पुण्यात झालेल्या एका दंगलीमुळं महाराष्ट्रात ढोल-ताशा पथकांची परंपरा सर्वदूर पसरली

गणपती म्हणलं की ढोल ताशांचा खणखणाट घुमू लागतो आणि वातावरण अगदी भारावून जातं. जगातल्या भल्या भल्या ड्रमरना जमणार नाहीत असे बिट पकडून ढोल वादक बेधुंद वाजवत असतात आणि पब्लिक थरारून जाते. ढोल ताशांचा जल्लोष त्याची नशा ऐकणाऱ्याला चढत असते.

हे ढोलवादन ऐकायला लोकं रस्त्यावर गर्दी करत असतात. आपल्या इकडे दोन प्रकारचे ढोल ओळखले जातात एक म्हणजे पुणेरी ढोल आणि दुसरा नाशिक ढोल.

ढोल हे वाद्य अस्सल भारतीय आहे. पूर्वापार पासून काश्मीर पासून ते तामिळनाडू पर्यंत वेगवेगळ्या राज्यात याच्या परंपरा आहेत. त्यातही विशेषतः पंजाबी ढोल, धनगरी ढोल असे अनेक प्रकारचे ढोल प्रसिद्ध आहेत.

पुण्यातलं पाहायचं शहरात ढोल-ताशा पथकांची संख्या जवळपास दीडशे च्या जवळपास आहे तर या पथकातील ढोल-ताशा वादकांची संख्या २२ ते २५ हजारांच्या घरात आहे. पुण्यात असो वा मुंबईत, नाशिक असो ढोल-ताशा हा गणेशोत्सवाचा इतका अविभाज्य भाग बनला आहे की त्याशिवाय गणेशोत्सवाची मजा नाही असं समीकरण बनलंय.

पुणेरी ढोल -ताशाचा इतिहास पाहिल्यास माहिती मिळतेय कि,  हे ढोल-ताशा गणपतीमध्ये कसा फेमस झाला याची कथा खूप इंटरेस्टिंग आहे.

लोकमान्य टिळकांनी १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या पूर्वार्धात या उत्सवाला सार्वजनिक स्वरूपात पुढं आणलं. पण पुण्यात ढोलताशांची परंपरा प्रत्यक्षात १९६० च्या जवळपास  अप्पासाहेब पेंडसे यांनी सुरुवात केली असं सांगितलं जातं. अप्पासाहेब पेंडसे म्हणजेच डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे. ज्यांनी पुण्यात ज्ञान प्रबोधिनीची स्थापना केली. ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम ढोल-ताशा पथकाला सुरुवात केली.

१९६० च्या दशकाच्या सुरुवातीस अप्पासाहेब ढोल-ताशाच्या प्रथेवर काम करत होते. तेव्हा गणेशोत्सव हा पुण्यातील सर्वात मोठा सांस्कृतिक कार्यक्रम होता, परंतु समस्या अशी होती की लोकं मिरवणुकीत शिस्तीच्या पद्धतीने जात नसत. मग अप्पासाहेबांनी एक फॉर्म तयार केला आणि मिरवणुकीसाठी ढोल ताशा वादकांना शिकवण दिली. आप्पासाहेबांनी वादकांसाठी पसंत केलेले नृत्य तांडवातून प्रेरित होते. 

अप्पासाहेब पेंडसे यांच्यासाठी ढोल-ताशा मिरवणूक हे तरुणांमध्ये शिस्त आणण्याचे साधन होते. याच ढोल-ताशाच्या परंपरेतून त्यांना तरुणांमध्ये नेते निर्माण करायचे होते.

आप्पासाहेबांनी वादकांसाठी पसंत केलेले नृत्य तांडवातून प्रेरित होते. ते वादन शिवाच्या शिष्यांचे प्रतिनिधित्व करणारे होते. म्हणून पथकात ढोल-ताशा वाजवणारे आणि हातात ध्वज घेऊन नाचणारे वादक भाले घेतलेल्या सैनिकांसारखे जाणवतात.

पण ही परंपरा सुरु होण्यामागे एका विचित्र घटनेचा संबंध आहे…

त्याचं झालं असं की, १९६५ च्या सालच्या गणेशोत्सवात दंगल झाली होती. सामाजिक शांततेच्या कारणांमुळे पोलिसांनी गणेशोत्सव मिरवणुकीत वाद्ये वाजवण्यास मनाई केली होती.

पोलिसांच्या या निर्णयाला आप्पासाहेबांनी आव्हान देण्याचं ठरवलं. निषेध म्हणून आप्पासाहेब थेट गळ्यात ताशा घेऊन लक्ष्मी रोडच्या चौकात उभे राहिले अन् जोरजोरात ताशा वाजवू लागले. 

अप्पासाहेबांनी नम्रतेने केलेल्या विनम्र निषेधाला लोकांनी पाठिंबा दिला आणि प्रोत्साहन दिले. इतकंच नाही तर त्यांच्यासोबत सहभागी झाल्याचं सांगितलं जातं. 

ढोल-ताशांची परंपरा सुरु झाली आणि १९७५ मध्ये ज्ञान प्रबोधिनी शाळेतच मुलींच्या पहिल्या ढोल पथकाची सुरुवात झाली असं सांगितलं जातं.

सुरुवातीला ढोल-ताशा वादनाला आदराचे स्थान नव्हते. लोकांकडून विरोध व्हायचा पण आप्पासाहेबांनी हे सिद्ध केले की ढोलताशा वादन संरचित आणि शिस्तबद्ध पद्धतीने केले जाऊ शकते आणि आकर्षक संगीत आणि नृत्य असू शकते, तेव्हा या परंपरेला मान्यता मिळू लागली. लोकं ठराविक गट करून हे वादन शिकत आणि मिरवणुकीत सादरीकरण करत.

ज्ञान प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या वादकांनी विमलाबाई गरवारे प्रशाला, नूतन मराठी विद्यालय प्रशाला आणि रमणबाग प्रशाला यांसारख्या इतर शाळांमध्ये आपला कल वाढवत नेला आणि  १९९८ ते २००० च्या आसपास ढोलताशा वादनाचा आणि परंपरेचा प्रसार होत गेला. 

आता असं चित्र आहे कि, ढोल-ताशाचे पथक पुण्याच्या गणेशोत्सव उत्सवाचा अविभाज्य भाग बनले आहेत. गणेश मंडळांच्या मिरवणुकीत ढोल-ताशा पथके असणे ही प्रतिष्ठेची बाब समजली जाते. 

या ढोल-ताशा पथकांची तयारी कशी सुरु होते ?

गणेशोत्सवासाठी किमान दीड महिना आधी सराव सुरू होतो. सरावासॊबतच मेंटेनन्सची कामे देखील सुरु होतात. सरावाच्या आधी पहिले काही दिवस ढोल, ताशा, ध्वज, खांब काढून त्यांची साफसफाई करण्यात येते. सगळी वाद्य काळजीपूर्वक ट्यून केली जातात.

जुने ढोल म्हणजे एका लाकडी पोकळ ओंडक्यावर दोन्ही बाजूला जनावरांचे, विशेषतः म्हशी वा रेडय़ाचे कातडे लावले जाते. आत्ताचे ढोल हे अ‍ॅल्युमिनिअमच्या टाकीचे किंव्हा फायबरचे असतात आणि त्याला चामड्याचे पान असते. त्या टाकीच्या कड्यांना दोरीने घट्ट ताणून पान बांधले जाते. त्या पानांवर काळ्या रंगाचं गोंद लावलं जातं. 

सरावाला सुरुवात करण्यापूर्वी वाद्यपूजन होते. ढोल हे शिवकालीन वाद्य असल्यामुळे शिवाची पूजा प्रार्थना केली जाते. मग रोजचा सराव सुरू होतो. नवशिकाउ लोकांना ढोल घेऊन चालण्याचा सराव केला जातो त्यांना संध्याकाळी ६ ते १० पर्यंत शिकवले जाते. गणेशोत्सवापर्यंत दररोज संध्याकाळी कठोरपणे सराव करवून घेतला जातो. 

एक-दीड महिन्याच्या महेनतीनंतर वादनाच्या दिवशीचा त्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. 

यात भर घालतो तो पारंपरिक आणि आकर्षक पेहराव. काही महिला वादक तर पारंपरिक नऊवारी साडीत वादन करतात. वादकांना सलग ३-३ तास वंदन असतं तर मिरवणुकीच्या दिवशी आठ-आठ तासही वादन चालते. सोबतीला भगवा ध्वज नाचवणारे आणि झांज वाजवणारेही असतात.

दोन वर्षांच्या गॅपनंतर यंदाच्या गणेशोत्सवात वादकांना ढोल-ताशा वादनाचा चान्स मिळणार आहे त्यामुळे यंदाच्या मिरवणुकीत एक वेगळाच उत्साह असणार हे नक्की.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.