‘तेजाब’ मधल्या अनिल कपूरचा खरा आवाज, मिमीक्री आर्टिस्ट सुदेश भोसले यांचा होता
घरात पाहुणे मंडळी आली की घरातल्या पोरांना, गाणी म्हणून दाखव, नकला किंवा मिमीक्री करून दाखव, पोराला अगदी काहीच जमत नसलं तर निदान एखादी कविता वाचून दाखव हे सांगणं ठरलेलं असतंय.
मग ते पोरगं भांबावतं कधी भाव खातं आणि खुळ्यागत जीभ बाहेर काढून उगाच डोलत राहतं. त्याचे पालक त्याने काहीतरी तरी करून दाखवावं म्हणून त्याच्या फक्त पाया पडायचे बाकी असतात. शेवटी पोरगं डोळे चोळत, कंटाळा करत तोंड देखलं काहीतरी करून दाखवतं. आणि पाहुणे तर टाळ्या वाजवायला आधीच तत्पर असतात. बाकीच्या घरांचं माहीत नाय पण प्रत्येक मराठी घरात मात्र हेच दृश्य सर्रास दिसतं.
पण कधीतरी एखादं पोरगं लईच हौशी निघतं.. सुरू होतं ते थांबायचं नाव घेत नाय. एक झाला की दूसरा परफॉरमन्स त्याच्याकडे रेडीच असतोय. आणि अशी ही दुर्मिळ पोरं नंतर बरेचदा नाटक सिनेमात नाव काढतात.
थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांच्या अंगात कला असते आणि नंतर ती फुलत जाते. आता नाच गाण्याला तर हल्ली व्हॅलिडेशन पण मिळालंय. पोरं आणि त्यांचे पालक, नाच गाणं किंवा अभिनय ह्याकडे, नाही म्हटलं तरी एक करियर ऑप्शन म्हणून बघायला लागलीयेत.
पण नकला ? आयुष्यभर इतरांचे आवाज काढून स्वतःचं नाव मोठ्ठं करणं, ग्लॅमर मिळवणं, त्यातूनच रग्गड पैसा कमावणं आणि आपलं करियर सेट करणं.. हे असं कोणाला पण जमत नाही.
त्यासाठी ‘सुदेश भोसले’ व्हावं लागतं.
सुदेश भोसले ह्या नावासोबतच अमिताभ बच्चन, संजीव कुमार, ओम पुरी, किशोरदा अशी अनेक नावं आपसूक जोडली जातात. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे मिमीक्री.
सुदेश भोसले हे मिमीक्री कलेचे बादशाह आणि खऱ्या अर्थाने ट्रेंडसेटर आहेत. आजवर त्यांनी अनेक हिरोंचे आवाज काढले, आणि अनेक पिक्चरमध्ये ते अनेक हिरोंचा आवाजही बनले. शिवाय त्यांच्या गळ्यातला सुर ही त्यांची अजून एक खासियत होती.
ह्या सगळ्याची सुरवात सुदेश भोसले ह्यांच्या लहान वयातच झाली. सुदेश भोसले यांची आई शास्त्रीय गायिका होती. आणि वडील आर्टिस्ट होते. शिवाय सुदेश भोसलेंच्या आजी सुद्धा आग्रा घराण्याच्या प्रतिष्ठित शास्त्रीय गायिका होत्या त्यामुळे घरात तर गाणं होतं पण सुदेशना बॉलीवुड म्युसिकचा नाद होता… आणि किशोरदा म्हणजे त्यांचा देव होता.
गाणं म्हणण्यासोबत सुदेश भोसलेंना चित्रकला पण चांगली जमायची. त्यांनी शाळेत असतानाच आपल्या वडिलांसोबत जाऊन बॉलीवुडच्या अनेक पिक्चर्सची पोस्टर्स स्वतःच्या हाताने बनवली होती. राजेश खन्ना आणि हेमा मालिनी यांच्या ‘प्रेमनगर’ ह्या पिक्चरचं पोस्टरही सुदेश भोसले यांनी त्यांच्या वयाच्या १४ व्या वर्षीच तयार केलं होतं.
तसं बघायला गेलं तर त्यांचं मिमीक्रीच्या क्षेत्रातलं करियर अॅक्सिडेंटलीच सुरू झालेलं. पोराच्या हातात कला आहे म्हटल्यावर त्यांच्या वडिलांनीही पुढची बरीचशी सिनेमाची पोस्टर्स सुदेशनाच बनवायला सांगितली होती.
पण एखादी गोष्ट ठरवल्यावर ती तशीच घडली तर ते नशीब कसलं. सुदेशच्या नाशिबतही काहीतरी भलतंच लिहून ठेवलेलं.
एक दिवशी मित्रांसोबत टवाळक्या करताना मजेमजेतंच अचानक सुदेशजींनी बच्चन साहेबांचा एक डायलोग त्यांचाच आवाजात मारला. त्यावेळी ते इतकं सहजपणे घडलेलं की सुदेश भोसलेंना त्याचा काही सिरियसनेस वाटला नाय पण त्यांचे मित्र भांबावले, त्यांना जरा हे वेगळं वाटलं.
सुदेश भोसले यांना अमिताभ बच्चन यांचा आवाज हुबेहूब जमला होता, त्यामुळे मित्रांनी सुदेशजींना ही गोष्ट सिरियासली घेण्याचा सल्ला दिला. आणि तेव्हापासून त्यांची ही ‘मिमीक्री’ फक्त छंद म्हणून राहिली नाही.
सुदेश भोसले खुप प्रॅक्टिस करायला लागले. बरेचदा इतरांचे आवाज काढता काढता त्यांचा आवाज बसायचा पण, नकला करताना आवाजात परफेक्शन येण्यासाठी ते प्रॅक्टिस करणं थांबवायचे नाहीत. आणि हळू हळू विषय जमत गेला. इतरांच्या आवाजाची सुदेशजींनी केलेली नक्कल इतकी हुबेहूब असायची की लोकांना ओळखूच यायचं नाही की हा दुसऱ्या कोणाचा आवाज आहे किंवा असू शकतो.
असच झालं १९९८ साली आलेल्या तेजाब पिक्चरच्या वेळी.
तेजाब सिनेमात अनिल कपूर, माधुरी दीक्षित, अन्नू कपूर, अनुपम खेर, चंकी पांडे अशा एकसो एक लोकांचे रोल्स होते. आणि दिग्दर्शन केलेलं एन चंद्रा यांनी. तर झालं असं की एन चंद्रांना सेन्सॉर बोर्डाला सिनेमाची कॉपी पाठवायची होती. पण घाईच्या वेळी नेमके अनिल कपूर मुंबईत नव्हते. आणि त्यात सिनेमाचं अख्खं डबिंग बाकी होतं.
तेव्हा चंद्रांनी सिनेमामधले सगळे डायलॉग्स सुदेश भोसले यांच्या आवाजात रेकॉर्ड करून घेतले. आणि तीच कॉपी सेन्सॉर बोर्डाला पाठवण्यात आली. नंतर अनिल कपूर पुन्हा मुंबईत आले तेव्हा त्यांनीही सिनेमाचं अख्खं डबिंग पुन्हा स्वत:च्या आवाजात रेकॉर्डही केलं.
पण विषय असा झाला की नवीन कॉपींमध्ये जुन्या २५ कॉपी मिक्स झाल्या आणि वितरितही झाल्या. कारण कोणता आवाज खुद्द अनिल कपूरचा आणि कुठला सुदेश भोसलेंचा हेच कोणाला लक्षात येईना. शिवाय सिनेमाचा प्रीमियर सुद्धा सुदेश भोसले यांच्या आवाजातच रिलीज झाला.
हे एवढंच नाही तर सुदेश भोसले यांनी एका मुलाखतीत असंही सांगितलंय की, संजीव कुमार ह्यांच्या निधनानंतर सुदेश भोसले यांनी त्यांच्या ५ सिनेमांचं उरलेलं डबिंग पूर्ण केलं होतं.
बरं डायलॉग्सच्या डबिंगपर्यंत सुदेश भोसले थांबले नाहीत तर हिरोंच्या आवाजात गायले सुद्धा जे खुद्द हिरोंना करणं शक्य व्हायचं नाही. आणि अमिताभच्या आवाजात सुदेश भोसलेंनी गायलेलं ‘रंग बरसे’ हे गाणं म्हणजे त्यापैकीच एक उत्तम उदाहरण.
त्यामुळे मिमीक्री आणि गाण्याच्या कलेची उत्तम सांगड सुदेश भोसले यांनी घातली होती असं म्हणायला हरकत नाही.
पण दिसताना सगळं भारी वाटत असलं तरी कलाकाराला संघर्ष चुकलेला नसतोय. सुदेश भोसले यांचा संघर्ष त्यांना न मिळणाऱ्या क्रेडिटभोवती फिरतो. त्यांची इतरांचे आवाज काढण्याची कला इतकी भारी आहे की लोकांना ओरिजिनल आणि ड्यूप्लिकेट ह्यातला फरकच लक्षात येत नाही आणि सुदेशजींना त्यांचं डयू क्रेडिटही कधी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या टॅलेंट मधलं परफेक्शन हीच त्यांची दुखरी नस बनलीये.
हे ही वाच भिडू
- सध्या बॉलीवुडचा फ्लॉप शो सुरुये.. पण पूर्वी फ्लॉप व्हावा म्हणून काढलेला पिक्चर पण सुपरहिट ठरला होता
- दंगलने चीनमध्ये १३०० कोटी कमावले होते, चीनमध्ये भारतातले पिक्चर तुफान चालतात कारण…
- ना मराठी, ना बॉलिवूड बॉक्स ऑफिसचं गणित फक्त तेलगू पिक्चरानांच कळलंय