आमदारही नसणाऱ्या दानिश अन्सारी यांना योगींनी मंत्रिमंडळात घेण्याचं कारण म्हणजे…

मै आदित्यनाथ योगी ईश्वर की शपथ लेता हूं….

असं म्हणत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेले योगी आदित्यनाथ यांचा भव्य दिव्य शपथविधी सोहळा पार पडला आणि चर्चा सुरु झाली ती म्हणजे योगी यांच्या मंत्रमंडळाची…

योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात एकूण ५२ मंत्री आहेत.  या ५२ मंत्र्यांपैकी एकमेव मुस्लिम चेहरा असलेले दानिश आजाद सध्या बातम्यांमध्ये झळकतायत. भाजपच्या तिकिटावर मुस्लिम समाजातून एकही आमदार निवडून आला नाही, पण भाजप पक्षाने युवा नेते दानिश आझाद अन्सारी यांना राज्यमंत्री बनवलं.

पण योगींच्या मंत्रिमंडळात मुस्लिम मंत्री काय पहिल्यांदा झालेत का ? आणि आमदारही नसणाऱ्या दानिश यांना मंत्रिमंडळात घेण्याचं कारण नेमकं काय आहे ?

योगी सरकारच्या पहिल्या टर्ममध्येही मुस्लिम चेहरा असलेले मोहसीन रझा हे अल्पसंख्यांक राज्यमंत्री होते. मात्र त्यांना यावेळी स्थान मिळू शकले नाही. मोहसीन रझा यांच्या जागी भाजपने यंदा दानिश आजाद अन्सारी यांना मंत्री बनवलं.

दानिश यांनी योगी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांना राज्यमंत्री बनवणं हे भाजपच्या राजकारणाचा मास्टर स्ट्रोक म्हणलं जातंय.

पण पक्षाने दानिश आजाद यांनाच का निवडलं ? 

विद्यार्थी दशेपासूनच ऍक्टिव्ह असणारे नेते म्हणून ओळखले जातात. दानिश आजाद यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात हि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत म्हणजेच ABVP मधून झाली. लखनऊ विद्यापीठात असतानाच त्यांनी एबीव्हीपीत प्रवेश केला आणि अनेक पदे भूषवलीत

२०१७ मध्ये जेंव्हा राज्यात भाजप सरकार आलं तेंव्हा त्यांना भाषा समितीचे सदस्य करण्यात आलं होतं. ते भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस देखील आहेत. दानिश कायमच अल्पसंख्याक समाज आणि तरुणांना भाजपसोबत जोडण्यासाठी प्रयत्नशील असतात. आणि हेच कॅलिबर ओळखून पक्षाने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दानिश यांना प्रदेश सरचिटणीस पद दिलं.

आणखी एक म्हणजे पूर्वांचलमधील बलिया येथून आलेले दानिश आजाद अन्सारी हे मुस्लिम ओबीसीमधील अन्सारी समाजातुन येतात. आणि हेच कारण आहे भाजपने त्यांना मंत्रिमंडळातदेखील स्थान दिलं. 

जसं मोदी सरकार स्थापन झालं तसं पक्षाचा फोकस मुस्लिम समाजातील मुस्लिम पसमंदा जातीवर राहिलेला आहे..

मुस्लिम पसमंदा म्हणजे काय ?

मुस्लिम पसमंदा म्हणजे मुस्लिमांमधला असा बहुसंख्य समूह ज्याला आजपर्यंत राजकीय आणि सामाजिक प्रतिनिधित्व मिळालं नाही. हे प्रतिनिधित्व आधीपासूनच मुस्लिम समाजातील उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्या शेख, पठाण, सय्यद, मुस्लिम राजपूत आणि मुस्लिम त्यागी यांच्याकडे आहे.

पण त्या संधीपासून वंचित असलेल्या मुस्लिम समाजातील बहुजनांना मिळाव्या यासाठी मुस्लिम पसमंदा नावाची एक चळवळ सुरु झाली..आणि यातूनच दानिश आझाद येतात.

तर योगींच्या  आधीच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेले मोहसीन रझा हे शिया आणि मुस्लिम समाजातील उच्च जातीतून येतात. तर दानिश हे मुस्लिम ओबीसींच्या अन्सारी समुदायातून येतात.  अशा परिस्थितीत भाजपची नजर ओबीसी मुस्लिम समाजावर आहे. म्हणूनच हे सगळे प्रयत्न चालू आहेत. भाजपने मोहसीन रझा यांच्या जागी दानिश आजाद यांना समोर आणलं आहे. 

अशाप्रकारे अन्सारी समाजातील दानिश आजाद यांना मंत्री बनवून योगी सरकार मुस्लिम बहुजनांमध्ये सॉफ्ट कॉर्नर निर्माण करण्याचं प्रयत्न करत आहे.

असंही पाच वर्षे मंत्री असतांना मोहसीन रझा यांना कोणताही राजकीय प्रभाव पाडता आला नाही. म्हणूनच त्यांची योगी सरकारच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली असं सांगण्यात येतंय. 

पण राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, 

लखनौ हा मतदार संघ भाजपसाठी महत्वाचा राहिलेला आहे. लखनौमधील शिया समुदाय अटलबिहारी वाजपेयी ते लालजी टंडन आणि राजनाथ सिंह इथपर्यंत भाजपच्या बाजूने मतदान करत आला आहे.  पण यावेळेस मात्र भाजपला निराशा आली. 

त्याला कारणीभूत मोहसीन रझा ठरलेत. मोहसीन रझा हे लखनऊ मधीलच आहेत. आणि येथील शिया समुदायाला भाजपसोबत आणण्यात ते फेल झालेत. त्याचा परिणाम म्हणजे या निवडणुकीत ८५% मुस्लीम मतं सपाला गेलीत आणि फक्त ८% मतं भाजपाला मिळालीत.  त्यामुळे लखनौची एक जागा होती तीही भाजपला गमवावी लागली. 

दुसरीकडे पसमंदा मुस्लिमांची मतं भाजपाला मिळावीत यासाठी पंतप्रधान मोदींपासून ते केशव प्रसाद मौर्य यांच्यापर्यंत सगळे प्रयत्नशील असायचे. आता त्यासाठीच दानिश यांना संधी देण्यात आल्याचं दिसतंय.

ओबीसी मुस्लिमांना आपल्याकडे वळवण्यासाठी दानिश आजाद यांना मंत्री बनवून भाजपने मोठीच राजकीय खेळी केलीये अशी प्रतिक्रिया सगळीकडेच उमटत आहे.  

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.