श्रीनिवास वनगा यांना जी साथ दिली त्यावरूनच कळतं इतके आमदार एकनाथ शिंदेंकडे कसे आहेत..

एकनाथ शिंदेच बंड एवढाच टॉपिक आपण गेल्या काही दिवसांपासून ऐकतोय. ऐकतोय म्हणण्यापेक्षा मॅटर इंटरेस्टिंग झालाय म्हणून आपल्यालाही त्यात जरा इंटरेस्ट जास्त आलाय हे मान्य करावं लागेल. एकनाथ शिंदेकडे आतापर्यंत ५० आमदार झाल्याचं सांगण्यात येत होतं. त्यात अजूनही वाढ होताच आहे.

तसं तर एकनाथ शिंदे जे आपल्याला कट्टर शिवसैनिक आणि मातोश्रीचा कोणताही आदेश नं धुडकावणारे येस मॅन म्हणून माहित होते. मात्र त्यांनी अशी बंडखोरी केली आणि राज्याचा राजकरणात भूकंप निर्माण झाला. त्यातही इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार शिंदेंच्या बाजूने उभे राहिले यावर विश्वास बसत नव्हता. 

मात्र एकनाथ शिंदेंची आमदारांमध्ये असलेली प्रतिमा पाहता शिंदे आमदारांत कसे लोकप्रिय होते हे ही आपल्याला कळून येतं.

राष्ट्रवादी भेदभाव करत असताना, मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसताना एकनाथ शिंदे आपल्याला वेळ देत होते, मतदारसंघातील कामं करून देत होते अशी भावना आमदार व्यक्त करताना दिसतात. मात्र याधीही अशी अनेक कारणं होती ज्यामुळं शिवसेनेत एकनाथ शिंदेंना मानणारा एक गट तयार होत गेला.

एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असलेल्या श्रीनिवास वनगा यांची एक अशीच स्टोरी आहे. 

श्रीनिवास वनगा यांचे वडील चिंतामणराव वनगा हे भाजपकडून खासदार होते. त्यांची अख्खी राजकीय कारकीर्द त्यांनी भाजपात काढली. १९९०-९६ या काळात ते ठाण्याचे भाजप जिल्हाध्यक्ष देखील होते. १९९६-९८ आणि नंतर १९९९-२००४ मध्ये डहाणू मधून तर पुन्हा २०१४-१८ दरम्यान पालघरमधून ते लोकसभेवर पोहचले होते. 

२०१८ ला दिल्लीमधील त्यांच्या खासदार निवासस्थानी असताना ते एकाकी कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

आदिवासी भागातून येऊ आपलं आयुष्य राजकारणात घालणाऱ्या चिंतामण वनगा यांची पक्षात हाय-प्रोफाइल नेते म्हणून कधी प्रतिमा नव्हती त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही पक्षातून त्यांच्याकडून एवढं लक्ष देण्यात आलं नाही.

चिंतामणराव वनगा यांच्या मुलगा श्रीनिवास वनगा यांनी यांनी सांगितलेली परिस्थिती अजूनच विदारक होती. श्रीनिवास वनगा एकदा म्हणाले होते की 

”माझे बाबा दिल्लीत वारले आणि त्यांचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये पडून होता. पण माझ्याकडे पैसे नव्हते.  तरीही कसाबसा दिल्लीला पोहोचलो आणि मग बऱ्याच दिवसांनी मालवाहू विमानात आणलेला मृतदेह आम्हा कुटुंबियांना मिळाला.मुंबई विमानतळावरसुद्धा मृतदेह सोडण्यापूर्वी आम्हाला तासन तास थांबावे लागले. सत्ताधारी पक्षाच्या खासदाराला अशी वागणूक देण्यात आली होती.

 वनगा यांच्या मृत्यूनंतर भाजपचा एकसुद्धा नेता आमच्यकडे आला नव्हता. ज्याने आपलं उभं आयुष्य पक्षासाठी खर्ची घातली त्यांना वाऱ्यावर सोडल्याची भावना वनगा कुटुंबीयांची झाली होती.

तेव्हा त्यांच्या मदतीला एकनाथ शिंदे आले. 

त्यांनी श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेत घेण्याची दाखवली. मात्र २०१८ मध्ये शिवसेना भाजपचा मित्रपक्ष असल्याने आणि पालघरची जागा भाजपच्या वाट्याची असल्याने शिवसेना नेतृत्व श्रीनिवास वनगा यांना पक्षात घेण्यास अनुकूल नव्हतं. मात्र एकनाथ शिंदे यांनी आपला शब्द टाकून वनगा यांना शिवसेनेत प्रवेश मिळवून दिल्याचं सांगितलं जातं.

इतकंच नाही तर जेव्हा चिंतामणराव वनगा यांच्या मृत्यूने रिकामी झालेल्या लोकसभेच्या जागेवर शिवसेनेनं त्यांना भाजपच्या उमेदवाराविरुद्ध तिकीट देखील दिलं. 

या सगळ्यात एकनाथ शिंदे यांचीच भूमिका महत्वाची होती. प्रत्येक ठिकाणी ते आपलं वजन वापरून श्रीनिवास वनगा यांची बाजू लावून धरत होते. पोटनिवडणुकीच्या जबाबदारीसुद्धा एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. 

भाजपने वनगा यांच्या विरोधात काँग्रेसमधून आयता उमेदवार आयात करून राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली होती. 

२०१८च्या पोटनिवडणुकीत मात्र वनगा यांचा पराभव झाला.

तरीही सेनेने पर्यायाने एकनाथ शिंदेनी आंतर दिलं नाही. २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीतही त्यांनी पालघरच्या जागेसाठी प्रयत्न केले. भाजप आणि शिवसेनेच्या युतीची बोलणी ज्या कारणाने असून होती त्यामध्ये पालघरच्या जागेचा देखील समावेश होता.

शेवटी मग भाजपचा उमेदवार म्हणजे राजेंद्र गावित यांना शिवसेनेणं तिकीट द्यायचं अशी सेटलमेंट झाली आणि  राजेंद्र गावित यांनी शिवसेनचं तिकीट घेतलं. राजेंद्र गावित निवडूनही आले.

पण एकनाथ शिंदेनी श्रीनिवास वनगा यांचं पुनर्वसन करण्याचा शब्द मोडला नव्हता. 

त्यांनी श्रीनिवास वनगा यांना विधासभेचं तिकीट देण्याची व्यवस्था केल्याचं सांगितलं जातं. मग त्यानुसार २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत श्रीनिवास वनगा यांना तिकीट मिळालं. शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना विधानसभा निवडणुकीत  विद्यमान आमदार अमित घोडा यांचं तिकीट कापून उभं केलं. पक्षानं ठेवलेला विश्वास सार्थ ठरवत श्रीनिवास वनगा यांनी पालघर मतदारसंघातून विजय देखील मिळवला. य विजयात देखील एकनाथ शिंदेंची मोठी मदत वनगा यांना झाली होती.

म्हणूनच जेव्हा एकनाथ शिंदे आमदारांचा वेगळं गट करून त्यांना सुरतला जाण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये श्रीनिवास वनगा हे देखील नाव होतं. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.