अमरनाथ मधल्या शिवलिंगाचा शोध एका मुस्लिम मेंढपाळाला लागला होता

कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष बंद असलेली अमरनाथ यात्रा यावर्षी ३० जूनपासून सुरू झाली आहे. मोठ्या संख्येने भाविक यात्रेसाठी गेले आहेत. जम्मू काश्मीर मधलं अमरनाथ हे हिंदू धर्मातलं एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र मानलं जातं. इथे दरवर्षी बर्फापासून नैसर्गिकरित्या शिवलिंग तयार होत असतं. सुमारे महिनाभर चालणाऱ्या अमरनाथ यात्रेदरम्यान लाखो भाविक या शिवलिंगाच्या दर्शनासाठी जात असतात.

हे ठिकाण काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून १३५ किमी उत्तर-पूर्वेस आणि समुद्रसपाटीपासून जवळ जवळ १३,६०० फूट उंचीवर आहे. अमरनाथ यात्रेला जाणारे भाविक अत्यंत खडतर, अवघड असा पायी प्रवास करून तिथे पोहोचतात. 

अमरनाथ येथे असलेलं शिवलिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे त्यामुळं देखील भाविकांच्या मनात त्याबद्दल एक महत्वाचं स्थान आहे. 

अमरनाथ यात्रेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथं असलेल्या गुहेत नैसर्गिक शिवलिंगाची निर्मिती होत असते. गुहेच्या वरून बर्फाच्या पाण्याचे थेंब टपकतात. त्यातून सुमारे १० फूट उंचीचे पवित्र शिवलिंग तयार होतं. बर्फाच्या शिवलिंगाच्या डाव्या बाजूला दोन लहान बर्फाची शिवलिंगे तयार होतात, ती  पार्वती आणि गणेशाचे प्रतीक असल्याचं मानलं जातं. हेच पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक इथे दरवर्षी येतात.

आषाढ महिन्याच्या पौर्णिमेपासून ते रक्षाबंधनपर्यंत संपूर्ण श्रावण महिन्यात शिवलिंगाचे दर्शन होते.

चंद्र जसजसा कमी होत जातो तसतसे बर्फापासून बनलेल्या शिवलिंगाचा आकार बदलतो आणि अमावास्येपर्यंत हे शिवलिंग हळूहळू लहान होत जातं. 

पण या शिवलिंगाचा शोध कसा लागला यामागे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे..

अमरनाथ इथल्या शिवलिंगाच्या शोधामागे एक आख्यायिका सांगितली जाते,

ती अशी की..

१८५० मध्ये ‘बुटा मलिक’ नावाचा एक मुस्लिम मेंढपाळ आपल्या मेंढया चारण्यासाठी माळरानावर गेला होता. बुटा मलिकला तिथे एक साधू भेटतात, पावसाळ्याचे दिवस असल्याने तिथे खूप थंडी असते.

बुटा पावसाने गारठून गेलेला असतो तेवढ्यात त्या साधूंनी बुटा मलिकला आग पेटवण्यासाठी कोळशाने भरलेली एक पिशवी देतात. बुटा मलिक ती कोळशाची पिशवी घेऊन त्याच्या घरी जातो आणि ती पिशवी उघडून बघतो तर पिशवीत कोळशाच्या जागी त्याला ‘सोनं’ दिसतं.

ते चकाकतं सोनं पाहून त्याला खूप आनंद होतो आणि तो त्या साधूला धन्यवाद देण्यासाठी परत माघारी जातो, तर तिथे त्याला तो साधू भेटत नाही. पण त्याला एक गुहा दिसते आणि त्या गुहेत एक बर्फाचं शिवलिंग तयार झालेलं त्याला पाहायला मिळतं. आश्चर्यचकित झालेल्या बुटा मलिकला काय करावं कळेना शेवटी तो ही माहिती त्याच्या गावकर्‍यांना सांगतो. वाऱ्यासारखी ही गोष्ट काश्मीरचे राजा गुलाब सिंह यांच्यापर्यंत देखील पोहचते.

असं सांगण्यात येतं की,

 बुटा मलिकमुळे सर्वांना या शिवलिंगाबद्दलची माहिती मिळाली, भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आणि इथे गर्दी वाढतच गेली. याच घटनेच्या ३ वर्षा नंतर अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत काही अपवाद वगळता ही यात्रा चालूच आहे. 

या गुहेचं असंही आणखी एक महत्व सांगितलं जातं की, भगवान शंकराने आपली पत्नी पार्वतीला अमरत्वाचा मंत्र इथेच सांगितला होता,म्हणून ह्या जागेला अमरनाथ असं नाव पडलं आणि त्यामुळे सुद्धा ही जागा पवित्र मानली जाते.

मात्र इथे आलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न नेहेमीच चर्चित राहिलेला आहे.

इथली अशी मान्यता आहे की, अमरनाथ गुहेतील बर्फाच्या एका शिवलिंगाच्या दर्शनाने माणसाला २३ पवित्र तीर्थस्थळांच्या दर्शनाइतकं पुण्य प्राप्त होतं. त्यामुळं दरवर्षी ५ ते ६ लाखांपेक्षा जास्त भाविक या ठिकाणी भेट देत असतात. मात्र याचदरम्यान काही दहशतवादी संघटनांकडून अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याच्या धमक्याही येत असतात. त्यामुळे इथे प्रशासनाकडून नेहमी यात्रेच्या सुरक्षेसंबंधीची काळजी घेतली जाते.

या धमक्या येण्यामागे येथील भोगौलिक स्थान कारणीभूत असल्याचं म्हणलं जातं. म्हणजेच ही अमरनाथ यात्रा काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या नजीक भरत असते. काश्मीर-पाकिस्तान संघर्षाची किनार म्हणून या यात्रेवर हल्ल्याच्या कायमच धमक्या येतात. 

फक्त धमक्याच नाही तर, अमरनाथ यात्रेवर अनेकदा दहशतवादी हल्ले देखील झालेत. ते कधी कधी झाले ते थोडक्यात बघूया,

  • १९९३ मध्ये पाकिस्तान मधल्या हरकत-उल-अन्सारने अमरनाथ यात्रेवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. बाबरी मशीद पाडल्याच्या निषेधार्थ आणि श्रीनगरमधील हजरतबल दर्गा येथील बंकर हटवण्याच्या मागणीसाठी हे करण्यात आल्याचं सांगितलं जातं.
  • २००० साली अमरनाथच्या पहलगाम बेस कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला होता, जो या यात्रेतला आजवरचा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो. त्यावेळी यात्रेकरूंवर थेट हल्ला झाला  होता आणि १७ यात्रेकरू यात ठार झाले होते.  
  • २००२ मध्ये दोन दहशतवादी हल्ल्यांमध्ये ११ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता.
  • २०१७ च्या जुलैमध्ये सुद्धा भाविकांनी भरलेल्या एका बसवर दहशतवाद्यांच्या गटाने हल्ला केला होता. त्यात सुद्धा बरेच भाविक मारले गेले होते .

अशा घटना घडू नयेत म्हणून गृह मंत्रालयाकडून यात्रेसाठी सुविधा आणि पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. यंदाच्या यात्रेच्या पार्शभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या बैठकीत श्रीनगर साठी हवाई सेवा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यात्रेच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ, आर्मी आणि एनएसजीचे कमांडो तैनात असतात, या ठिकाणी ड्रोनद्वारेही नजर ठेवली जाते. या यात्रेच्या सुरक्षेसाठी दरवर्षी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येतो. हवामानाच्या माहितीसाठी डॉप्लर रडारवरून घेतलेली माहिती दर ३ तासांनी नियमितपणे सर्व भाविकांना दिली जाते.

यावर्षी सुरक्षेच्या दृष्टीने या उपाययोजना करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलय..

  • सुरक्षेसाठी ड्रोनविरोधी यंत्रणा बसवली जाईल
  • यात्रेत बुलेट प्रूफ आणि एमपीव्ही वाहनांचा समावेश असेल
  • यात्रेकरूंचा ५ लाख रुपयांचा विमा काढला जाईल
  • सीआरपीएफच्या बुलेट प्रूफ अँटीमाइन वाहनांची संख्या वाढवण्यात येईल
  • J&K पोलिसांव्यतिरिक्त, दोन्ही मार्गांवर सुमारे १२,००० निमलष्करी दलाचे जवान तैनात केले जाऊ शकतात.
  • भाविकांना विशेष बार कोड दिला जाणार आहे. ज्याद्वारे त्यांच्या लोकेशन ची माहिती मिळत राहील.

सुरक्षे संबंधी अशा वेगवेगळ्या घोषणा गृहमंत्रालया कडून करण्यात आल्या होत्या. यावर्षी भाविकांसाठी या सोई सुविधा देण्याची घोषणा करण्यात आली होती..

  • ६००० फूट उंचीवर १०० खाटांचे रुग्णालय.
  • भाविकांना वाटेत राहण्यासाठी टेंट सिटीची व्यवस्था.
  • यात्रा मार्गावर वायफाय हॉटस्पॉट.
  • वीज, पाणी, दळणवळण आणि आरोग्य यासह सर्व आवश्यक सुविधांची व्यवस्था.
  • भूस्खलनासारख्या धोक्यांचा सामना करण्यासाठी विशेष व्यवस्था.

अशा वेगवेगळ्या सुविधा पुरवणार असल्याचं जाहीर केलय.

यावर्षी यात्रेवर ढगफुटी या नैसर्गिक आपत्तीचं संकट ओढवलय..

यावर्षीच्या अमरनाथ यात्रेतली ही आताची ताजी घटना आहे. शुक्रवार, ८ जुलै रोजी अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे मोठी दुर्घटना घडली, यामध्ये आत्तापर्यंत १६ भाविकांचा मृत्यू झालाय आणि बरेचजण जखमी झालेत.  या दुर्घटनेमुळे ही यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आलीये.

अशीच ढगफुटी याआधी १९६९ सालच्या अमरनाथ यात्रेच्या वेळी सुद्धा झाली होती. तेव्हा जवळपास १०० भाविकांचा मृत्यू झाला होता. २०१७ साली अमरनाथ यात्रेला चाललेल्या भाविकांची बस दरीत कोसळून १९ भाविकांचा मृत्यू झाला होता.  असे वेगवेगळे प्रसंग या यात्रेच्या वेळी उद्भवत असतात. त्यामुळे ही यात्रा नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी असते.

हे ही वाच भिडू : 

Leave A Reply

Your email address will not be published.