सप्तशृंगी देवीच्या मूर्तीवरचं ११०० किलो शेंदूर काढण्यात आलंय पण शास्त्र काय सांगतं ?

काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये वणीच्या सप्तशृंगी देवीच्या मूर्तीवरील शेंदुराचा लेप काढण्यात आला. शेंदूर काढून मूर्तीच्या संवर्धनाची ही प्रक्रिया २१ जुलै पासून सुरु झाली होती. ५० दिवस चाललेली ही प्रक्रिया ९ सप्टेंबर रोजी संपली. त्यामुळे बंद असलेले मंदिराचे दरवाजे पुन्हा दर्शनासाठी उघडण्यात आलेले आहेत.

देवीच्या मूर्तीवरून शेंदूर काढल्यामुळे एक गोष्ट चर्चेत आलीय ती म्हणजे, ही शेंदूर काढण्याची प्रक्रिया धार्मिक शास्त्रानुसार करण्यात आलीय की पुरातत्व विभागाने केलीय?

तर ही प्रक्रिया मंदिराचे विश्वस्त मंडळ आणि पुरातत्व विभाग या दोन्ही मंडळांच्या सहकार्यातून करण्यात आलीय. ही पूर्ण प्रक्रिया नाशिकच्या अजिंक्यतारा कंसल्टंसीने केलीय आणि या प्रक्रियेत मूर्तीवरून तब्बल १,१०० किलो शेंदूर काढण्यात आल्यामुळं देवीची मूळ स्वरूपात असलेल्या कोरीव मूर्तीचं दर्शन होतंय. 

मात्र दोन्ही मंडळांनी ही प्रक्रिया संयुक्तपणे पूर्ण केली असली तरी दोन्ही बाजूंचे वेगवेगळे नियम आहेत. देवस्थान मंडळ आणि पुजारी शेंदूर काढण्याच्या प्रक्रियेला धार्मिक विधी मानतात तर पुरातत्व विभाग मूर्तीच्या संवर्धनासाठी अशी प्रक्रिया करत असतो. त्यामुळे दोन्ही बाजूच्या धारणा काय आहेत हे जाणून घेणे महत्वाचे ठरते. 

देवी-देवतांच्या मूर्तीला शेंदूर लावणे आणि ते काढणे याबाबत काही धार्मिक नियम सांगण्यात आलेले आहेत. 

देवी देवतांची मूर्ती स्थापन करण्याचे चल आणि अचल असे दोन प्रकार असतात. ये दोन्ही स्थापनांमध्ये देवतांना शेंदूर अर्पण केला जातो. धार्मिक शास्त्रांनुसार देवतांना शेंदूर लावण्याचे वेगवेगळ्या पद्धती सांगण्यात आल्या आहेत. त्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार वैदिक मंत्रोच्चार, सामगायन, घन या सगळ्यांच्या उच्चारात देवतांच्या मूर्तींवर शेंदूर लावला जातो.

नाव न सांगण्याच्या अटीवर धार्मिक विषयांचे जाणकार बोल भिडूशी बोलतांना सांगतात की, “शेंदूर लावल्यामुळे देवतांच्या मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण होते आणि त्या मूर्तीत देवतेचा वास सुरु होतो. त्यामुळे देवता जागृत स्वरूपात येते.”

ही शेंदूर लावण्याची पद्धत फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. त्यामुळे मूर्तीवर शेंदराचे थर साचत जातात. या थरांमुळे मूर्तीचे मूळ स्वरूप बटबटीत दिसायला लागते. तेव्हा देवतांच्या मूर्तीवरून शेंदूर काढण्याची विधी केली जाते. ही विधी करतांना देवाबद्दल श्रद्धा मनात बाळगून धार्मिक मंत्रांच्या उच्चारात शेंदूर काढला जातो. 

शेंदूर काढतांना देवतांच्या मूर्तीला इजा पोहचून देवाचा कोप होऊ नये. तसेच देवाप्रती असलेल्या श्रद्धेमुळे अशी विधी करतांना आधी देवतेचा कौल घेतला जातो. तसेच देवतांची क्षमा मागितली जाते आणि त्यानंतर ही विधी पार पडतो.

तर पुरातत्व विभाग मात्र शास्त्रीय पद्धतीने मूर्तीवरील शेंदूर काढण्याची प्रक्रिया करत असतो.

दगडांच्या कोरीव आणि सुबक मूर्ती कोरण्याचे तंत्र मानवाला हजारो वर्षांपासून अवगत आहे. देवी देवतांच्या या मूर्ती प्रामुख्याने दगडात कोरलेल्या आहेत. या दगडांचे वेगवेगळे प्रकार आणि त्याच्या  आजूबाजूचं पर्यावरण यावरून मूर्तीची झीज आणि टिकवण्याची पद्धत आधारलेली असते.

देवतांच्या मुर्त्याची निर्मिती ही लोकांनी आपल्या श्रद्धेतून केलेली आहे. त्याच श्रद्धेपोटी लोकांनी विविध धार्मिक गोष्टी मूर्तीला अर्पण केलेल्या आहेत. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे शेंदूर लावणे.  

काही वेळेस शेंदराच्या थरामुळे मूर्ती संरक्षित असते तर काही वेळेस शेंदरामुळे मूर्तीची हाणी होत असते. तेव्हा पुरातत्व विभागाकडून मूर्तीसाठी वापरलेला दगड, त्याच्या सभोवतालचे वातावरण, मंदिरातील परिस्थिती या सगळ्यांचा अभ्यास करून मूर्तीला कशा पद्धतीने संरक्षित करायला हवं हे ठरवत असते.

मूर्तीला मूळ स्वरूपात जतन करण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी बोल भिडूने इतिहासाच्या प्राध्यापक डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांच्याशी संपर्क साधला. 

पुरातत्व शास्त्राच्या पद्धतीबद्दल सांगतांना डॉ. कुंभोजकर सांगतात की, “मंदिर आणि देवता हे लोकांच्या श्रद्धेचा विषय असतात. त्यामुळे पुरातत्व विभागाकडून इतर गोष्टींप्रमाणे देवतांच्या मूर्तींवर प्रक्रिया करण्यात येत नाही. लोकांच्या भावनांना धक्का न पोहचवता मूर्तीला जतन करण्याचं काम पूर्ण केलं जातं.”

याबद्दल सविस्तर माहिती देतांना डॉ. कुंभोजकर सांगतात की, “देवतांच्या मूर्तींवर वाहण्यात येणाऱ्या गोष्टींमागे लोकांची पारंपरिक श्रद्धा असते. शेंदूर ही त्यातलीच एक गोष्ट आहे. परंतु जर या शेंदराच्या थरामुळे मूर्तीचे मूळ सौंदर्य नष्ट होत असेल किंवा मूर्तीला त्यापासून धोका असेल तर पुरातत्व विभागाकडून मूर्तीवरचा शेंदूर शास्त्रीय पद्धतीने काढला जातो. या प्रक्रियेचा उद्देश मूर्तीचे मूळ स्वरूप परत उजेडात तिचे जतन करणे हाच असतो.” असे डॉ. कुंभोजकर यांनी सांगितलं.      

सप्तशृंगी देवीच्या मूर्तीवरून शेंदूर काढतांना या दोन्ही पद्धतींचे पालन करण्यात आलंय.

पुरातत्व विभागाची मान्यता असलेल्या अजिंक्यतारा कन्सलटन्सीने कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता धातूच्या अवजारांनी मूर्तीवरील शेंदूर काढलयं. तसेच या मूर्तीच्या संवर्धनासाठी आजूबाजूला असलेले ग्रॅनाइटचे बांधकाम काढून टाकण्यात आले असून त्याजागी इटालियन पद्धतीचे मार्बल वापरण्यात येणार आहे.

तर यादरम्यान मंदिर समितीच्या वतीने धार्मिक संस्कार सुद्धा पार पाडण्यात आले. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देवीच्या अलंकारांची विधिवत पूजा करून त्यांची कार्यालयातून मिरवणूक काढण्यात आली आणि देवीला अलंकार अर्पण करून पूजा करण्यात आली. या दोन्ही मंडळांच्या समन्वयाने शांततेत ही प्रक्रिया पार पडली. 

हे ही वाच भिडू

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.