स्टेथोस्कोपचा शोध कसा लागला…?

डॉक्टर लोकांची सगळ्यात मोठी आयडेंटिटी प्रूफ म्हणजे स्टेथोस्कोप !

पिक्चरमध्ये पण जर कुणाला डॉक्टरचा रोल करायचा असेल तर चेहऱ्यावर गंभीर भाव आणि गळ्यात स्टेथोस्कोप एवढं भांडवल पुरतं.

स्टेथोस्कोपशिवाय कुठल्याही डॉक्टरचं व्यक्तिमत्व पूर्णच होऊ शकत नाही. डॉक्टरांना स्टेथोस्कोपचा मुख्य उपयोग होतो तो पेशंटच्या हृदयाचे ठोके मोजण्यासाठी. अनेकांचा तर  डॉक्टरपेक्षा डॉक्टरच्या स्टेथोस्कोपवरच जास्त विश्वास असतो. चुकून किंवा आवश्यकता वाटत नसल्याने जर एखाद्या वेळी डॉक्टरांनी पेशंटची तपासणी करताना स्टेथोस्कोप लावला  नाही तर डॉक्टरांच्या डिग्रीवर शंका घेणाऱ्या महाभागांची संख्या सुद्धा आपल्याकडे कमी नाही. अशी ही एकुणात स्टेथोस्कोपची महती.

पण तुम्हाला माहितेय का की स्टेथोस्कोपचा शोध लागण्यामागे देखील एक रंजक कहाणी आहे. स्टेथोस्कोपचा शोध लावला तो फ्रेंच डॉक्टर रेनी लाय्नेक यांनी. वर्ष  होते १८१६.

bv stetho1

डॉ. रेनी हा खूप लाजाळू माणूस. पूर्वी हृदयाचे ठोके मोजण्यासाठी पेशंटच्या छातीला कान लावून  त्याची धडधड ऐकावी लागे. स्त्री पेशंट असले की रेनी जास्त अनकम्फर्टेबल व्हायचा.

एकदा त्याच्याकडे चेकिंगसाठी एक जाड महिला आली. तिला चेक करताना त्याला तिची हृदयाची धडधड ऐकू येईना. खूप वेळ प्रयत्न केल्यावर ती बाई सुद्धा अस्वस्थ झाली. रेनीला काहीच  करता येईना. मग त्याला आठवले की एकदा त्याने दोन मुलांना कागदाच्या  सुरळीमधून एकमेकांशी बोलण्याचा खेळ करताना पाहिले होते. त्याने ठरवले की हीच आयडिया वापरून एक प्रयोग करून बघायचा.

डॉ. रेनीने प्रयोग केला आणि तो फुलप्रुफ यशस्वी ठरला. कागदाची सुरळी त्या बाईच्या छातीवर टेकवून त्यातून त्याला हृदयाचे ठोके स्पष्टपणे  ऐकायला येऊ लागले.
पुढे त्याने त्यावर आणखी प्रयोग केले. या कामी त्याला त्याची बासरीवादनाची कला उपयोगी पडली. यातूनच त्याने जगातला पहिला स्टेथोस्कोपचा शोधून काढला.

१८१९ साली या शोधावर त्याने मासिकात एक पेपर प्रकाशित केला. संपूर्ण युरोपमधील  वैद्यकीय समुदायात हा स्टेथोस्कोप फेमस झाला. स्टेथोस्कोपला आज आपण पाहतो त्या स्वरूपात आणण्याचं श्रेय जातं डॉ.आर्थर लिरेड यांना. लिव्हर सिरोसिस, मेलेनोमा या रोगाच्या नावाच्या शोधाचं श्रेय देखील डॉ.रेनी लायनेक यांचंच. दुर्दैवाने रेनी खूप वर्ष जगले नाहीत. वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षीच त्यांचा  टीबीमुळे मृत्यू झाला. डॉ. रेनी लाय्नेक यांचा आज स्मृतिदिन.

Leave A Reply

Your email address will not be published.