मुंबईतली पहिली दंगल कुत्र्यांमुळे झाली होती, ती पण खऱ्याखुऱ्या…!!!
कुत्र्यांमुळे दंगल होण्याची हि पहिली वेळ नाही आपल्याकडे कुत्र्यांचे पुतळे देखील भांडणाचे विषय ठरू शकतात. पण हा मुद्दा आहे खऱ्याखुऱ्या कुत्र्यांचा. मुंबईच्या इतिहासात दंगली कधी आणि कशामुळे झाल्या हे पहायला गेल्यानंतर. पहिली दंगल हि चक्क कुत्र्यांमुळे झाल्याची नोंद आढळते. ‘डॉग रायट १८३२’ म्हणून नोंद असलेल्या या दंगलीत पारसी, हिंदू आणि मुस्लीम सहभागी झाले होते.
दंगलीच कारण –
त्यावेळच्या मुंबईच्या दंडाधिकाऱ्यांनी १८१३ सालचा एक कायदा नव्याने लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या कायद्यानुसार वर्षाच्या ‘एप्रिल ते मे’ आणि ‘सप्टेबर ते ऑक्टोबर’ या २ महिन्यांच्या कालावधीत भटक्या आणि बेवारस कुत्र्यांना पकडून मारण्याची मूभा पोलिसांना देण्यात आली होती. गमतीची गोष्ट अशी की खास त्यासाठीच म्हणून काही लोकांची नियुक्ती देखील करण्यात आली होती. मारलेल्या प्रत्येक कुत्र्यामागे त्यांना ‘आठ आणे’ देण्यात येत असत. आता झालं असं की या पैशांच्या लालसेने अनेक जणांनी सरसकट कुत्र्यांची धरपकड करून त्यांना यमसदनी पाठवायला सुरुवात केली. यातली अनेक कुत्री तर पाळीव होती. त्यामुळे लोकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
पारसी धर्माच्या मान्यतेनुसार कुत्रा हा पवित्र प्राणी समजण्यात येतो. कुत्र्याची व्यवस्थित काळजी घेण्याची शिकवण पारसी धर्ममान्यता देतात. हिंदू धर्मियांसाठी जशी गाय तसाच पारसी धर्मियांसाठी कुत्रा. त्यावेळी मुंबईच्या फोर्ट भागात बहुसंख्य पारसी समुदायाचा रहिवास होता. त्यामुळे कुत्र्यांची विनाकारण होणारी कत्तल थांबविण्यात यावी अशी विनंती पारसी समुदायाने दंडाधिकाऱ्याकडे केली. पण या विनंतीला प्रशासनाचा ढिम्म प्रतिसाद मिळाला आणि कुत्र्यांची कत्तल सुरूच राहिली. तेव्हा दि. ६ जून १८३२ रोजी चिडलेला पारसी समुदाय एकत्र जमला आणि त्यांच्या एका घोळक्याने कुत्र्यांना पकडायला आलेल्या पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांनी देखील त्याचा प्रतिकार करत या जमावावर हल्ला चढवला आणि फोर्टच्या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी देखील पारसी समुदायाने आपला विरोध कायम ठेवला. कायम ठेवला म्हणण्यापेक्षा तो अधिक तीव्र करत बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परिसरातून जाणाऱ्या इंग्रजी अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. इंग्रजी अधिकाऱ्यांसाठी हा धक्काच होता. दुसऱ्या दिवशी हिंदू आणि मुस्लीम धर्मीय लोक देखील पारसी लोकांच्या समर्थनात उतरले. २०० लोकांच्या समुदायापासून सुरु झालेल्या या विरोध प्रदर्शनात आता ५०० पेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते. लोकांचा विरोध काही कमी व्हायला तयार नव्हता. शेवटी ब्रिटीश सरकार लोकांच्या विरोधासमोर झुकलं आणि हे दंगे थांबले.
१८१३ सालचा वादग्रस्त कायदा मागे घेण्यात आला आणि सर जमशेदजी जीजीभॉय यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कुत्र्यांना न मारण्याची जी मागणी केली होती, ती देखील मान्य करण्यात आली. या दंगलीमध्ये कुठलीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही.