‘मुगल-ए-आजम’ चं बंद पडलेलं शूटिंग ईदच्या तोहफ्यामुळे पुन्हा सुरु झालं

शापूरजी पालनजी स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर मुंबईचे मोठे बांधकाम व्यवसायिक होते. के असिफ यांच्या मुगल-ए- आजमचे ते फायनान्सर होते. के.असिफ हे अतिशय मनस्वी, हट्टी, भव्य स्वप्नांचा ध्यास असलेला आणि सिनेमासाठी कंप्लीट वेडा झालेला कलावंत.

‘मुगल-ए-आझम’ सारखा महान सिनेमा त्यांनी बनवला. हे भव्य दिव्य स्वप्न त्यांनी वयाच्या पंचविशीतच पाहिले होते. शापूरजी पालनजी यांना त्यांनी जेव्हा कथानक ऐकवले. या सिनेमाला फायनान्स करण्याची त्यांनी तयारी दाखवली. मग सुरु झाली या भव्य सिनेमाची निर्मिती.

के.असिफच्या अतिशय चोखंदळ आणि परफेक्शनिस्ट स्वभावामुळे सिनेमाचे बजेट दिवसेंदिवस वाढत होते.

कलाकार बदलले जात होते. शॉट पुन्हा पुन्हा री शूट होत होते. प्रत्येक गोष्ट मनासारखी आणि परफेक्ट व्हावी यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च होत होता. नुसते बजेटच वाढत नव्हते तर सिनेमा बनण्याचा  कालावधी देखील वाढत होता. तब्बल आठ ते दहा वर्ष हा सिनेमा निर्मिती अवस्थेत होता. यातील प्रत्येक प्रसंग अप्रतिम कसा होईल यासाठी ते झटत होते. 

मुंबईत त्यांनी या सिनेमासाठी भव्यदिव्य स्टेट्स बनवले होते. यातील युध्दाच्या चित्रीकरणासाठी तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांची खास परवानगी घेवून खरे खुरे सैनिक जयपूरच्या रणांगणावर वापरले होते. 

या सिनेमाचे चित्रीकरण अंधेरीच्या मोहन स्टुडीओत झाले होते. (त्या वेळी चित्रीकरण पहायला येणार्‍या गर्दीत एक चेहरा असा होता जो पुढे पाकीस्तानचा राष्ट्राध्यक्ष बनला ते होते झुल्फिकार अली भुट्टो!)

शापूरजी पालनजी पाण्यासारखा पैसा ओतत होते.

पण त्याला देखील एक मर्यादा होती. एक क्षण असा आला की, त्यांनी के असिफ यांना सांगितले “ बस्स…आता यापुढे एक पैसा देखील मी तुम्हाला देऊ शकत नाही. प्रचंड पैसा खर्च झाला आहे आणि अजुन सिनेमा पूर्ण झालेला नाही. याला जबाबदार कोण?” मग काय सिनेमा निर्मिती ठप्प झाली. 

के आसिफ प्रचंड प्रतिभावान होते पण कफल्लक होते. ते एक भणंग व्यक्तिमत्व होते एक पैसा देखील त्यांच्या पदरी नव्हता सर्व व्यवहार हा उधारीवर चालला होता इतके की सिगारेट देखील ते उधारीवर आणून पीत होते! त्यांच्या डोळ्यात मात्र सिनेमाचे भव्य दिव्य स्वप्न होते.

शापूरजी यांच्या कडून घेतलेली पै न पै ते सिनेमासाठीच वापरत होते.

स्वत: साठी त्यातली अधेली सुध्दा वापरत नव्हते. पालनजी यांच्याकडून पैशाचा ओघ थांबल्यावर असिफ यांनी दुसरी कडून पैशाची काही सोय होते आहे का याच्या कामाला लागले पण सगळीकडून नकार घंटा येत होती. स्वतःकडचे सर्व पैसे संपले होते! 

पण याच दरम्यान रमजान ईदचा सण आला. ईद साजरी करायला असिफ यांच्याकडे अक्षरशः एक पैसा देखील नव्हता. सिनेमाचे फायनान्सर शापूरजी पालनजी शेठ यांना ईदच्या दिवशी असिफ यांची आठवण आली. त्यांनी विचार केला हे असिफचे व आपले जे मतभेद असतील ते असू दे पण आज ईद आहे.

असिफ यांच्यासोबत आपले मोठे असोसिएशन आहे. मिठाईचा एक किलोचा पुडा घेऊन ते असिफ कडे निघाले.  ईदी म्हणून एका पाकिटात त्यांनी पाच हजार एक रुपये घेतले. त्यांना ईदची मिठाई आणि  शुभेच्छा देणे गरजेचे आहे. शेठजी  त्यांच्या घरी पोहोचले. 

के असिफ लुंगी आणि बनियन घालून पत्त्याचा पेशंसचा डाव मांडून बसले होते. 

शेठजीला  पाहून त्यांना आनंद झाला. शापूरजी यांनी त्यांना ‘ईद मुबारक’ म्हणत मिठाईचा डबा दिला. दी म्हणून आणलेले पाच हजार एक रुपयाचे पाकीट त्यांच्या हातात दिले. शेटजी कडून मिळालेली हि भेट पाहून असिफ सद्गतीत झाले. 

ते शेठजी ना म्हणाले “ शेठजी,आपने हमे ईद का तोहफा दिया है इसलिये मे आपका शुक्रगुजार हूं. ये मिठाई मे रख लेता हूं, और आपने जो ईदी मुझे दि है उसमें से एक रुपया मे रख लेता हूं. और बचे हुए पाच हजार रुपये से अपने मुगल- ए- आजम  का एक रील का शूटिंग तो हो सकता है!”  हे उत्तर ऐकून पालनजी यांच्या डोळ्यात पाणी आले. 

असिफ यांचे डेडिकेशन पाहून पालनजी म्हणाले,

 “डीकरा, तुझे जितका पैसा खर्च करणार आहेत कर मै पैसा देने के लिये तैय्यार हूं. और बना तेरे ख्वाबो मे बसा  हुआ ‘मुगल-ए-आझम’!” आणि या प्रसंगानंतर ‘मुगल-ए- आजम’ चं शूट पुन्हा दणक्यात सुरु झाले.

  • भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.