महाआरत्या मुंबईच्या दंगलीस कारणीभूत ठरल्या होत्या अस श्रीकृष्ण आयोगाचं मत होतं..

अक्षय्यतृतीयेच्या दिवशी मनसेकडून महाआरती आयोजित करण्यात आली होती. मात्र राज ठाकरेंनी फेसबुक पोस्टवरून मनसे सैनिकांना आवाहन केलं की,

आधी ठरल्याप्रमाणे कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतिही बाधा आणायची नाही.

आत्ता राज ठाकरेंनी अचानकपणे आरत्यांच नियोजन का मागे घेतलं ते स्वत:च आगामी सभेत सांगू शकतील पण याच आरत्यांवरचा एक जूना किस्सा आहे तो तुम्हाला सांगता येईल..

तो म्हणजे १९९२ मधील मुंबईत ज्या दंगली झाल्या होत्या तेंव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी आयोजित केलेल्या महाआरत्या हे दंगली भडकावण्याचं कारण मानलं गेलं होतं. 

डिसेंबर १९९२ मधील या दंग्याच्या वेळी दोन महत्त्वपूर्ण घटना घडल्या, “मशीद पाडणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे”, असे शिवसेनाप्रमुखांनी काढलेले उद्गार आणि शहरात जागोजागी सुरू झालेलं ‘महाआरत्यां’ चं प्रस्थ…

पण याही आधी १९८० च्या दशकात, मशिदीबाहेर नमाज अदा करण्याच्या मुस्लिम प्रथेला आणि अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर करण्याच्या विरोधात काही हिंदुत्व संघटनांनी मंदिरांमध्ये ‘महा-आरत्या’ घेण्यास सुरुवात केली होती.

पण त्याला व्यापक स्वरूप १९९२-९३ मध्ये सेनेने दिलं होतं. 

त्यानंतर १९९० च्या दशकात बाळासाहेब ठाकरेंनी पहिल्यांदा मशिदींमध्ये लाऊडस्पीकर वापरण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते…

बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत उसळलेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल हा एक कागदोपत्री मानला जातो, ज्यात झालेल्या दंगलीचे आणि राजकारण्यांच्या वर्तनाचे वर्णन केले आहे.

श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालानुसार, या दंगलीत सुमारे ९०० लोकं मारले गेले, ज्यात ५७५ मुस्लिम आणि २७५ हिंदूंचा समावेश आहे. जखमींची संख्या हजारांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.

श्रीकृष्ण आयोगाने आपल्या अहवालात, मुंबईतील हिंसाचाराला भडकावणाऱ्या घटकांपैकी एक म्हणून शिवसेनेने आयोजित केलेल्या महाआरतींचे वर्णन केले आहे.

१९९२ च्या डिसेंबरमध्ये या दंगली शमल्यावर ठाकरे यांच्या मुलाखती प्रसिद्ध होऊ लागल्या. धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाऊ लागले.

मुंबईतील दंगे शमू लागले असतानाच ११ डिसेंबरच्या संध्याकाळी दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरातील गोल देवळात पहिली ‘महाआरती’ शिवसेनेनं आयोजित केली….

आता ‘महाआरती’ याचा शिवसेनेनं लावलेला अर्थ होता, हजार-दोन हजाराच्या जमावाने एकत्रितपणे खड्या स्वरांत केलेल्या देवाच्या आरत्या. 

प्रमोद नवलकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या पहिल्याच ‘महाआरती स लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

झालं यानंतर आरत्यांचं पर्व सुरु झालं….

पुढे प्रभादेवीचं सिद्धिविनायक मंदिर, काळाचौकीच्या श्रावण यशवंते चौकातील हनुमान मंदिर, आर्थर रोडच्या नाक्यावरील संतोषी मातेचं मंदिर. असं ठिकठिकाणी महाआरत्यांचं पेव फुटलं. रस्ते गर्दीने फुलून जाऊ लागले. तासनतास चालणाऱ्या या आरत्यांमुळे वाहतूक ठप्प होऊ लागली, तरी लोकं तक्रार न करता उलट या कार्यक्रमातच सहभागी होऊ लागले होते. पोलिसही या प्रकारामुळे बुचकळ्यात पडले होते.

दंगल शमली तरी महाआरत्या सुरूच राहिल्या… 

मशिदीवरील भोंगे उतरवले जाईपर्यंत आणि रस्त्यावरील नमाज बंद होईपर्यंत महाआरत्या सुरूच राहतील, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली होती.

१९९२ च्या डिसेंबरमधील वातावरण शांत झालंच होतं की, पुढे जानेवारी १९९३ च्या पहिल्याच आठवड्यात मुंबईत ‘पुनश्च हरि ॐ!’ या पद्धतीने हिंसाचार सुरू झाला. 

तेंव्हा याच महाआरत्यांनी उभं केलेलं वातावरणच हिंदूंना नको ते बळ देऊन गेलं होतं आणि प्रचंड हिंसाचार घडला होता….

हे आमचं नाही तर श्रीकृष्ण आयोगाचं म्हणणं आहे.

श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालात अनेक नेत्यांचं वर्णन, त्यांच्या भूमिकेवर चर्चा करण्यात आली आहे. त्यात बाळासाहेबांचं देखील नाव आहे मात्र त्यांच्या थेट भूमिकेवर चर्चा केली नाही. यावर ५ वर्ष अभ्यास करून ज्यांनी हा अहवाल लिहिला ते जस्टीस श्रीकृष्ण एका मुलाखतीत सांगतात की,

बाळासाहेब ठाकरेंना दोषी ठरविण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता. एखाद्या व्यक्तीची भूमिका काय होती हे सांगण्यासाठी साक्षीदार आवश्यक आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात फक्त एकाच व्यक्तीचे तक्रारपत्र होते. या हिंसाचारात शिवसेनेचा हात असून त्यामागे बाळासाहेब ठाकरे आहेत असं त्यात म्हणलं गेलं. 

मात्र बाळासाहेब ठाकरेंनी वाटेत येऊन कोणती कारवाई केली नाही किंवा कोणाला मारहाण केली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष पुरावे असल्याशिवाय कुणालाही दोषी ठरवता येत नाही. बाळासाहेबांच्या विरोधात या अहवालात काहीही वर्णन नसलं तरी त्यांनी आयोजित केलेल्या ‘महाआरत्या’ मात्र हिंसाचाराला कारक ठरल्या होत्या.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.