सिरीअलमध्ये भ्रष्टाचाऱ्यांची एवढी खिल्ली उडवली की कॉमेडियन युक्रेनचा प्रेसिडेंट बनला
स्टोरी सुरवात करायच्या आधी सुरवातीला तुम्हाला थोडं मागे घेऊन जातो. सेट मॅक्सवर सूर्यवंशम सारखाच पडीक पडलेला पिक्चर म्हणजे नायक. आता जरी पडीक पडलेला म्हणत असलो तरी लहानपणी मात्र अनिल कपूर जेव्हा मुलाखतीमध्ये मुख्यामंत्र्याची भूमिका करणाऱ्या अमरीश पुरीची पिसं काढत होता तेव्हा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी टाळ्या पिटल्या होत्या. पुढे या नायकचा मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास बघून आपण किती इन्स्पायर झालो होतो हे तुम्हाला वेगळं सांगायला नको.
आता एवढा नॉस्टेल्जिया क्रिएट केला कारण जवळपास अशीच स्टोरी आहे युक्रेनच्या प्रेसिडेंट वोलोदिमीर झेलेन्स्कीची.
क्रिव्ही रिह इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्समधून कायद्याची पदवी घेतल्यानंतर झेलेन्स्कीने मनोरंजन उद्योगात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.पिक्चरमध्ये त्याने एक विनोदी अभिनेता म्हणून काम करायला गेला.
त्याच्या कारकिर्दीतला सगळ्यात गाजलेला रोल म्हणजे २०१५ मध्ये त्याने सर्व्हंट ऑफ द पीपलमध्ये युक्रेनचे अध्यक्ष म्हणून केलेली मुख्य भूमिका.
या कार्यक्रमाच्या प्लॉटनुसार एक युक्रेनियन शाळेतील शिक्षक जो सरकारवर टीका केल्याबद्दल व्हायरल होतो आणि मग लोकग्रहास्तव देशाचा अध्यक्षपदी निवडला जातो. असा आपल्या नायक पिक्चरसारखीच स्टोरी.
पण या वोलोदिमीर झेलेन्स्कीनं आपल्या खऱ्या आयुष्यातपण ही कार्यक्रमाची स्क्रिप्ट रिपीट करून दाखवली आहे.
राजकारणाचा कोणताही अनुभव नसणाऱ्या झेलेन्स्कीनं कोणत्याही पक्षाकडून नं उभा राहता ,तज्ञ सल्लागारांचं कोणतंच मार्गदर्शन न घेता निवडणूक लढवली. ना त्यानं वैयक्तिक प्रचार कार्यक्रमांना उपस्थित राहिला लावली आणि रॅली काढली नुसता सोशल मीडियाचा योग्य वापर करत त्यानं युक्रेनचा सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष बनून दाखवलं. भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीत बरबटलेल्या युक्रेनमधल्या लोकांनी वर्षानुवर्षे राजकारण करणाऱ्या राजकारण्यांना बाजूला सारत या नवख्या उमेदवाराला संधी दिली.
सध्या पुतीन यांच्या धमक्यांना भीक ना घालणाऱ्या झेलेन्स्कीनं २०१९ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पण शिंगावर घेतलं होतं.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी जो बिडेन आणि त्यांचा मुलगा हंटर यांच्याकडून केलेल्या कथित चुकीच्या कृत्यांची चौकशी करण्यासाठी माझ्यावर दबाव आणल्याची झेलेन्स्कीने सरळ मीडियासमोर येऊन सांगितलं होतं. त्या घोटाळ्यामुळे अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजने ट्रम्प याच्यावर पहिला महाभियोग चालवला होता.
२०१९ मध्ये सत्ता हाती घेतल्यापासून या नवख्या प्रेसिडेंटला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.
एकीकडे, युक्रेन अमेरिका, नाटो आणि युरोपियन युनियनशी संबंध विकसित करत आहे. दुसरीकडे, रशिया आणि पुतिन हे पूर्वीचे सोव्हिएत राज्य असेलल्या युक्रेननं हे असं करण्याचं ठरवल्याने चिडून आहेत.
या सर्व काळात, झेलेन्स्कीने आपल्या देशवासीयांना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. जाणकारांच्या म्हणन्यानुसरा एवढ्या आव्हानाच्या परिस्तितिथीही त्यांनी संयमानं हाताळली आहे. रशियाविरोधात देशात एकजूट दाखवण्यासाठी, झेलेन्स्कीने नुकताच ‘राष्ट्रीय एकतेचा दिवस’ साजरा करण्याची घोषणा केली. ज्यात राष्ट्राध्यक्षांच्या आव्हानाला प्रतिसाद देत लाखो युक्रेनवसी त्यांचा राष्ट्रीय ध्वज घेऊन राष्ट्रगीताचे गायन करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.
त्यामुळं आता युक्रेनच्या हा कधीकाळचा कॉमेडियन कधीकाळी हेर असलेल्या पुतीन यांना कसं सामोरं जातो हे येणाऱ्या दिवसांत कळेलच.
हे ही वाच भिडू :
- तिसऱ्या महायुद्धाची शंका देणाऱ्या रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सामग्रीत नेमकं बाप कोण?
- रशिया-युक्रेन युद्धामुळं डिझेल-पेट्रोलच्यापलीकडे या गोष्टी आपल्या घरातलं बजेट बिघडवू शकतात
- रशियाने युक्रेनच्या दोन प्रांतांना देश म्हणून मान्यता दिलेय पण नवीन देश जन्माला येतात तरी कसे?