विदर्भातल्या भावंडानी घरातलं लोणचं मार्केटमध्ये आणलं आणि ५०० कोटींची कंपनी उभी केली

उन्हाळा कोणालाही सहसा न आवडणारा सीजन. कारण घराच्या बाहेर पडलं कि, आग ओकणारा सूर्य आणि घरात बसलं कि गर्मीनं परेशान व्हायची वेळ. त्यात कुठलंही काम करू नका तरी थकवा, आळस, झोप, कंटाळा अशा सगळ्या गोष्टी आपल्यासोबत घडतात. पण या सीजनची एकच सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात खायला- प्यायला लय भारी भेटत राव…

म्हणजे द्राक्षे, जांभूळ, कलिंगड, आंबे, फणस, कैऱ्या, ताडगोळे  असे एकापेक्षा एक उन्हाळी मेवे. त्यात घरातल्या बाया- माणसं पापड, कुरडया, वेफर्स, लोणची अश्या कामालासुद्धा लागली असतील. त्यामुळं जेवण कमी अशा वरच्या गोष्टी चरायचा हा सीजन. आता गावाकडची गोष्ट वेगळी आहे पण शहरात मात्र उन्हाळा सहसा लोणच्याच्या भरवशावर काढायला लागतो आणि हाच लोणच्याच्या भरवशाचा ब्रँड म्हणजे निलोन्स. 

‘इसमें प्यार मिला हैं असं म्हणणाऱ्या निलोन्सचे कित्येक प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत, पण तरी कंपनी आपल्या लोणच्यांसाठीच ओळखली जाते. 

या ब्रँडची सुरुवात केली जळगावातल्या उत्राण गावात राहणारे दोन भाऊ प्रफुल्ल सांघवी आणि सुरेश सांघवी. सुरेश सांघवी यांनी कृषी क्षेत्रात डिग्री पूर्ण केलेली. पण मोठा भाऊ असणाऱ्या प्रफुल्ल यांना वडिलांच्या मृत्युमुळं शिक्षण काही घेता आलं नाही आणि त्यावेळी कमाईचं एकमेव साधन म्हणजे शेती. त्यामुळं प्रफुल्ल यांनी सुरेशला सांगितलं कि, जे काही शिकशील बाबा त्याचा फायदा ग्रीकल्चर प्रोसेसिंगमध्ये होऊ देत. 

 कारण सांघवी कुटुंबाला आधीच फूड प्रोसेसिंगचा अनुभव होता. १५ एकर लिंबाची शेती होती. असं म्हणतात, दुसऱ्या महायुद्धात सैनिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सांघवी कुटुंब ब्रिटिश आणि भारतीय सैनिकांसाठी सरबत बनवत असायचे. ज्यामुळे त्यांचं उत्पादन डायरेक्ट निर्यात व्हायचं आणि त्यातून चांगली कमाई सुद्धा व्हायची. 

पण महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम १९६१ मुळे सांघवी कुटुंबाला आपली बरीचशी जमीन द्यायला लागली. त्यामुळं उरल्या सुरल्या जमीनीवरचं आपलं पोटपाणी चालवणं भाग होत. पण या दोघां भावांना एक गोष्ट चांगली माहित होती कि, जमीन छोटी का असेना, त्यात ग्राहकांची गरज लक्षात घेऊन, तस उत्पादन आणि त्याच्या संबंधित व्यवसाय ते चांगलचं चालवू शकतात. 

त्यामुळं हीच गोष्ट लक्षात घेऊन १९६२ मध्ये या दोघांनी आपल्या जेवणाच्या टेबलाचं आपली स्वतःची लॅब बनवली आणि स्वतः संशोधक बनून वेगवेगळे मसाले आणि खाण्यापिण्याच्या गोष्टींवर प्रयोग करायला लागले. सुरेश यांनी आपल्या शेतातले तुती, आंबा आणि बाकीच्या फळांपासून स्क्वॅश तयार केले. आणि नंतर  जेली, जॅम, केचअप अशा बरीच उत्पादन तयार केली आणि ती निलॉन्स या ब्रँड नावाने विकायला सुरुवात केली.

आता ब्रँडचं नाव निलॉन्स ठेवण्यामागचा किस्सा सुद्धा जरा इंट्रेस्टिंगचं आहे. कारण नायलॉन हा शब्द त्यावेळी लोकांच्या सतत तोंडात असायचा. जे माणसानं बनवलेलं पहिलं फायबर होतं असं म्हणतात, ज्यामुळं उद्योग क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली. नायलॉनच्या याच  प्रभावामुळे या दोघा भावांनी आपल्या ब्रँडचे नाव निलॉन्स असं ठेवलं. 

ब्रँडला नाव मिळालं, प्रोडक्ट मार्केटमध्ये उतरवले गेले. दोघ भावांनी मिळून चांगली काही सुरु केलं, पण लोकांना त्यांची प्रोडक्ट फारसे काही आवडले नाही. तरीसुद्धा काही तरी लोकांना आवडेल या हेतूने त्यांनी चार वर्षात एकामागून एक असे ५० प्रोडक्ट मार्केटमध्ये उरतवले. पण सगळेच फेल ठरले. १९६५ मध्ये अशी वेळ आली कि, प्रफुल्ल यांनी बिजनेस बंद करायचं ठरवलं. 

पण याउलट सुरेश याच म्हणणं होत कि, ‘ज्या व्यवसायात गुंतवणूक केली, त्याच व्यवसायातून नुकसान भरून काढू.’ अशातचं टर्निंग पॉईंट नावाची गोष्ट त्यांच्या आयुष्यात आली. या दोघांनी १९६६ मध्ये घरी बनवलेलं लोणचं मार्केटमध्ये उतरवलं. 

आपल्या बाकीच्या प्रोडक्टसारखं हे प्रोडक्ट सुद्धा फेल ठरणार का अशी भीती होती, पण लोणच्यानं कमाल केली, निलोन्सचं चटपटीत लोणचं लोकांना जास्तच आवडायला लागलं. त्यात त्यावेळी लष्कराच्या कँटीनमध्ये माल विकण्यासाठी सरकार टेंडर काढत असायचं. 

मग सांघवी बंधूनी सुद्धा आपली सगळी लोणची म्हणजे मिरचीचं, आंबा, लिंबू आणि मिक्स यासाठी अर्ज केला आणि लक लागलं  सुद्धा. त्यांना काही वर्षांसाठी आपले प्रोडक्ट लष्कराच्या कँटीनमध्ये सप्लाय करण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. 

सांघवी बंधू आधी कमी क्वांटिटीमध्येच प्रोडक्ट तयार करायचे, त्यामुळं ते बनवण्यासाठी जागा सुद्धा कमी होती, पण आता एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट म्हंटल्यावर डायरेक्ट फॅक्टरीची गरज पडली. त्यामुळे सेविंग आणि कॉन्ट्रॅक्टचे जे काही अड्वान्स पैसे मिळाले होते त्यातून ७००० स्वेअर फूटचा मोठा प्लॉट विकत घेतला.  पुढे मशिन्स आणि कामगार या सगळ्यांसाठी मोठ्या बजेटची गरज होती म्हणून बँकेकडून लोन काढलं आणि अशाप्रकारे लोणचं बनायला सुरुवात झाली. 

निलोन्सच लोणचं तर सक्सेसफुल ठरलं होत. त्यामुळे बाकीच्या प्रोडक्टच्या मागणीत सुद्धा थोडी वाढ झाली होती. लोणच्यानंतर कंपनीचं दुसरं प्रोडक्ट हिट ठरलं ते म्हणजे टुटी फ्रुटी. कारण भारतात ही गोष्ट एकदंम नवीन होती, त्यामुळे प्रोडक्ट चालेल का हे मोठं कन्फ्युजन होतं. पण लोकांना ही नवीन गोष्ट आणखी आवडली आणि लोकच नाही तर कराची बेकरी, क्वालिटी वॉल्स, नेस्ले, डॅनोने, वाडीलाल आणि अशा अनेक कंपन्यांनी आपल्या डेझर्टमध्ये ही टुटी फुटी ठेवायला सुरुवात केली. 

पुढे २००१ मध्ये सुरेश सांघवी यांचं निधन झालं, प्रफुल्ल हे शेतीच काम बघायचे त्यांना बिजनेसच काही जास्त माहिती नव्हती, त्यामुळे  सुरेश यांची  जबाबदारी त्यांचा मुलगा दीपक यानं उचलली. कंपनीची ग्रोथ वाढतच चालली होती. हा.. एक-दोन प्रोडक्ट फेल गेले होते, पण बाकीच्यांनी मार्केट सांभाळून घेतलं. अशातचं गावातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने आपले तीन कारखाने सुरू केले. 

निलोन्स कंपनी ही लोणच्यासाठीचं ओळखली जात होती. सगळं काम एकदम व्यवस्थित सुरु होत,  २००४ मध्ये तर कंपनीने ८ कोटींचं प्रॉफिट मिळवलं होत. पण काळानुसार ग्राहकांची मागणी आणि टेस्ट बघता कंपनीला आता मार्केटमध्ये आणखी जम बसवायचा होता. त्यात मार्केटमध्ये आयते मसाले आणि रेडी तो कुक फूडची मागणी वाढली. यासाठी कंपनीने पास्ता सॉस, मसाले, शेजवान चटणी, सॉस, सूप, बिस्कीट असे कित्येक प्रोडक्ट मार्केटमध्ये उतरवले. 

म्हणजे पारंपरिक मसाल्याबरोबर नवीन पिढीचे आयते पदार्थ कंपनीने तयार केले आणि ‘इसमें प्यार मिला हैं’ या टॅगलाईनने मार्केटमध्ये उतरवली. 

मार्केटिंगसाठी कंपनीने बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी या ब्रँड अँबॅसिटर बनवलं. कंपनीच्या जाहिरातीसुद्धा कॉमेडी जॉनरमध्ये बनवल्या, जेणेकरून ते सहज लोकांच्या तोंडावर राहतील.

आज निलोन्सच्या प्रॉफीटमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे ९५ टक्के वाटा हा लोणच्याचा आहे. पण बाकी प्रोडक्टच्या क्वालिटीमध्ये सुद्धा कंपनीने कधीच फरक केला नाही. त्यामुळे आजही निलोन्सचे प्रोडक्ट बऱ्याच पिढ्यांचे साक्षीदार आहे. कंपनी आजही सैन्याला आपली लोणची सप्लाय करत आहे. एवढंच नाही तर भारताबरोबर कंपनी आपली उत्पादने अमेरिका, यूके, मध्य पूर्व आफ्रिकेसह ३० देशांमध्ये निर्यात करते. 

एक साध्या घरातल्या किचनपासून सुरु झालेल्या या कंपनीचा सध्याचा टर्नओव्हर ५०० कोटींच्यावर जाऊन पोहोचलाय. एवढ्यावरचं नाही तर पुढच्या ३ वर्षात कंपनीला हा आकडा १५०० कोटींवर न्यायचा आहे. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.