महाराष्ट्राचा मांझी : ज्यांनी एकट्याच्या जीवावर अभयारण्य निर्माण केलं ! 

धों.म. मोहिते त्यांचं नाव. मोहित्याचे वडगाव हा त्यांचा पत्ता. जिल्हा सांगली. विशेष ओळख म्हणजे ते क्रांन्तिसिंह नाना पाटलांच्या ‘तुफान सेने’त कॅप्टन होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर मोहित्याच्या वडगावचे ते सरपंच होते. मुक्त पत्रकार, लेखक, आणि साहित्यिक देखील होते. त्यासोबतच धों.म. मोहिते एक ‘टग्या’ होते.

काही वर्षांपुर्वी नवाझुद्दीन सिद्दीकीचा ‘मांझी’ सिनेमा आलेला. पत्नीच्या प्रेमातून डोंगर फोडणाऱ्या अवलियाची ती गोष्ट. धोंम मोहित्यांनी  देखील तसंच काहीसं केलं. फक्त मोहित्यांनी हे केलं ते माणसांच्या प्रेमासाठी.

सरपंचपदाची धूरा संभाळून हा माणूस सामाजिक कामांसाठी सक्रिय झाला होता. याच दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातल्या पत्रकारांचा विदर्भ अभ्यासदौरा आखण्यात आला होता. या दौऱ्यात धोंम सहभागी झाले होते.

साल होतं १९७० चं. पत्रकारांना घेऊन त्यांची बस विदर्भातल्या मध्यरात्रीच्या अंधारातून जात होती.

अचानक त्या काळोखात बस थांबली. पत्रकार खाली उतरले. पाहतात तर समोर गेट. रेल्वे रुळ नसणारं ते गेट पाहून पश्चिम महाराष्ट्रातल्या पत्रकारांना आश्चर्यच वाटलं. वॉचमनला गेट उघडण्यास सांगण्यात आलं. वॉचमन म्हणाला,

“तुम्ही पत्रकार असा नाहीतर मंत्रीसंत्री. तुमच्याकडे पास नसेल तर मी गेट खोलणार नाही. ते गेट होतं ताडोबा अभयारण्याचं.”

बसमध्ये बसलेल्या धों.म. मोहित्यांना आश्चर्य वाटलं. जंगलाला कुठे गेट असतं का ? शेजारच्या चौघांना ते म्हणाले, “अशी अभायारण्य आपल्याकडे पाहिजेत.”

मी पण असच अभयारण्य करणार !!

पत्रकार हसायला लागले. धोंम मोहिते लगेच मी पण जंगल करणार म्हणतोय. चेष्टा झाली. पण त्या रात्री ठरलं आपण अभयारण्य बांधायचं !!!

पत्रकारांना माहित नव्हतं की बसमध्ये बसलेला हा माणूस टग्या आहे. आपल्याला हवं ते करणारा टग्या. या टग्यानं ठरवलं आणि सुरू झाला प्रवास एका अभयारण्याचा.

सागरेश्वरचा डोंगर. १९४० च्या दरम्यान हा डोंगर म्हणजे जंगल होतं. याच जंगलात मध्यरात्रीच्या सुमारास क्रांतिसिंह नाना पाटलांची पहिली सभा झाली होती. या डोंगराने ब्रिटीशांविरुद्ध लढणारे क्रांतिकारक जन्माला घातले होते. त्यासोबतच माणसांसाठी लढणारा बापू बिरू सारखा माणूस याच डोंगराने आपल्या अंगाखांद्यावर खेळवला होता.

धों.म. मोहिते गावी आले ते अभयारण्य करायचं हा पण घेवूनच.

गावात पोहचल्या पोहचल्या या माणसाने कऱ्हाडचे रेंज ऑफिस गाठले. तिथल्या ऑफिसरला म्हणाले,

“सागरेश्वरच्या डोंगरावर अभयारण्य करायचं आहे.”

ऑफिसर म्हणला, “करुया की !!! जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना भेटा. जिल्हा विकास सल्लागार समिती आणि सातारा वनविभागामार्फत लगेच काम होऊन जाईल.”

धोंम आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचं सख्य. मोठ्या आनंदात धोंम अध्यक्षांना भेटले. पत्र लिहलं. पंधराच दिवसात सातारा वनविभागाच उत्तर आलं,

“निलगिरीची रोपे लावण्यात आली आहेत, घायपात आहे. कुंपन घालण्याची गरज नाही”

अभयारण्याच्या नावाने शब्द देखील न काढता सरकारी भाषेत उत्तर देण्यात आलं.

त्यानंतर मोहिते भेटले थेट यशवंतराव चव्हाणांना. मोहितेंनी त्यांच्या मनातील अभयारण्याची संकल्पना यशवंतरावांना सांगितली. यशवंतरावाचं आणि सागरेश्वरचं अनोखं नातं होतं. त्यांच्या गावापासून दोन किलोमीटरचा तो डोंगर. मोहितेचा ठराव ऐकताच ते म्हणाले,

“शासन अजगर असतं तर कार्यकर्ता वारा. तू काम करत रहा. लावून धर होऊन जाईल.”

साहेबांचा लावून धरायचा शब्द त्यांनी ऐकला खरा पण कसं ? शासनाच्या चौकटीवर फेऱ्या मारून धों.म.मोहितेंना यशवंतरावांनाच भेटावं लागलं. यशवंतराव चव्हाणांनी त्यांना पत्र लिहायला सांगितलं. त्यावर मोहितेंना त्यांच्या माजी सरपंचपदाचा हुद्दा लिहायला लावला आणि  ते पत्र वनमंत्र्यांना देण्यासाठी आपल्या पीएकडे दिलं.

Screen Shot 2018 08 08 at 7.20.39 PM

साक्षात यशवंतरावांनी पत्र दिल्यानं लढाई जिंकल्यात जमा होती.

झालं देखील तसंच. काही दिवसातच अभयारण्याची जागा पाहण्यासाठी सातारचे उपविभागिय अधिकारी आले. त्यांनी ग्रीन सिग्नल दिला. त्यानंतर एकामागोमाग त्यांचे वरिष्ठ अधिकारी, वनसंरक्षक अधिकारी येत गेले आणि जागेला ग्रीन सिग्नल देत गेले. त्यानंतर वेळ आली होती ती महाराष्ट्राचे मुख्य वनसंरक्षक बूट साहेबांची.

बुट साहेबांची भेट ठरली त्याच दरम्यान मोहिते इलेक्शनमध्ये बिझी होते. बूट साहेब परस्परच  जागा पाहून गेले. आता मोहितेंना टेन्शन आलं होतं. त्यांनी बूट साहेबांना फोन लावला. फोनवर बूट साहेब म्हणाले,

“मला जागेची माहिती देण्यात आली होती. त्याचबरोबर असंही सांगण्यात आलं होतं की, मोहिते गोड बोलून फसवतात. म्हणूनच मी परस्पर येऊन जागा पाहून गेलो. तुमचं अभयारण्य नक्की होणार.”

अत्यंत खुषीत मोहितेंनी सांगलीत पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितलं की “सागरेश्वर येथे अभयारण्य होणार. देवराष्ट्रे, मोहित्यांचे वडगाव, आसद, तुपारी, दुधारी आणि ताकारी गावातील डोंगरांचा समावेश अभयारण्यात होणार.”

हे ऐकताच गावकऱ्यांचं धाबं दणाणलं. आपली जनावरं कुठे चरायला जाणार इथपासून ते डोंगरात असणाऱ्या दारूच्या भट्ट्यांच काय होणार इथपर्यंत अनेक प्रश्न होते.

मोहितेला धडा शिकवायला हवा !!!

गावच्या जागा जाणार म्हणल्यानंतर लोकं वेगवेगळ्या मार्गाने विरोध करु लागले. विरोध पण असा की गावातल्या कोणाच्या अंगात देवी आली तरी देवी म्हणायची,

“हा मोहिते अभयारण्य करायचं म्हणतूया. त्याचं वाटोळं होणार !! त्याला सांगा.”

धों.म. मोहितेंना हे समजल्यानंतर ते म्हणायचे, “देवीला पण समजलं अभयारण्य होणार किती चांगली गोष्ट आहे ही.”

असाच एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आला बापू बिरू वाटेगावकराचा. बापू बिरूसाठी डोंगरदऱ्या म्हणजे घरच. एकदा धोंम सागरेश्वरच्या डोंगरात अभयारण्याची स्वप्न रंगवत असताना त्यांच्या समोर बंदूक घेऊन बापू बिरू उभा राहिला. तो म्हणाला,

“गरिबाची मेंढरं डोंगराव चढत्यात. वडगावकर हे वागणं बर नव्हं.”

मोहितेंना काहीच बोलता आलं नाही. बापू बिरूला उत्तर देण्याची हिंम्मत कोणाच्यातच नव्हती. पण मोहितेंनी ठरवलं होतं की काहीही झालं तरी अभयारण्य करायचंच. भले जीव गेला तरी चालेल.

अभयारण्य रद्द करण्यात येत आहे !

एका बाजूला लोकं तर दूसऱ्या बाजूला सरकार अशी दुहेरी लढत चालू असतानाच धोमंना पत्र आलं. आपण सुचवलेलं वनक्षेत्र अभयारण्यासाठी योग्य नाही. सबब हे अभयारण्य रद्द करण्यात येत आहे. मोहिते टग्या होते. आपली शबनम पिशवी घेतली आणि ते तडक निघाले मुंबईला. कशाला तर वनमंत्र्यांना जाब विचारायला.

नासिकराव तिरपुड्यांची कॉलर धरली ?

ते मुंबईला गेले. दिवसभर शोधाशोध करुन मंत्रालयातील वनमंत्री कक्षाच्या बाहेर थांबले. आपला नंबर येताच ते आत शिरले. वनमंत्री तिरपुडेंना विचारलं की, नेमकं काय झालं…? अभयारण्य का रद्द करण्यात आलं ?

तिरपुडे म्हणाले,

“शासनाचा निधी कसा काढून घ्यायचा यात सांगलीकर पटाईत आहेत. लागले टेकडीवर अभयारण्य करायला.”

मोहिते म्हणाले, “आत्तापर्यंत तिथे येऊन अभयारण्य होईल म्हणून सांगणारे अधिकारी मुर्ख आणि एसीत बसून निर्णय घेणारे तुम्ही तेवढे अतिशहाणे का ?”

झालं..! पुढे बाचाबाची वाढली. धोमं आणि तिरपुडे एकमेकांच्या अंगावर जाण्याइतपत भांडले.

वसंतदादांची मध्यस्थी !

रात्र झाली होती. मोहिते जेवले नव्हते. यशवंतरावांना फोन लावण्यात आला. फोनवर मोहितेचा आवाज ऐकताच यशवंतराव चव्हाण म्हणाले,

“काय रे बाबा, आग लागली का अभयारण्याला..?”

मोहिते म्हणाले, “लागलीच असं समजा. तुमच्या मंत्र्यांनं रद्द केला आहे ठराव.”  यशवंतराव म्हणाले, “सकाळी जाऊन वसंतदादांना भेट. मी बघतो काय ते.”

सकाळ झाली. मोहिते दादांच्या बंगल्यावर गेले. दादांनी आपला ड्रायव्हर आणि गाडी सोबत दिली आणि तिरपुडेच्या बंगल्यावर जायला सांगितलं. जाता जाता दादा म्हणाले,

“भांडण काढू नका. वनमंत्री पाचव्या मजल्यावर बसतात. ते तिथूनच खाली फेकून देतील.”

“पाहतो काय ते. एकतर मी त्यांना फेकून देईल, नाहीतर ते मला फेकतील.” मोहितेंचं उत्तर.

मोहिते तिरपुडे यांच्याकडे जाताच तिरपुडे उभा राहिले.

“अहो इतका का राग धरला. आपलं अभयारण्य मंजूर केलंच आहे फक्त मी तीन लाखच मंजूर करु शकतो.”

मोहिते म्हणाले, “नुसता खांब लावून बोर्ड लिहला तरी चालेल.”

मोहिते बाहेर पडत असतानाच तिरपुडे म्हणाले, “इतक्यासाठी दिल्लीला फोन करायची काय आवश्यकता होती.”

पहिलं रोपटं लागलं, अभयारण्य फुललं. २१ ऑगस्ट १९७१ ची रात्र.

अभयारण्यात पहिलं रोप लावण्यात आलं. वर्षभर रोपं लावण्यात आली. पुढच्या पावसाळ्यापर्यंत रोपं चांगली कंबरेपर्यंत वाढली. यशवंतराव चव्हाण अभयारण्यात आले. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे अर्थमंत्री यशवंतराव मोहिते देखील होते. दोन यशवंतांनी मिळून गेटच्या बाजूस रोपे लावली. यशवंतराव म्हणाले,

“आत्ता तुझं हे अभयारण्य खऱ्या अर्थाने यशवंत होईल.”

अभयारण्य खऱ्या अर्थाने बहरून येण्याची स्वप्न रंगू लागली आणि अशातच दुष्काळ पडू लागला.

Screen Shot 2018 08 08 at 7.21.19 PM

१९७२ चा तो ऐतिहासिक दुष्काळ !!

मोहितेंनी या दुष्काळाचा फायदा करून घ्यायचं ठरवलं. रोपे मरु लागली. माणसांना पाणी नाही तर रोपांना कुठून मिळणार. मोहितेंनी दुष्काळी भागात होणारी शासकिय कामे अभयारण्यात आणली. सुरवातीला लांबच्या डोंगरात जावून कामे कोण करणार म्हणून माणसं येत नसतं.

पण हळुहळु दुष्काळ वाढला. लोकांना खाण्याचे वांधे  झाले. बागायदार शेतकरी जवळ काम करायला नको म्हणून डोंगरात काम करु लागली. त्यातूनच अभयारण्यात कामांचा डोंगर उभा राहिला. डोंगरात जाणारा रस्ता उभा राहिला !!!

अभयारण्य पुर्ण झालं.

अशाच एक दिवशी बापू बिरू पुन्हा डोंगरात भेटला. तो म्हणाला, “वडगावकर लय भारी काम केलं की तुम्ही. उगच तुम्हाला दम दिला.” बापू बिरू त्याच्या रस्त्याने गेला. मोहिते आपल्या अभयारण्याकडे पाहू लागले.

एकट्याच्या हिंमतीवर शासकिय पातळीवर लढा लढत रोज एखादं तरी रोपं अभयारण्यात लावणारे मोहिते.

अभयारण्याच्या नशेतून एका डोंगराचं जंगल झालं. भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणावरुन तिथे हरणं, चितळ, काळवीट सोडण्यात आले. एक डोंगर ज्याला क्रांतिसिंह नाना पाटलांचा इतिहास होता. ज्याला सागरेश्वराचा आशिर्वाद होता, तो डोंगर मोहित्यांनी दारूभट्यांच्या विळख्यातून मोकळा केला होता. आज त्याठिकाणी नुसतं अभयारण्य नव्हतं, तर ते भारतातलं एकमेव मानवनिर्मीत अभयारण्य होतं.

६ ऑगस्ट १९९९४ रोजी राष्ट्रपती भवनातील ‘अशोक हॉल’मध्ये मोहितेंचा सत्कार होता. इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार, इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार त्यांना मिळाला. व्यक्तिगत पातळीवर असा पुरस्कार मिळणारे ते एकमेव होते. राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांनी जेव्हा त्यांना पुरस्कार दिला तेव्हा ते शेजारच्या व्यक्तीला म्हणाले, “ये हमारे वाय.बी.चव्हाणजी के गाववाले हैं !!!!”

भारतातल्या या एकमेव मानवनिर्मीत अभयारण्याबद्दल रानकवी यशवंत तांदळे लिहतात,

धों.म अण्णा बोले चव्हाणाला ! लावायची तार डोंगराला !

१९७० सालाला ! अंबिकावन जंगलाला !

वनखातं आलं तपासायला !!

सातारा जिल्ह्याला जसा महाबळेश्वर ! सांगली जिल्ह्याला सागरेश्वर !!

आता हे रानकवी यशवंत तांदळे कोण तर पाहूया पुढच्या भागात…

संदर्भ – कथा सागरेश्वर अभयारण्याची. (धो.म. मोहिते )

  •  सौरभ पाटील.

 

13 Comments
  1. अमृत विश्वास पाटील. says

    धो. म. मोहिते यांचे कार्य हे खूप मोठे आणि थोर आहे, नव्या पीढीने त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.
    – अमृत पाटील, बोरगाव (बहे).

  2. बांळासो पवार पोलिस पाटिल शिवणी ८८०५२९५००० says

    मोहिते यांच्या कार्याला जाहिर सलाम.

  3. बांळासो पवार पोलिस पाटिल शिवणी ८८०५२९५००० says

    मोहित्यांच्या कार्यास सलाम

  4. Pankaj Borade says

    वंदनीय,
    आज पर्यंत मला महाराष्ट्रात मानव निर्मित जंगल आहे याची कल्पनाच नव्हती.
    आपला लेख हा अत्यंत छान आणि अभ्यास पूर्ण आहे.
    असेच माहितीपूर्ण लेख आपण वारंवार पाठवावे.
    धन्यवाद.

    पंकज प्रभाकर बोराडे
    बदलापूर.

  5. Avinash Avhad says

    Kup sunder

  6. गोपाळराव होनमाने,देवराष्ट्रे ता कडेगाव जि सांगली says

    वृक्षमित्र आदरणीय धों म मोहिते आण्णा यांचे मानवजातीवर झालेले उपकार कधीही विसरता येणार नाहीत.अपार मेहनतीने उभारलेले अभयारण्य पहायला आज आण्णा असायला हवे होते.आण्णा तुमच्या कार्यास सलाम.

  7. शैलेश सादरे says

    आतापर्यंत मोहित्याचे वडगांव नुसतं ऐकून आहे पण खरा इतिहास आम्हाला माहीत न्हवता खरच खूप मोठे योगदान आदरणीय धो. म. मोहित्यांचे सांगली जिल्ह्यावर आहे आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आम्ही सांगली जिल्ह्यातील आहोत याचं. त्यांच्या मेहनतीने सांगली जिल्ह्यात मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्य तयार झाले. आणि ते नावारूपाला आले. त्यांच्या या कार्याला मानाचा सलाम …!

  8. राहुल श्रीकांत मोकाशी says

    अतिशय सूंदर माहिती व व्यक्ती विशेष. हा लेख प्रसिद्ध झालाच पाहिजे. पुढील लेख मला वाचायला मिळावे ही नम्र विनंती.
    राहुल श्रीकांत मोकाशी 937 33 44 345

  9. Nandkishor shinde says

    Very encouraging work by Annasaheb 🙏

  10. Ashwinkumar says

    Khupach chan kam keley … Ek itihas aahe sagreshwar wildlife Sanctuary…

  11. तानाजी रुपनर says

    आदरणीय धो. म. मोहिते, तुमच्या या उत्कृष्ट कार्याला मनापासून सलाम. १९७o च्या दशकात मानव निर्मित अभयारण्य तयार करण्याचे विचार आणि दूरदर्शी पणा खूप काही सांगून जातो. सांगली जिल्हा आपल्या या आदिवतिय कार्याला कदापि विसरणार नाही.
    तानाजी रुपनार बालेवाडी, ता. आटपाडी, सांगली.

  12. Suraj Ronge says

    Sourabh Patil & Team Bol Bhidu❤️❤️

  13. pratiksha mohite says

    मला खूप अभिमान आहे की मी आदरणीय धो. म. मोहिते यांसारखे सुपुत्र असणाऱ्या मोहित्यांचे वडगाव गावात जन्मले.
    धो.म.मोहिते अण्णा तुमच्या या थोर कार्याला सलाम.
    प्रतीक्षा मोहिते. मोहित्यांचे वडगांव,ता.
    कडेगांव,सांगली.

Leave A Reply

Your email address will not be published.