पोर्तुगीज भानगड ज्युलियानाने आपल्या बॉयफ्रेंडला भारताचा शहेनशहा बनवलं

सम्राट म्हणलं की, लै भानगडी असतात राव यांच्या. कुठल्या कुठल्या लक्षात ठेवायच्या ? आणि वाचायच्या तरी किती ? बरं आता या भानगडीतून लै काय असं मिळतंय असं पण न्हाई. पण मुघल दरबारातल्या एका भानगडीमूळ प्रिन्स बहादूर शाह मुघल सम्राट झाला होता.

आता कोण ही भानगड?

तर मुघल सम्राट औरंगजेबच्या कारकिर्दीत एका पोर्तुगीज महिलेचा उल्लेख झालाय. जिला मुघलांच्या दरबारात उच्च स्थान मिळालं होतं. तीन केवळ मुघल राज्याच्या प्रशासनातच सहभाग घेतला नाही तर मुघलांचा पाठिंबा मिळवत हिंदुस्थानातल्या ख्रिश्चनांना चांगल्या प्रकारे संरक्षण देण्याची जबाबदारीही पार पाडली. त्याचबरोबर मुघल दरबाराविषयी पोर्तुगीज आणि डच विश्वास वाढवण्यासाठी मदत केली.

त्यातल्या त्यात विशेष गोष्ट म्हणजे, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचे उत्तराधिकारी होण्यासाठी त्याच्या मुलांमध्ये संघर्ष झाला तेव्हा तिने बहादूरशहा प्रथम याला पाठिंबा दिला. त्याला मुघल सिंहासनावर बसविण्यात तिनं महत्वाची भूमिका बजावली.

अशा या पोर्तुगीज भानगडीचं नाव ज्युलियाना होतं. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार ज्युलियाना आणि बहादूर शाह यांच्यात प्रेमसंबंध होते.

इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार ज्युलियानाचा जन्म १६४५ मध्ये आग्रा येथे झाला होता. तिच्या  वडिलांचे नाव ऑगस्टिन्हो डायस दा कोस्टा होत. जो मुघल दरबारात वैद्यकीय पदावर कार्यरत होता. त्याचे कुटुंब कोचीनमधून दिल्ली येथे गेले होते किंवा त्यांना गुलाम म्हणून मुघल दरबारात आणले होते. आता नक्की कशी आली ही कोस्टा फॅमिली याबद्दल नीट माहिती मिळत नाही.

काही जणांच्या मते, पोर्तुगीज डाकूंनी दहापट मुघल दरबारातल्या दासींचे अपहरण केले होते. त्या हे डाकू प्रचंड गोंधळ घालत होते. त्यानंतर १६३२ मध्ये हुगळी नदीजवळ शाहजहानने पोर्तुगीजांवर हल्ला केला. या युद्धामध्ये बर्‍याच पोर्तुगीजांना बंदिवान करून आग्रा येथे आणण्यात आले.

त्यातील एक ज्युलियानाचे कुटुंब होते.

मुघलांवर नेहमीच युरोपियन लोकांच्या वैद्यकीय ज्ञानाचा प्रभाव होता. त्यात ज्युलियानाचे वडिल डॉक्टर होते म्हणून त्यांना मुघल दरबारात काम करण्याची संधी मिळाली. त्याच वेळी जूलियानाची आई शहाजहानच्या जनानखान्यात सामील झालेल्या महिलांपैकी एक होती.

ज्युलियानाचे लहान वयातच लग्न झाले, परंतु तिचा नवरा फ्रँक लवकरच मरण पावला. त्यानंतर ज्युलियाना फादर अँटोनियो डी मॅगेलान्ससमवेत दिल्लीला आली. मग त्यांच्या मदतीने औरंगजेबच्या दरबारात जाण्याची तिला संधी मिळाली.

१८ वर्षाच्या प्रिन्सची टीचर झाली ज्युलियाना.

मुघल दरबारात आल्यावर ज्युलियाना औरंगजेबची पत्नी नवाब बाई हिच्या सेवेत दाखल झाली. हि नवाब बाई प्रिन्स मुअज्जमची आई देखील होती. लवकरच ज्युलियानाने स्वत:च्या क्षमतेने मुघल दरबारात स्वतःचे नाव केले. आणि ती थोड्याच कालावधीत सम्राटाच्या जवळच्या लोकांपैकी एक झाली होती.

मग औरंगजेबाने तिची प्रिन्स मुअज्जमची (बहादूर शाह) शिक्षक म्हणून नेमणूक केली. ज्युलियानासाठी हे फार विशेष होते, कारण तिला बहादूरशहाचा उस्ताद मुल्ला सालेह याची जागा मिळाली होती.

विशेष म्हणजे ज्युलियाना खूप लहान होती. एकीकडे जिथे तिचे वय अवघे १७ वर्षे होते, तिथं तिचा विद्यार्थी बहादूर शहा १८ वर्षांचा होता. असे म्हटले जाते की ज्युलियाना खूपच सुंदर होती आणि अशा परिस्थितीत प्रिन्स मुअज्जम आणि ज्युलियानाचे हृदय एकमेकांवर जडलं.

आणि इथूनच त्यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं.

पण त्यांचे प्रेम प्रकरण किती प्रमाणात होते यासाठी ज्युलियानाची निष्ठेचे पुरावे सादर करून इतिहासकारांनी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. १६८७ मध्ये औरंगजेबाने त्याची पत्नी नवाबबाई आणि मुलगा बहादूर शाह यांच्यावर राग धरून त्या दोघांना कैद केले.

अशा परिस्थितीत ज्युलियानाने आपली निष्ठा दाखवली. ज्युलियानाने त्यांच्याबरोबर बंदिवासातच रहाण्याचा निर्णय घेतला. नवाबबाई १६९१ मध्ये तुरूंगात मरण पावली. नंतर बहादूर शाहला सुमारे १६९३ च्या सुमारास कैदेतून सोडण्यात आले. बहादूर शाहला सोडवण्यात ज्युलियानाचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती.

त्याच्या सुटकेनंतर बहादूर शाह प्रथम हा काबूलचा सुभेदार म्हणून नियुक्त झाला. मग त्याने पेशावर, जलालाबाद आणि जगदलक जिंकले. त्यानंतर १६९९ मध्ये काबुलची सत्ता उलथून टाकली आणि काबुल ताब्यात घेतले. औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत बहादूर शाह काबूलमध्ये सुभेदारकीच करत होता.

यादरम्यान ज्युलियाना त्याच्याबरोबर राहिली. या काबूलच्या स्वारीसाठी तिने पोर्तुगीज सैनिकांना पोर्तुगीज तोफखान्यांसह बोलावले. यावरून हे सिद्ध होते की, ज्युलियानाची निष्ठा आणि प्रेम बहादूरशहावरच होते. तिच्या या निष्ठेमुळे मुघल दरबारात तिचा आदर वाढतच गेला.

आणि बहादूर शाह पहिला दिल्लीचा सम्राट झाला 

१७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी आपापसांत संघर्ष झाला. यात बहादूरशहा आणि त्याचे भाऊ यांच्यात जजाऊ युद्ध झाले. या युद्धामध्ये ज्युलियानाने बहादूरशाह जफरला पाठिंबा दर्शविला आणि त्याला दिल्लीचा सुलतान बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

ज्युलियानाने बहादूरशहाला प्रोत्साहन दिले आणि म्हटले की आपण युद्ध जिंकणार आहात, कारण सर्व ख्रिश्चनांनी आपल्या विजयासाठी प्रार्थना केली आहे.

या युद्धामध्ये ज्युलियानाने बहादूरशहाला पोर्तुगीज सैनिकांकरवी बरीच मदत पुरवली होती. पोर्तुगीज तोफखान्याचा प्रमुख तिच्या भाचीचा नवरा होता. त्यामुळे पोर्तुगीज तोफखान्यांनी हे युद्ध जिंकण्यात निर्णायक भूमिका बजावली.

या भागातील एक मनोरंजक गोष्ट म्हणजे ज्युलियानाने रणांगणाच्या बाहेर राहून केवळ विजयच मिळवला नव्हता तर तिने रणांगणात हत्तींवर स्वार होऊन शत्रूंचा सामना केला होता. आणि तिच्या प्राणप्रिय बहादूर शहाला सम्राट बनविला होता.

ज्युलियाना शेवटच्या श्वासापर्यंत सम्राटाबरोबर राहिली होती. 

हे युद्ध जिंकल्यानंतर बहादूरशहाच्या दृष्टीत ज्युलियानाचा रुबाब वाढला होता. तिला ख्रिश्चनांची  संरक्षक म्हणून घोषित करून शाही पदवी देण्यात आली. सोबतीला संपत्तीबरोबरच दारा शिकोहचा राजवाडा देखील दिला होता.

यानंतर बहादूरशहाच्या कारकिर्दीत तिने अनेक निर्णय ख्रिश्चनांच्या बाजूने घेतले. १७११ मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीचे दूतावास लाहोरला पोहोचले. ज्युलियानाने त्यांना मदत केली. त्या बदल्यात तिने कोणतीही भेटवस्तू घेतली नाही.

तिने ख्रिश्चनांना मदत केली. ख्रिश्चनांना जिझिया कराची सूट मिळवून देण्यात तिचे  मोठे योगदान होते. पोर्तुगीज इतिहासकारांनी असेही नमूद केले आहे की ज्युलियानामुळे मुघल बादशहा ख्रिश्चन फादर यांच्या बाबतीत दयाळू झाला होता.

बहादूर शाह पहिला  १७१२ मध्ये मरण पावला, परंतु तोपर्यंत ज्युलियानाने त्याची साथ सोडली नाही  आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपली निष्ठा कायम ठेवली.

रघुराजसिंग चौहान आणि मधुकर तिवारी यांनी लिहिलेल्या “ज्युलियाना नामा” या पुस्तकात ज्युलियाना संबंधित या गोष्टींचा उल्लेख आहे. त्याच वेळी, जोस अँटोनियो सारख्या काही परदेशी लेखकांनी देखील त्यांच्या पुस्तकात ज्युलियाना आणि मोगल सल्तनत यांच्यातील संबंधांची कबुली दिली आहे.

तर अशी होती पोर्तुगीज भानगड ज्युलियाना आणि तिचा प्रियकर बहादूर शहा यांच्या निष्ठेची गोष्ट.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.