला धीर दिला. पाठीवर मायेने हात फिरवला आणि यापुढेही खचून न जाता त्याच तडफेने खेळत राहा असा आशीर्वादही दिला.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.