दादा कोंडकेंनी इंदिरा गांधीच्या समर्थनात काढलेला पिक्चर सत्ता जाताच उलटवला

दादा कोंडके म्हणजे कलंदर व्यक्तिमत्व !

त्यांचं सगळं काम रोखठोक. त्यांनी आपल्या भूमिका कधी लपवल्या नाहीत. ते जितके चांगले कलाकार आणि अभिनेते होते, मित्र म्हणून देखील ते तितकेच चांगले होते. एकदा का एखाद्याशी मैत्री झाली की मैत्रीसाठी काहीही करायची त्यांची वृत्ती. ह्याच स्वभावाने त्यांना एकदा चांगलेच अडचणीत आणले. खुद्द दादा कोंडकेंनीच त्याबद्दल आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय.

किस्सा आहे १९७५ सालातला.

इंदिरा गांधींनी देशावर नुकतीच आणीबाणी लादली होती. त्यासाठी २० सूत्री कार्यक्रम ठरवला होता. हा कार्यक्रम देशभरात लागू करायची योजना होती. राज्यातील काँग्रेसच्या सरकारमध्ये वसंतदादा ग्रामविकासमंत्री म्हणून काम बघत होते. पक्के काँग्रेसी असणाऱ्या वसंतदादांनी हा २० कलमी कार्यक्रम राज्यात लागू करण्याचा जणू विडाच उचलला.

त्यावेळी वसंतदादांना आठवण आली दादा कोंडकेंची. कारण वसंतदादा पाटील आणि दादा कोंडके खूप वर्षापासूनचे मित्र. वसंतदादाच्या डोक्यात एक सुपीक कल्पना आली. त्यांनी दादा कोंडकेना विनंती केली की ह्या वीस कलमावर एक पिक्चर बनवा. दादा कोंडके स्टाईलमध्ये हा कार्यक्रम लोकांच्यात जास्त परिणामकारकरित्या पोहचेल, हा त्या मागचा हेतू. मैत्रीखातर दादा कोंडके तयार झाले.

dada
Twitter

दादा कोंडकेंनी अशोक सराफ, उषा चव्हाण, भगवान दादा अशी मराठीतील बडी स्टारकास्ट घेऊन ‘गंगाराम वीस कलमे’ हा चित्रपट बनवला. पण पिक्चर तयार होईपर्यंत देशाचं राजकीय चित्रच पालटूनच गेलं. सर्वत्र इंदिरा गांधींचा निषेध होऊ लागला. इंदिरा गांधीची लोकप्रियता रसातळाला पोहचली. महाराष्ट्रात देखील दुर्गा बाई भागवत,  एस.एम. जोशी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार लढा उभा केला.

इंदिरा बाईंनी आणीबाणी मागे  घेतली. त्यांचं सरकार जाऊन जनता पार्टीचं सरकार आलं. याच फेऱ्यात दादा कोंडकेंचा ‘गंगाराम २० कलमे’ पिक्चर अडकून पडला. कारण लोक २० कलमी कार्यक्रमावर दात खाऊन होते. त्या वातावरणात चित्रपट प्रदर्शित झाला असता तर दादांना दगड खावी लागली असती.

झालं! दादांना काही सुचायचंच बंद झालं. कारण चित्रपटात बराच पैसा गुंतला होता.आता ह्यातून नेमका काय मार्ग काढायचा असा विचार करत असताना त्यांना एक माणूस आठवला. तो माणूस म्हणजे महाराष्ट्राचे विनोदाचे बादशहा पुलं देशपांडे. पुलं आणीबाणीविरोधी चळवळीत सक्रिय होते. शिवाय त्यांनी पूर्वी चित्रपट बनवले असल्यामुळे त्यांना त्या क्षेत्राची जाण होती.

दादा पिक्चरची स्क्रिप्ट घेऊन त्यांना भेटायला गेले. पुलं घरी नव्हते. त्यांच्या पत्नी सुनीताबाई घरी होत्या. सेवा दलापासूनच दादांची ह्या दोघांशी देखील चांगली ओळख होती. वीस कलमाचा प्रकार ऐकून सुनीताबाईनी दादांची चांगलीच कानउघडणी केली. तेवढ्यात पुलं घरी आले. दादांनी त्यांना स्क्रिप्ट दिली आणि तुम्हीच मला यातून बाहेर काढू शकता असं सांगितलं.

पुलंनी स्क्रिप्ट वाचली आणि म्हणाले,

“हा पिक्चर रिलीज करण्यासाठी खूप बदल करावे लागतील. सगळे शॉट बदलावे लागतील.”

दादांनी विचारलं “ह्यावर उपाय काय?”

पुलं स्पष्टपणे म्हणाले “पिक्चर फेकून द्यायचा.”

दादा निराश होऊन तिथून निघाले. पिक्चर डब्यात जाणार म्हणून ते हादरले.

सगळा पैसा, मेहनत पाण्यात जाणार होती. नवीन फिल्म बनवायचं धाडस पण होत नव्हतं. न समजणारे इंग्लिश पिक्चर बघत दादा दिवस घालवू लागले होते. सतत गंगारामचा विषय डोक्यात फिरत होता.

एक दिवस त्यांना एक आयडिया सुचली. कथानकाला त्यांनी एक वेगळं वळण द्यायचं ठरवलं. चित्रपटात बचत करा, दारूबंदी, नसबंदी असे चांगलेच विचार मांडले होते. तेच मुद्दे उलट इंदिरा गांधींच्या विरोधात वापरायचे असं त्यांनी ठरवलं. त्यासाठी लागणारे छोटे-मोठे बदल त्यांनी केले. उदाहरणार्थ इंदिरा काँग्रेस पक्षाचं चिन्ह होतं गाय आणि वासरू.

मग दादांनी दाखवलं की गायीचं वासरू पैसे खातयं. त्यातून संजय गांधीवर टीका केली. काही शॉट नव्याने शूट केले. मात्र ह्या छोट्या बदलांनी पिक्चरचा चेहरामोहराच बदलुन गेला.

फायनल ट्रायलच्या वेळी एसेम जोशी, पुलं देशपांडे, ना.ग.गोरे यांना चित्रपट बघायला बोलावण्यात आलं. पिक्चर संपल्यानंतर पुलं दादा कोंडकेना म्हणाले, “बर झालं तू सगळं परत शूट केलंस” त्यांनी फक्त स्क्रिप्ट वाचली होती. दादांनी सांगितलं की फक्त काहीच शॉट बदलले आहेत. पुलंचा त्यावर विश्वासच बसेना. त्यांनी कौतुकानं दादांच्या पाठीवर हात फिरवला.

दादांचा कॉन्फिडन्स वाढला आणि त्यांनी पिक्चर “राम राम गंगाराम” ह्या नावाने रिलीज केला. त्यांच्या बाकीच्या चित्रपटांप्रमाणे हा चित्रपट पण तुफान गाजला.

दरम्यानच्या काळात गंगेतून बरंच पाणी वाहून गेलं होतं. पिक्चर रिलीज होईपर्यंत इंदिरा गांधींचं सत्तेत पुनरागमन झालं होतं. मात्र त्यांच्यावर टीका आहे म्हणून ह्या पिक्चरला अडवण्यात आलं नाही. ‘राम राम गंगाराम’ने थिएटरमध्ये ‘गोल्डन ज्यूबली’ साजरी केली.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.