काँग्रेसच्या पहिल्या फुटीची गोष्ट : २२ वर्षे संघटना वाढवण्याचे प्रयत्न झाले पण…

आजच्या विषयाचा संदर्भ तसा बराच जुना..खूप जुना. थेट १९०७ च्या काँग्रेसच्या गाजलेल्या अधिवेशनातला.

१९०७ सालचं काँग्रेसचं अधिवेशन म्हणजे सुरत विभाजन असा उल्लेख आपण इतिहासात वाचत आलोय. २७ डिसेंबर १९०७ मध्ये पार पडलेलं हे अधिवेशन काँग्रेसमधल्या पहिल्या फुटीचं कारण बनलं.

काँग्रेसची स्थापना मुंबईत १८८५ साली झाली. २२ वर्षांपासून काँग्रेस वाढवण्याचे प्रयत्न झाले पण त्या प्रयत्नांवर पाणी फेरत या अधिवेशनात काहीच तासात काँग्रेस फुटली. पण ज्याप्रकारे काँग्रेस दुभंगली त्याची आठवण तशी वाईटच…त्याचीच ही गोष्ट.

काँग्रेसच्या पहिल्या फुटीची गोष्ट…

या फुटीला काँग्रेसमध्ये असणारे जहाल आणि मवाळ हे दोन गट कारणीभूत होते. दोन्हीही गटांचे अंतिम ध्येय जरी एकच असले तरीही त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत तात्त्विक भेद होता. मावळ गटाचा सरकारच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता त्यामुळे ते सरकारच्या मर्जीत राहूनच सौम्यपणे सुधारणा करायची भूमिका असायची तर याउलट टिळकांच्या नेतृत्वाखाली जहाल गटाला आक्रमपणे पुढे येऊन ब्रिटिश सरकारचा विरोध करायचा. 

खरं तर या मतभेदाचं कारण बंगालच्या फाळणीत सापडतं. 

सरकारने फाळणी जाहीर केली, तेंव्हा त्या निषेधार्थ मावळ गट जाहीर सभा घेत होता. तर जहाल गटाला बहिष्काराचे आंदोलन सर्व देशभर पसरावे असे वाटत होते तर जहाल गटाला बहिष्काराचे आंदोलन बंगालपुरते मर्यादित ठेवावे असं वाटत होते. फाळणीला विरोध कसा, किती आणि कोणत्या मर्यादांपर्यंत करावा यातूनच दोन्ही गटात मतभेद निर्माण झाले.

या तणावात १९०६ सालचं कोलकता येथील अधिवेशन आलं.

जहाल गटाला लोकमान्य टिळक अध्यक्ष व्हावेत असे वाटत होते; पण मवाळ गटाचा टिळकांनी अध्यक्ष होण्याला विरोध होता. मग टिळकांनी स्वतःचं नाव मागे घेतलं आणि लाला लजपतराय यांच्या नावाचा पुरस्कार केला. पण मावळ गटाला लजपतराय यांचं नावही मान्य नव्हतं. हा पेच सोडवायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला.

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सुरेन्द्रनाथ बॅनर्जी यांनी दादाभाई नौरोजी यांना अधिवेशनाचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. नौरोजी म्हणजे जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते होते. 

त्यांच्या नावाशी जहाल गटाला काहीच समस्या नसणार अशी आशा व्यक्त केली गेली मात्र झालं उलटंच.

दादाभाईंनी अध्यक्षपद स्वीकारले आणि तिकडे बंगालमधल्या काही जहाल पुढाऱ्यांचे पित्त खवळले. बिपिनचंद्र पाल यांनी दादाभाईंना इंग्लंडमध्ये तार पाठवून अध्यक्षपद स्वीकारलं तर इंग्लंडमधील व्यापारातीले गैरव्यवहार काढू अशी धमकी दिली.

पण टिळकांनी यावर तुमच्या नावाला आपला विरोध नाही व कधी होणार नाही असे आश्वासन दिले आणि आपण वाद निर्माण केलेला नाही व वाढवणार नाही असंही स्पष्ट केलं.

या साऱ्या पार्श्वभूमीवर कोलकता येथे अधिवेशन झाले. दादाभाईंच्या अध्यक्षीय भाषणाने हाल गटाचे समाधान झाले नाही. 

त्यानंतर आले १९०७ सालचे अधिवेशन.

तणावग्रस्त वातावरणात अखेर काँग्रेसचे अधिवेशन सुरतेत भरले. मेहता यांच्या नियंत्रणाखालील समितीने रासबिहारी घोष यांची अध्यक्ष म्हणून घोषणा केली होती. अधिवेशनास जवळपास दीड हजार  प्रतिनिधी, १० हजारांच्या आसपास प्रेक्षक हजर होते.

या अधिवेशनात जहालांना रासबिहारी घोष यांच्याऐवजी लाला लजपतराय अध्यक्ष हवे होते आणि यावरून वादाची ठिणगी पडली. घोष यांच्या नावाला अनुमोदन देण्यास सुरेन्द्रनाथ उठले, तोच विरोधी गटातून घोषणा सुरु झाल्या.

स्वागताध्यक्ष होते त्रिभुवनदास माळवी. त्यांनी सभेला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. शेवटी सभा काही काळ तहकूब केल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे अध्यक्षांचे भाषण पहिल्या प्रहरात झालेच नाही.

काही वेळाने अधिवेशन पुन्हा सुरु झाले. पण या मधल्या काळात  टिळकांनी व्यासपीठावर एक चिट्ठी त्रिभुवनदास माळवींकडे पाठवली व आपल्याला अध्यक्षांच्या निवडीबाबत बोलायचे आहे आणि अधिवेशनच तहकूब करावे असे सांगितले होते.  माळवींनी त्या चिट्ठीकडे साफ दुर्लक्ष केले आणि त्यांनी मोतीलाल नेहरूंना अध्यक्षांच्या नावाची सूचना मांडण्यास व सुरेन्द्रनाथांना अनुमोदन देण्यास सांगितले. मलावी आणि नेहरूंचं भाषण झालं की घोष भाषण देण्यास उठले. 

त्यांनी दोन वाक्य ही बोलले नसतील तोच टिळक वाऱ्याच्या वेगाने व्यासपीठावर चढले आणि त्यांनी माईक आपल्या हाती घेतला. तोच एकच गोंधळ उडाला.

आपल्या उपसूचनेबाबत निर्णय लागेपर्यंत आपण स्टेजवरून हलणार नाही यावर टिळक ठाम होते. 

टिळकांचे स्वयंसेवक त्यांच्या भोवती उभे राहून घोषणा देत होते. यावरून सभेत एकच हलकल्लोळ माजला. तरीही घोष भाषण करतच होते मात्र त्यांचा एकही शब्द त्या गोंधळात कुणाच्या कानावर पडत नव्हता.

तितक्यात या गोंधळातून सुरेन्द्रनाथांना आणि फिरोजशहांना कुणीतरी चप्पल फेकून मारल्याचं सांगण्यात येतं. 

या सगळ्याला दंगलीचं स्वरूप आलेलं. काही लोकं यात जखमी झाले होते, पण पोलिसांची तुकडी आली आणि या गोंधळावर नियंत्रण मिळवलं.  ‘मॅन्चेस्टर गार्डियन’चा प्रतिनिधी हेन्री नेव्हिन्सन ने या घटनेचा सर्व वृत्तांत त्याच्या पत्रात प्रसिद्ध केला होता.

अधिवेशनाचा अध्यक्ष निवडीला विरोध एवढाच जहाल गटाचा उद्देश होता दंगल करण्याचा मुळीच नव्हता शिवाय टिळकांचाही यात काही सहभाग नव्हता असं दोन्ही गटांकडून सांगण्यात आलं आणि झालेली दंगल एकाएकी झाली असा खुलासा करण्यात आला.

मात्र जे काही घडले त्यावरून अधिवेशन उधळले गेले आणि कॉंग्रेसच्या स्थापनेपासूनच्या २२ वर्षांची मेहनत त्या अधिवेशनाच्या काहीच तासांत पाण्यात गेली.  

पण याबाबत टिळकांची भूमिका महत्वाची होती, काँग्रेस ही देशाची एकमेव राष्ट्रीय संघटना असून कॉंग्रेस फुटावी असं त्यांना मनोमन वाटत नव्हतं आणि ते त्यांच्या म्हणण्यावरून टोकाची भूमिका देखील घेत नव्हते.

उलट फिरोजशहा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत देऊन काँग्रेस जहालांच्या नियंत्रणाखाली जाणार नाही असं म्हणत त्यांनी कॉंग्रेस फुटीचं सर्व खापर जहाल गटावर आणि टिळकांवर फोडलं होतं.

पण दंगल होऊन अधिवेशन उधळल्यानंतरही टिळक तडजोडीस तयार होते. टिळकांनी तसे समेटाचे प्रयत्न केले. परंतु असं म्हणतात मवाळ गटाने त्यांना दाद दिली नाही. 

आणि शेवटी काँग्रेसचे विभाजन झाले.

याच दरम्यान इंग्रज सरकारने टिळकांवर खटला भरून त्यांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. टिळक मंडालेत असताना १९०८ ते १९१४ या दरम्यान कॉंग्रेसच्या राजकारणाला मरगळ आली होती. 

अधिवेशनास उपस्थित राहणार्‍या लोकांची संख्या रोडावत चालली होती. १९०७ साली सुरत अधिवेशनास जवळपास १६०० प्रतिनिधी विविध प्रांतातून आले होते परंतु हीच संख्या कमी होत जाऊन १९१२ साली २०७ वर आली. काही वर्षांपूर्वी भारताच्या सार्वजनिक जीवनात प्रभावशाली भूमिका बजावणारी काँग्रेस आता प्रभावी राहिली नव्हती.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.