घोटाळ्यात अडकलेली PMC बँक कधीकाळी मुंबईच्या टॅक्सीवाल्यांसाठी सुरु झाली होती

पंजाब महाराष्ट्र को – ऑपरेटीव्ह बँक. अर्थात PMC बँक. या बँकेच नाव जरी घोटाळ्यामुळे चर्चेत असलं तरी बँकेची सुरुवात आणि स्थापना एका चांगल्या कारणासाठी झाली होती. फाळणीग्रस्त शीख बांधवांच्या मदतीसाठी. १३ फेब्रुवारी १९८४ साली एका २४० स्केवर फुटाच्या खोलीत स्थापन झालेली ही बँक आधार होती मुंबईतल्या शीख टॅक्सी ड्रायव्हरसाठी.

भारताच्या फाळणी नंतर फाळणीग्रस्त भागातले बरेच शीख निर्वासित कामधंदयानिमित्ताने मुंबई आणि देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले होते. हे शीख निर्वासित मुंबईत सुद्धा आले. बरेच जण मुंबईत इतरस्त्र विखुरले, पण बहुतकरून मुंबईच्या कोळीवाडा परिसरात राहायला लागले. आज या भागाचं नाव गुरू तेग बहादूर नगर असं आहे. मिळेल तो काम धंदा करून आपली गुजराण करणारे शीख टॅक्स्या सुरू झाल्यावर मात्र त्याच व्यवसायात ओढले गेले.

म्हणजे सत्तर ऐंशीच्या दशकात मुंबईच्या रस्त्यांवर टॅक्स्या धावू लागल्या होत्या. आणि या टॅक्सीचं सारथ्य करायला बहुतांश शीख ड्रायव्हरच असायचे.

आता तेव्हा बऱ्याच शिखांना या टॅक्सी विकत घेण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांमधून कर्ज मिळायची नाहीत. फक्त टॅक्सीचं नाही तर अन्य गोष्टींसाठी ही शीख बांधवांना कर्ज मिळण्याच्या अडचणी असायच्या. ही अडचण जाणली होती, गुरुचरण सिंग कोचर यांनी.

आणि या कर्जाच्या समस्येची सोडवणूक करण्याच्या नादात स्थापन झाली PMC बँक…

गुरुचरण सिंग कोचर सुद्धा मुंबईत राहणारे रेफ्युजी. यांचं गाव आताच्या पाकिस्तानच्या रावळपिंडीतलं. फाळणी झाली तेव्हा त्यांचं कुटुंब भारतात आलं. आणि नंतर सरळ मुंबईत. गुरुचरण हे इंडियन एअरफोर्स मध्ये होते. तिथून रिटायर्ड झाल्यावर त्यांनी ठरवलं की आता एखादी टॅक्सी घेऊन आणि मुंबईत काम करू. जेव्हा का त्यांनी टॅक्सीसाठी हालचाल केली तेव्हा कर्ज मिळवण्यासाठीच्या अडचणी त्यांच्या समोर पण उभ्या राहिल्या. आता ही फक्त त्यांचीच नाही तर बऱ्याच लोकांची अडचण होती.

यावर उपाय काय ? म्हणून गुरुचरण सिंग आपल्या मूळगावी गेले. तिथं पंजा साहिब गुरुद्वारात प्रार्थना करत असताना त्यांना बँकेची कल्पना सुचली.

आता बँक उभी करणं म्हणजे काही साधी सुधी गोष्ट नव्हती. यासाठी लागणार होतं भांडवल. ते कसं उभं करायचं हा प्रश्न गुरुचरण यांच्यासमोर आवसून उभा होता. १९८३ च्या दरम्यान मनमोहन सिंग रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. त्यावेळी बँकिंग क्षेत्रातला सहकार वाढावा अशाच पद्धतची आरबीआयची धोरण होती. त्यामुळे बँकेच्या स्थापनेसाठी जाचक अटी नव्हत्या ही एक जमेची बाजू होती.

बँक काढायची म्हणून गुरुचरण यांनी फंडिंग जमवायला सुरुवात केली. आणि ती ही टॅक्सीवाल्यांकडून!

या फंडिंगच्या बदल्यात टॅक्सी ड्रायव्हर्सना शेअर्स मिळत होते. त्या काळात PMC बँकेचा एक शेअर २५ रुपयांना मिळत होता. आणि बँकेचं सभासद व्हायचं असेल तर त्यासाठी ५ रुपये एन्ट्री फी होती. आता तुम्हाला २५ रुपये ही किरकोळ रक्कम वाटेल पण तेव्हा २५ रुपये पण जमा करणं या टॅक्सीवाल्यांसाठी अवघड काम होत.

आता या शेअर सेलिंग मधून पण बँक सुरू होण्याइतपत भाग भांडवल जमा होईना हे गुरुचरण यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी शीख समाजतल्या मोठं मोठ्या भांडवलदारांना भेटायला सुरुवात केली जे जास्तीचे शेअर्स घेऊ शकतील. बाकी काही नाही पण सामान्य लोकांसाठी झटणारा एक शीख बघून बाकीच्यांना पण उमेद आली आणि बघता बघता बँकेसाठी लागणार अडीच लाखांचं भाग भांडवल सुद्धा जमलं. आणि बँक स्थापन झाली.

बँक आली म्हंटल्यावर आता बँकेचे सभासद आले. सभासद मंडळ आलं. बँक कोणत्याही राजकीय हेतुपासून लांब राहावी यासाठी बँकेच्या सभासद मंडळावर सगळेच्या सगळे रेफ्युजी होते.

फाळणीनंतर भारतात आलेले टॅक्सी चालक शीख.

बँक चांगली सुरू होती. पण १९९३- ९४ ला शंभर कोटींच्या घोटाळ्यात अडकली. गुरुचरण यांनी तेव्हा रिजर्व्ह बँकेला पत्र लिहून या घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. १९९७ मध्ये गुरुचरण सिंग कोचर निधन पावले आणि त्यानंतर गुरुचरण यांचा मुलगा १९९९ ते २००५ या काळात बँकेच्या संचालक पदावर होता. पण नंतर मात्र या वाढत्या घोटाळ्यांनी त्रस्त होऊन त्यांनी ही राजीनामा दिला. त्यांच म्हणणं होतं, रिजर्व्ह बँकेला आम्ही बऱ्याचदा पत्र पाठवून या घोटाळ्यासंबंधी सांगत राहिलो पण रिजर्व्ह बँकेने ऍक्शन घेतलीच नाही. आणि शेवटी बँक बुडालीच…!

हे हि वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.