कोणतंही शुभ काम असो अंबानी नाथद्वाराच्या मंदिरात पोहचतात, त्याला मोठ्ठा इतिहास लाभलाय

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा साखरपुडा झाला आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा मुंबईत नाही तर राजस्थानमध्ये पार पडला. नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिरात त्यांचा साखरपुडा झाला.

अंबानी कुटुंब आपल्या घरातील आणि कंपनीतील प्रत्येक शुभकार्याची सुरुवात याच मंदिरातून करतं. 

मुकेश अंबानी यांची आईवडील कोकिलाबेन अंबानी धीरूभाई अंबानी हे पुष्टीमार्ग पंथाचे अनुयायी होते त्यामुळे ते या मंदिरात दर्शनाला येत होते. त्यामुळे अंबानी कुटुंबात शुभकार्य करायचं असलं की ते या मंदिरात दर्शनाला येतातच . तसेच रिलायन्स कंपनीत कोणताही नवीन प्रोजेक्ट सुरु होणार करायचा असल्यास प्रथम याच मंदिरात दर्शन घेतात. 

अंबानी कुटुंबाच्या दर्शनाला येण्यामुळे चर्चेत येणारं हे मंदिर फार जुनं आहे. राजस्थानच्या राजसंमंद जिल्ह्यातील नाथद्वारा शहरात असलेलं हे मंदिर वल्लभ अथवा पुष्टिमार्ग सांप्रदायाच्या ७ पीठांपैकी प्रमुख पीठ आहे. या मंदिराची स्थापना १७ व्या शतकात मेवाडच्या राजाने केली असे सांगितले जाते. मंदिराचा इतिहास जरी सतराव्या शतकातील आहे मात्र यात स्थापना केलेल्या श्रीनाथाच्या मूर्तीचा इतिहास त्यापेक्षा जुना आहे.

पुष्टिमार्ग पंथाच्या साहित्यातील संदर्भांनुसार मंदिरातील मूर्तीबाबत एक आख्यायिका सांगितली जाते की, पुष्टिमार्ग पंथाचे संस्थापक वल्लभाचार्य हे कृष्णाचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन विक्रम संवत १५४९ मध्ये म्हणजेच इसवी सन १४९२ मध्ये श्री कृष्णाने त्यांना दर्शन दिलं आणि वृंदावनाच्या गोवर्धन पर्वतावर असलेल्या मूर्तीची पूजा करण्याचा दृष्टांत दिला.

वल्लभाचार्यांनी कृष्णाच्या मूर्तीचा शोध घेतला आणि पूजा सुरु केली. 

वल्लभाचार्यांच्या नंतर त्यांचा मुलगा विठ्ठलनाथजी यांनी तीच परंपरा कायम ठेवली. मात्र त्यानंतर अनेक आक्रमणे झाले. त्यात ही मूर्ती तोडण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे या मूर्तीला वाचवण्यासाठी या मूर्तीला अनेक ठिकाणी हलवण्यात आलं. असं सांगितलं जातं की औरंगजेबाने अनेक हिंदू मंदिरांना उध्वस्त करण्याचे आदेश दिले होते. तेव्हा मंदिराचे महंत दामोदरदास बैरागी यांनी ही मूर्ती मंदिरातून काढून घेतली आणि ते वृंदावन पासून जयपूर मार्गे मारवाडला निघाले. 

रस्त्यात त्यांनी अनेक जणांना मूर्तीसाठी मंदिर बांधण्याची विनंती केली मात्र त्यांनी औरंगजेबाच्या भीतीने मंदिर बनवण्यास नकार दिला होता. तेव्हा महंतांनी या मूर्तीसाठी मंदिर बांधण्याकरिता मेवाडचे राजे महाराजा राजसिंह यांना एक पत्र लिहिलं. त्या पत्राची दखल घेऊन मेवाडच्या राज्याने नाथद्वारा येथे एका मंदिराची निर्मिती केली आणि भगवान कृष्णाच्या श्रीनाथ मूर्तीची स्थापना करवून घेतली. तेव्हापासून हे मंदिर पुष्टीमार्ग पंथाचे प्रमुख पीठ बनले आहे.  

या मंदिराला श्रीनाथजींची हवेली सुद्धा म्हटलं जातं.

या हवेलीत एका गृहस्थ घराप्रमाणे सर्व गोष्टी आहेत. या हवेलीला एक मुख्य बैठक आहे. सोबतच दूध ठेवण्यासाठी एक दूधघर, सुपारी आणि विड्याचे सामान ठेवण्यासाठी एक पानघर, फुलांसाठी एक फुलघर, नैवैद्य बनवण्यासाठी एक स्वयंपाकघर, देवाचे दागिने आणि कपडे ठेवण्यासाठी आभूषणघर, रथ ठेवण्यासाठी अश्वशाळा आणि एक सोब्या चांदीचे चाक असलेलं जातं सुद्धा आहे. इथे दररोज एका रथातून सामान आणि शृंगाराच्या वस्तू आणल्या जातात.

या मंदिरात कृष्णाची दिवसातून आठ वेळा वेगवेगळ्या पूजा पूजा आणि सेवा केल्या जातात. यात पहिली मंगला पूजा केली जाते त्यानंतर दुसरी शृंगार पूजा होते, तिसरी ग्वाल पूजा केली जाते आणि त्यानंतर चौथ्या वेळेस राजभोग दिला जातो. राजभोगानंतर तीन तासांनी दुपारी चार वाजता उत्थान पूजा केली जाते. त्यानंतर भोग पूजा, संध्या आरती आणि शयन पूजा केली जाते. 

या मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनाला येतात मात्र त्या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त चर्चा होते ती अंबानी कुटुंबाची.  

रिलायन्स कंपनीत नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन उपकंपनी सुरु  केली जात असेल, मोठे निर्णय घ्यायचे असतील तेव्हा सगळ्यात प्रथम मुकेश अंबानी या मंदिरात दर्शन घेतात. सोबतच कौटुंबिक कामातील शुभकार्यांची सुरुवात सुद्धा याच मंदिरातून केली जाते. ईशा अंबानीच्या लग्नविधींची सुरुवात याच मंदिरातून करण्यात आली होती. तर एकदा कोणालाच काहीही माहिती न देता मुकेश अंबानी एकटेच या मंदिरात दर्शनाला आले होते. 

मुकेश अंबानी यांच्या बरोबरच अनिल अंबानी यांची सुद्धा या मंदिरावर श्रद्धा आहे. रिलायन्स पॉवरची सुरुवात करतांना त्यांनी सुद्धा याच मंदिरात दर्शन घेतलं होतं.  

अंबानी कुटुंब या मंदिराचे भक्त तर आहेतच सोबतच कोकिलाबेन अंबानी या मंदिर बोर्डाच्या उपाध्यक्ष आहेत. सोबतच अंबानी कुटुंबाने नाथद्वारा शहरात धीरूभाई अंबानी यांच्या स्मृतीत धीरजभवन नावाच्या विश्रामगृहाची सुद्धा निर्मिती केलीय. अंबानी कुटुंबामुळे नेहमी चर्चेत येणारं हे मंदिर जगातील अनेक लोकांचं श्रद्धास्थान आहे. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.