‘शिवाजी महाराज वंद्य, पण शिवाजी महाराजांचा मुंबईशी काय संबंध- सर फिरोजशाह मेहता

 

मुंबई महापालिकेसमोर सर फिरोजशाह मेहतांचा पुतळा मोठ्या रुबाबात उभा आहे. अनेकांना याची कल्पना नसेल पण मुंबई महापालिकेसमोर मेहतांचा जो पुतळा आहे, तो उभारला जाण्यामागे एक अत्यंत  सुरस कथा आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी तत्कालीन ‘लोकमान्य’ दैनिकात लिहलेल्या लेखात या संबंधीचा किस्सा लिहिला होता. फिरोजशाह मेहता हे ‘मुंबईचा सिंह’ या नावाने देखील ओळखले जायचे. आज मुंबईत महापालिकेबरोबरच मोठ्या म्हणून  ज्या ज्या काही संस्था उभ्या आहेत, त्यांची भक्कम पायाभऱणी करण्यात फिरोजशाह मेहतांचा मोठाच  वाटा आहे.

साधारणतः सण 1900 दरम्यानची किंवा त्या पुढील काळातली गोष्ट असेल. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी मुंबई महापालिकेसमोरील रिकाम्या जागेसंदर्भात एक प्रस्ताव पालिकेला दिला होता. ‘पालिकेसमोरील रिकाम्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी शाहू महाराजांनी केली होती. त्यासाठी मुंबई महापालिकेला रोख 1 लाख रुपये देण्याची तयारी देखील शाहू महाराजांनी दर्शविली होती. शिवाय स्वत:च्या खर्चाने शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करुन देण्याची जबाबदारी घ्यायला देखील ते तयार होते फक्त पालिकेने जागा उपलब्ध करुन द्यावी, असा त्यांचा प्रस्ताव होता.

मात्र या प्रस्तावाला मुंबईच्या सिंहाने विरोध केला. प्रस्तावाला विरोध करताना मेहता म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज मला वंद्य आहेत, मात्र शिवाजी महाराज आणि मुंबईचा काय संबंध?” मुंबईच्या नागरी जीवनाशी ज्याचा जवळचा संबंध असेल अशाच व्यक्तीचा पुतळा मुंबई महापालिकेसमोर उभारला जावा, ज्यांचा मुंबईशी काही संबंध नाही अशा कुठल्याही व्यक्तीचा पुतळा महापालिकेसमोर उभारण्याला मेहतांनी विरोध केला.

नंतरच्या काळात  जेव्हा इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज भारतीय उपखंडात आला तेव्हा पंचम जॉर्जचा पुतळा पालिकेसमोर उभारला जावा, अशी मागणी मुंबई पालिकेतीलच काही सदस्यांनी केली. तसा ठरावच  पालिकेतील सदस्यांनी आणला. मात्र या प्रस्तावाला देखील सर फिरोजशाह मेहतांनी कडाडून विरोध केला.‘भले पंचम जॉर्ज भारतीय उपखंडाचा राजा असेल, मात्र त्याचा मुंबईच्या नागरी जीवनाशी संबंध काय?’ हाच सवाल मेहतांनी यावेळी देखील पालिकेत केलेल्या भाषणात उपस्थित केला. शेवटी या ठरावावर एकमत होत नसल्याने त्यावर मतदान झाले. दोन्ही बाजूला समसमान मते पडली. मात्र अध्यक्ष या नात्याने सर फिरोजशाह मेहतांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले आणि हा प्रस्ताव देखील फेटाळला गेला.

Sir Firojshah Mehta
मुंबई महापालिकेसमोरील फिरोजशाह मेहतांचा पुतळा

प्रस्ताव फेटाळला गेल्यावर पालिकेतल्या काही सदस्यांचा राग अनावर झाला. ‘सर दिनशा एडलजी वाच्छा’ यांनी तर मेहतांवर कडाडून टीकेची तोफ डागली. “काही वर्षांपूर्वी तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध केला होता, आज साऱ्या भारतीय उपखंडाचा राजा असलेल्या पंचम जॉर्जचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव देखील तुमच्यामुळेच फेटाळला गेला. मुंबई महापालिकेच्या समोर तुमचा पुतळा उभारला जावा अशी तुमची इच्छा आहे काय?’ असा सवाल त्यांनी मेहतांना केला. यावर उत्तर द्यायला  सर फिरोजशाह मेहतांना क्षणाचाही विलंब लागला नाही. ते सभागृहात उभे राहिले आणि म्हणाले, “का नाही? जर देवाची इच्छा असेल तर या जागेवर माझाही पुतळा उभारला जाईल”

प्रत्यक्षात काही वर्षानंतर जेव्हा पालिकेसमोर पुतळा उभारण्याची वेळ आली तेव्हा या ‘मुंबईच्या सिंहा’चा, मुंबईच्या नागरी जीवनाशी अत्यंत निकटचा संबंध असणाऱ्या ‘सर फिरोजशाह मेहता’ यांचाच पुतळा मुंबई महापालिकेसमोर उभारला गेला.

 

 

 

2 Comments
  1. Anonymous says

    एक अप्रकाशित बाजू उजेडात उजेडात आली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध केला म्हणून महाराष्ट्रातील आजची पिढी मेथांना व्हिलन समजू शकते… तरीही त्यांनी केलेल्या विरोधामागील भूमिका लक्षात घेता वेगळी भूमिका मांडण्याचं धाडस अगदी राजा पंचम जॉर्ज च्या पुतळ्यालाही विरोध करणं हे अतिधाडस आहे…
    अशा गोष्टी समोर यायला हव्यात.
    धन्यवाद, टीम बोलभीडू

  2. रवीन्द्र खडपेकर says

    very nice !

Leave A Reply

Your email address will not be published.